गुरुवार, एप्रिल १४, २०११

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १ - भूमिका



कोणत्याही समाजाच्‍या प्रतिभेचा सर्वांगीण असा सामूहिक आविष्‍कार त्या समाजाच्‍या सांस्‍कृतिक मूल्‍यांमधून होत असतो. प्रकृतीवर म्‍हणजेच निसर्गाकडून जे काही प्राप्‍त झालेले असते त्‍यावर आपल्‍या विविधांगी सर्जनशीलतेच्‍या आधारे संस्‍कार करून मानव जे काही निर्माण करतो, ती त्‍याची संस्‍कृती होय. प्रत्‍येक व्‍यक्‍तीची संस्‍कृती ही दुस-या व्‍यक्‍तीच्‍या संस्‍कृतीहून काही प्रमाणात का होईना वेगळी आणि स्‍वतंत्र असते. असे असले तरी कोणाही एका व्‍यक्‍तीची/व्‍यक्तिसमूहाची संस्‍कृती इतरांपासून साकल्याने अलग असू शकत नाही. अर्थात, विशिष्‍ट भूप्रदेश, नैसर्गिक वारसा, जीवनशैली, विचारसरणी, कला, भाषा इ. समान धाग्‍यांनी परस्‍परांशी जोडल्‍या गेलेल्‍या विविध व्‍यक्‍तींनी/जनसमूहांनी केलेल्‍या नवनिर्मितीमध्‍ये परस्‍परभिन्‍नतेबरोबरच अनेक समाईक घटकही आढळतात. भिन्‍नता आणि समानता यांच्‍या मिलाफातून सर्वांची एक सामूहिक संस्‍कृती बनते. ही संस्‍कृती जितकी विलोभनीय, हितकारक, उमदी, विविध अंगांनी समृद्ध आणि इष्‍ट दिशेने प्रवाहशील असेल, तितकी ती प्रगत आणि प्रसन्‍न होत जाते. महाराष्‍ट्रीय जनसमूहाच्‍या कित्‍येक पिढ्यांच्‍या प्रयत्‍नांतून आणि काळाच्या ओघात समाजजीवनात प्रविष्ट झालेल्या अनिष्ट गोष्टी दूर करण्यासाठी करण्‍यात आलेल्‍या संघर्षांतून एक विशेष संस्‍कृती विकसित झाली आहे.
समृद्ध संस्कृतीमध्येही कालानुरूप बदल करणे, तसेच तिच्‍यातील इष्‍ट बाबींचे जतन आणि विकसन करणे आवश्यक असते. हे सर्व आपोआप होऊ शकत नसल्‍यामुळे त्‍यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करावे लागतात. असे प्रयत्‍न करणा-या व्‍यक्‍ती आणि व्‍यक्‍तींचे छोटे-मोठे समूह प्रत्‍येक समाजात आपापल्‍या परीने प्रयत्‍न करीत असतातच. तरीही त्‍या त्‍या समाजाचे विविध अंगांनी प्रतिनिधित्‍व करणारी सर्वांत प्रभावी अशी संस्‍था असलेले शासन या बाबतीत कार्य करण्‍याच्‍या दृष्‍टीने सर्वांत अधिक समर्थ असते. स्‍वाभाविकच, समाजाच्‍या निकोप समृद्धीसाठी नानाविध प्रयत्‍न करणे, हे त्‍या त्‍या समाजाच्‍या शासनाचे कर्तव्‍य असते.
महाराष्ट्राने यापूर्वी वेळोवेळी अनेक क्षेत्रांत अग्रेसर राहून भारतीय समाजाला मोठे योगदान दिले आहे. नव्या काळातही आपली ही भूमिका अबाधित राहावी, महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील उच्च गुणवत्तेचा र्‍हास न होता तिचा आलेख चढताच राहावा आणि सध्या ज्या क्षेत्रांत महाराष्ट्र नेत्रदीपक कामगिरी करीत आहे ती टिकून राहावी व वृद्धिंगत व्हावी, या दृष्टीने महाराष्ट्रीय समाजातील व्यक्ती, संस्था, कला, साहित्य, विचारधारा इत्यादींच्या विकासासाठी सतत जागरूक राहणे आवश्यक आहे. हा विकास साधण्‍याचे प्रयत्‍न करीत असताना, जात, संप्रदाय, धर्म, आर्थिक स्‍तर इ. प्रकारच्‍या विशिष्‍ट कारणाने कोणताही जनसमूह समग्र समाजापासून वा अन्‍य समाजघटकापासून तुटणे, हे व्‍यापक सामाजिक हिताच्‍या दृष्‍टीने हानिकारक असते, हे विसरता कामा नये. तसेच, आपण दुस-याने केलेला अन्‍याय सहनही करायचा नाही आणि दुस-यावर अन्‍याय करायचाही नाही, हे न्‍याय्य समाजव्‍यवस्‍थेचे जे अधिष्‍ठान असते, तेही बळकट करण्‍याची गरज आहे. त्‍याबरोबरच समाजातील मोजक्‍या व्‍यक्‍ती विविध अंगांनी अत्‍याधिक कर्तृत्‍ववान होणे ही बाब स्‍वागतार्ह असली, तरी अधिकाधिक व्‍यक्‍ती वैचारिकदृष्‍ट्या विवेकी, भावनिकदृष्‍ट्या परिपक्‍व आणि सर्जनशीलतेच्‍या दृष्‍टीने प्रफुल्लित होणे, हे समाजाच्‍या संतुलित संपन्‍नतेचे आणि सांस्‍कृतिक समृध्‍दीचे महत्‍त्‍वाचे लक्षण असते, याचे भान ठेवणेही आवश्‍यक आहे. महाराष्ट्र शासन त्याबाबतीतील आपली जबाबदारी पार पाडू पाहात आहे.
महाराष्‍ट्र राज्‍य निर्मितीनंतरच्‍या काळात पुन्‍हा एकदा नव्‍याने सांस्‍कृतिक पायाभरणी करण्‍याबरोबरच सामाजिक समस्‍या जाणून घेण्‍याचे आणि त्‍या सोडविण्‍याचे प्रयत्‍न झाले. आता पन्‍नास वर्षानंतर या समस्‍यांवर प्रभावी रीतीने कायमची मात करीत समाजाच्‍या अधिक प्रगल्‍भतेचा विचार करणे महत्त्वाचे वाटते. महाराष्‍ट्र राज्‍य निर्मितीच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षात हे सर्वसमावेशक तसेच सर्वसमन्‍वयी सांस्‍कृतिक धोरण जाहीर करतांना या धोरणाच्‍या अंमलबजावणीने पूर्णपणे निर्दोष आणि आदर्श समाजरचना साधेल, असा शासनाचा दावा नाही. शिवाय, ‘आदर्श समाज’ ही सतत बदलत जाणारी संकल्‍पना आहे. तरीही आदर्शचा पाठपुरावा करीतच आदर्शाच्‍या अधिकाधिक जवळ जाता येते. त्‍यामुळे, भारतीय संविधानात नमूद केलेले ‘न्‍यायाधिष्ठित समाजरचने’चे उदिष्‍ट गाठणे आणि समाजाची वाटचाल अधिक प्रगल्‍भतेकडे व्‍हावी यासाठी प्रयत्‍नशील राहणे, हे आपणा सर्वांचे कर्तव्‍य आहे.
महाराष्‍ट्र राज्‍याचे सांस्‍कृतिक धोरण निश्चित करण्‍याचा शासनाचा निर्णय म्‍हणजे त्‍या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आणि त्‍याबाबतीतील जबाबदारी पार पाडण्याविषयीची वचनबद्धता होय. महाराष्ट्रासारख्‍या विशाल, समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आणि पुरोगामी राज्याच्या शासनाला संस्‍कृतीसारखे अत्‍यंत महत्त्वपूर्ण क्षेत्र उन्‍नत आणि सतत विकसनशील ठेवण्‍यासाठी आपल्‍या भावी वाटचालीचे पूर्वनियोजन करण्‍याची निकड जाणवणे स्‍वा‍भाविक आहे. महाराष्‍ट्र राज्‍याचे प्रस्तुत सांस्‍कृतिक धोरण म्‍हणजे राज्‍य शासनाच्‍या या बाबतीतील गंभीर दृष्टिकोणाचे फलित होय.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes