१. मराठीचा वापर व दुभाषांची मदत - राज्य शासनाचे मंत्री, प्रशासकीय
प्रमुख, तसेच विभागप्रमुख इ. मान्यवरांनी शासकीय, सार्वजनिक कार्यक्रमांत
बोलताना शक्यतो मराठी भाषेत बोलावे, अशी अपेक्षा ठेवण्यात येईल. अमराठी,
विशेषत: परदेशांतील प्रतिनिधी यांच्या समवेत होणा-या अधिकृत बैठका/
कार्यक्रम यांमध्ये संवाद साधताना मराठीचे भाषांतर करण्यासाठी दुभाषाची/
अनुवादकाची मदत घेण्यात येईल. त्यामुळे मराठीचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित
होईल, मराठी भाषकांचे अनुवादकौशल्य विकसित करण्यासाठी चालना मिळेल आणि
मराठी भाषकांना अनुवादक म्हणून व्यवसायही प्राप्त होईल.
२. अनुवाद प्रशिक्षण - मराठी-इंग्रजी, मराठी-हिंदी आणि इंग्रजी-मराठी,
हिंदी-मराठी अशा अनुवादाच्या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम राज्य मराठी विकास
संस्थेमार्फत सुरू करण्यात येतील. तसेच, अनुवादविषयक कार्यशाळा/ शिबिरे
आयोजित करण्यात येतील. इतर भाषांच्या बाबतीतही आवश्यकतेनुसार शक्य तिथे असे
प्रयत्न करण्यात येतील.
३. मराठी ग्रंथ अनुवाद प्रोत्साहन - मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य
भारतीय भाषांमध्ये विशेषत: हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित
होण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती
मंडळ’ / ‘मराठी भाषा विकास संस्था’ यांच्यामार्फत ग्रंथांतील मजकुराचा
थोडक्यात सारांश आणि लेखकाचा परिचय हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अखिल
भारतीय स्तरावरच्या सर्व भाषांमधील महत्त्वाच्या प्रकाशकांना पाठविण्यात
येईल. येथून पुढे ज्या ग्रंथांना शासनातर्फे पुरस्कार देण्यात येतील, ते
ग्रंथ यासाठी निवडले जातील.
४. संतवचनांचे अनुवाद - महाराष्ट्रातील संतांच्या निवडक वचनांचे अनुवाद
देशातील भाषांमध्ये, तसेच परदेशांतील काही महत्त्वाच्या भाषांमध्ये
प्रकाशित करण्यात येतील. महाराष्ट्राबाहेरील भारतीय संतांच्या निवडक
वचनांचे अनुवाद मराठी भाषेमध्ये प्रकाशित करण्यात येतील.
५. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व – सध्या इंग्रजी भाषेला वेगवेगळया
कारणांनी जागतिक पातळीवर पूर्वीपेक्षाही अधिक महत्त्वाचे स्थान प्राप्त
झाले आहे. विविध क्षेत्रात जगभर होणारे अत्याधुनिक संशोधन आणि इतर घडामोडी
यांची माहिती त्वरित उपलब्ध होण्यासाठी, ती माहिती तत्परतेने
मराठीमध्ये भाषांतरित करण्यासाठी, तसेच नोकरी, व्यवसाय इ. बाबतीत यश
मिळविण्यासाठी मराठी भाषकांना इंग्रजी भाषा उत्तम रीतीने अवगत होणे
गरजेचे झाले आहे. त्यांना लिखित व मौखिक इंग्रजीचे नीट आकलन, तसेच
इंग्रजीमध्ये प्रभावी लेखन आणि प्रवाही संभाषण या मार्गांनी इंग्रजी
भाषेवर प्रभुत्व प्राप्त करता यावे, यासाठी राज्य शासन विविध उपक्रम
राबवील. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरांवरील अध्यापनाबरोबरच बहिःशाल
स्वरुपात इंग्रजीचे शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी संभाषणाचे वर्ग,
अनुवादाच्या कार्यशाळा इ. उपक्रमांना शासन अर्थसहाय्य देईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ