स्त्रीविषयक जीवनमूल्यांचा विचार केल्याखेरीज सांस्कृतिक जीवन परिपूर्ण
होऊ शकत नाही. आपल्या समाजातील काही विवेकी लोक स्त्रीचे सांस्कृतिक
जीवनातील उचित स्थान ओळखत होते. परंतु त्याच वेळी स्त्रीचा अनादर
करणार्या काही प्रथाही आपल्या समाजात अस्तित्वात होत्या. महाराष्ट्रातील
अनेक समाजसुधारक स्त्री-पुरुषांनी केलेला त्याग व संघर्ष यांच्यामुळे अशा
प्रथा दूर करण्याच्या बाबतीत अनुकूल
वातावरण निर्माण झाले आहे. तरीही
महिलांच्या विविध क्षमता विकसित करणे, त्यांना सर्व बाबतींत उचित प्रतिष्ठा
प्रत्यक्षात मिळवून देणे इत्यादी अंगांनी अजूनही खूप काही करण्याची गरज
आहे. हे ध्यानात घेऊनच राज्य शासनाने या पूर्वी महिलांविषयी स्वतंत्र धोरण
जाहीर केले आहे. त्या धोरणाला पूरक ठरणार्या आणि सांस्कृतिक अंगाने
महत्त्वाच्या असलेल्या काही बाबी प्रस्तुत सांस्कृतिक धोरणात समाविष्ट
करण्यात आल्या आहेत.
१. समित्यांवर महिलांना प्रतिनिधित्व - शासनाकडून नियुक्त करण्यात
येणा-या विविध समित्यांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाल्याची
खात्री करून घेतली जाईल.
२. नियुक्तिसमित्यांमध्ये महिला प्रतिनिधी - शासकीय-निमशासकीय पदांवरील
नियुक्त्या आणि बढत्या या संदर्भात निर्णय घेण्यासाठी गठित करण्यात
येणार्या समित्यांमध्ये महिला प्रतिनिधी असण्याची तरतूद सेवानियमांत
करण्यात येईल.
३. स्त्री-पुरुष प्रमाण संतुलन - राज्यात काही ठिकाणी मुलींचा जन्मदर
मुलांच्या जन्मदराच्या तुलनेत कमी होत चालला आहे. या परिस्थितीबाबत
जनजागृती होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने, ज्या
विभागांमध्ये/जिल्ह्यांमध्ये/गावांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या
जन्माचे प्रमाण (स्त्री-पुरुष प्रमाण अर्थात सेक्स रेशो) चिंताजनक वाटेल
इतके कमी असेल, त्या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
४. महिला विकास योजना - मुलीच्या जन्मापासून ते तिच्या विवाहापर्यंत/ती
स्वावलंबी होईपर्यंत/वयाच्या २०व्या वर्षापर्यंत तिच्या आयुष्याच्या
महत्त्वाच्या टप्प्यात तिला विशिष्ट रक्कम उपलब्ध होईल, अशा रीतीने विशिष्ट
योजना राबविण्यात येईल. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी
राबविण्यात येईल.
५. महिला संत अध्यासन - संत जनाबाई, संत बहिणाबाई सिऊरकर इत्यादी महिला
संतांच्या नावाने स्वायत्त स्वरूपात अथवा विद्यापीठीय पातळीवर अध्यासने
स्थापन करण्यात येतील.
६. महिला प्रबोधन कार्य – महिलांच्या समस्यांविषयी प्रबोधनाचे कार्य
करणारी पथनाट्यपथके/अन्य कलापथके यांना प्रयोगांसाठी आर्थिक साहाय्य देऊन
प्रोत्साहन देण्यात येईल. ही पथके मुलींच्या जन्माचे स्वागत, मुलींचे
शिक्षण, महिलांचे आरोग्य, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन, विधवा
पुनर्विवाहास प्रतिष्ठा, सर्व क्षेत्रांत महिलांचे प्रतिनिधित्व यांसारख्या
सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण बाबींवर कार्यक्रम करतील.
७. देवदासी सर्वेक्षण - देवदासींच्या प्रश्नांसंदर्भात पुन्हा एकदा
सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच, त्यांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन
त्यांच्या विकासासाठी योजना राबविण्यात येईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ