विषमतावादी ब्राम्हणी
व्यवस्थेच्या दलदलीत रुतून बसल्यामुळे बहुजन समाजाची म्हणावी तशी प्रगती झाली
नाही. हजारो वर्षे बहुजन समाजावर इथल्या व्यवस्थेने अन्यायच केलेला आहे.
बहुजनांच्या या परिस्थितीला अन्याय करणारी सनातनी भिक्षुकशाही जेवढी जबाबदार आहेत
तेवढेच अन्याय सहन करणारेही बहुजनही जबाबदार आहेत. बहुजन समाजाला ब्राम्हणी
गुलामीतून बाहेर काढण्यासाठी बुद्ध-महावीरांपासून फुले-शाहू-आंबेडकर आणि बळीराजा,
सम्राट अशोकापासून शिवरायांपर्यंत अनेक महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले.
काहींनी सामाजिक चळवळी उभारून तर काहींनी राजकीय चळवळीच्या माध्यमातून बहुजन
समाजाच्या प्रगतीला, विकासाला चालना दिली. तरी अजूनही हा समाज या गुलामीतून पुरता
बाहेर पडलेला नाही. कोणत्याही समाजाला स्वतःवरील अन्यायाची जाणीव झाल्याशिवाय तो
अन्यायाविरुद्ध पेटून उठत नाही. बहुजन समाजाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची
पूर्णपणे जाणीव नाही. स्वतःचे खरे मित्र कोण, शत्रू कोण याचे भान नाही. अन्यायी
व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करताना जर लक्षच निश्चित नसेल तर चळवळ दिशाहीन होते.
शत्रूला मित्र समजून जर त्याच्याबरोबर मैत्री केली तर तो धोका देणार नाही याची
खात्री कोण देवू शकेल ?