कला ही निसर्गनिर्मित सृष्टीला अधिक रमणीय बनविणारी मानवनिर्मित
प्रतिसृष्टी असते. ती मानवाच्या अस्तित्वाला अधिक सुंदर बनविते. त्याच्या
अंतर्बाह्य जीवनसत्त्वाला आविष्कृत करते, माणसा-माणसाला प्रसन्नपणे जोडते
आणि समग्र मानवी जीवनाला आनंदमय करते. कोणत्याही कलाक्षेत्रातील कामगिरी हा
त्या समाजाच्या नवनिर्माणक्षम प्रज्ञेचा एक अत्यंत महत्त्वाचा मापदंड
असतो. माणसाच्या मनुष्यत्वाला उन्नत व परिपूर्ण करण्याचे कलेचे हे सामर्थ्य
आणि त्याबाबतीत महाराष्ट्राचा विश्वविख्यात वारसा व आगळेपणा ध्यानात घेऊन
शासन कलाक्षेत्रासाठी विविध योजना आखेल.
तीन्ही कला क्षेत्रांसाठी
१. ज्येष्ठांसाठी सन्मानवृत्ती - वयोवृद्ध आणि ज्येष्ठ कलावंतांना
अनुदान देण्याच्या योजनेत सुधारणा करण्यात येईल. या क्षेत्रांत विशेष
कामगिरी केलेल्या ज्येष्ठ मान्यवरांना राज्यशासन स्वत:हून वर्गीकरणानुसार
दरमहा रू ३००० रू ४००० आणि रू ५००० अशी सन्मानवृत्ती तहहयात देईल. त्या
व्यक्तीच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या पतीला/पत्नीला ही सन्मानवृत्ती
तहहयात देण्यात येईल.
२. कलावंतांसाठी शासकीय सेवेत आरक्षण - कलांचे शिक्षण/ प्रशिक्षण
घेतलेल्या कलावंतांना शासकीय सेवेत रोजगाराची संधी मिळावी म्हणून
त्यांच्याकरिता खेळाडूंसाठी असतात त्याप्रमाणे आरक्षण निर्माण करता येईल
का, याविषयीची शक्यता तपासून पाहिली जाईल.
३. कलाशिक्षणासाठी शिष्यवृत्ती- प्रयोगात्म/दृश्यात्मक/चित्रपटविषयक
कलांचे शिक्षण देणार्या राष्ट्रीय पातळीवरील तसेच राज्यातील
मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या, शिक्षणशुल्क माफ नसलेल्या
आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या
शिक्षणशुल्काची रक्कम राज्य शासन भरील. तसेच, त्यांना शिष्यवृत्तीही
देण्यात येईल. यासाठी किमान १०० विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार
करण्यात येईल.
४. सांस्कृतिक संस्था पुरस्कार - कलावंतांना ज्याप्रमाणे पुरस्कार दिला जातो, त्याप्रमाणे कलाक्षेत्रात कार्य करणार्या संस्थांनाही पुरस्कार देण्यात येतील.
५. कलाकार प्रमाणपत्र -शिक्षण आणि नोक-या यांच्यासाठी आवश्यक असणा-या
कलाकार-प्रमाणपत्राबाबत सध्या कोणतेही निकष व नियमावली नाही. अशी नियमावली
तयार करण्यात येईल.
६. आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय सादरीकरणासाठी साहाय्य - केंद्र शासनाच्या
इंडियन कॉंन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) या संस्थेमार्फत परदेशात
कलापथके पाठविण्यात येतात. महाराष्ट्रातील कलाकारांना या संस्थेमार्फत
आंतरराष्ट्रीय मंच मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील
कलाकारांना आपल्या कलेचे अन्य राज्यांत सादरीकरण करण्यासाठीही प्रोत्साहन,
सहकार्य व अर्थसाहाय्य दिले जाईल.
७. मुंबईत निवास सोय - मुंबईबाहेरून येणार्या कलाकारांसाठी मुंबईत (यूथ
हॉस्टेलप्रमाणे) निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. त्याशिवाय
राज्यातील विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणीही अशा प्रकारची सोय उपलब्ध करून
देण्यात येईल.
८. आदिवासी कलांचे दस्तावेजीकरण - आदिवासी कलांचे दस्तावेजीकरण
(डॉक्युमेंटेशन) करण्याचा उपक्रम राबविण्यात येईल. प्रयोगात्म कलांच्या
बाबतीत ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’, तर दृश्यात्मक कलांच्या
बाबतीत प्रस्तावित ‘ललित कला अकादमी’ हे कार्य करील. या दस्तावेजीकरणासाठी
अन्य माध्यमांबरोबरच चित्रपटमध्यमाचाही अवलंब केला जाईल.
९. नाटकेतर प्रयोगात्म-दृश्यात्मक चित्रपट कला संमेलने - सध्या
महाराष्ट्रात साहित्य व नाट्य संमेलने आयोजित केली जातात. या संमेलनांना
शासकीय अर्थसाहाय्य देण्यात येते. त्याच धर्तीवर अन्य कलाक्षेत्रांच्या
संदर्भात अशा प्रकारची स्वतंत्र संमेलने आयोजित करण्यात त्या क्षेत्रांतील
प्रातिनिधिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अशी
संमेलने आयोजित करण्यात आल्यास त्यांना शासनाकडून योग्य त्या प्रमाणात
अर्थसाहाय्य देण्यात येईल.
१०. कला आस्वादन प्रशिक्षण - कलावंतांना ज्याप्रमाणे विशिष्ट
प्रशिक्षणाची गरज असते, त्याप्रमाणे कलाकृतींचे आकलन-आस्वादन इ.
बाबतींतील क्षमता विकसित करण्यासाठी रसिकांची समज आणि अभिरुची प्रगल्भ
करण्याचीही आवश्यकता असते. त्या दृष्टीने विविध कलांच्या
आकलन-आस्वादनाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम, कार्यशाळा इत्यादींचे
आयोजन करण्यात येईल. हा उपक्रम ‘पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’,
तसेच ‘महाराष्ट्र ललित कला अकादमी’ यांच्यामार्फत राबविण्यात येईल. अशा
प्रशिक्षणासाठी अल्पकालीन मुदतीचे अभ्यासक्रम आयोजित करणार्या सांस्कृतिक व
शैक्षणिक संस्थांना राज्य शासन प्रोत्साहन देईल.
११. विशेष बालकांसाठी कला प्रशिक्षण - गतिमंद, अंध, अपंग, मूकबधिर तसेच
बालगृहांतील/ निरीक्षणगृहांतील मुले-मुली यांच्यासाठी या कलांच्या
प्रशिक्षणाचे उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येतील. तसेच या क्षेत्रात
कार्य करणार्या व्यक्ती आणि संस्था यांना अर्थसाहाय्य देण्यात येईल.
१२. विशेष बालकांसाठी नाट्यस्पर्धा/चित्रकला स्पर्धा - राज्य शासनातर्फे
घेण्यात येणार्या बालनाट्य स्पर्धांमध्ये बालगृहांतील/निरीक्षणगृहांतील
मुले-मुली यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. या
स्पर्धांमध्ये गतिमंद, अपंग, अंध, मूकबधिर यांच्यासाठी वेगळा गट ठेवण्यात
येईल. त्याचबरोबर त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धाही आयोजित करण्यात येतील.
तसेच, त्यांना चित्रपट कलेचा परिचय करुन देणारे उपक्रमही राबविण्यात
येतील.
१३. संशोधनवृत्ती – ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’मार्फत
प्रयोगात्मक व चित्रपट कलाक्षेत्रासाठी आणि ललित कला अकादमीमार्फत
दृश्यात्मक कलाक्षेत्रासाठी संशोधनवृत्ती देण्याची योजना राबविण्यात येईल.
या कलांच्या क्षेत्रात जतन कार्य आणि संशोधन करणार्या संस्थांना विशेष
आर्थिक साहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात येईल.
१४. परिनिरीक्षण गांभीर्याने, मतभेदप्रदर्शन जबाबदारीने – विविधता आणि
असमानता अनुभवणा-या समाजात सामंजस्य तसेच शांतता राखण्यासाठी
कलाक्षेत्रांकरिता नियमन व परिनिरीक्षण करणारी संस्था आवश्यक असते. अशा
संस्थेच्या सदस्यांकडे प्रगल्भ कलाजाणिवेबरोबरच सामाजिक भान असणे
अपेक्षित आहे. त्यामुळे या संस्थांनी अधिक काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत,
असे या संस्थेच्या सदस्यांना सांगण्यात येईल. अर्थात, अशा संस्थेने
घेतलेल्या निर्णयांच्या बाबतीत मतभेद असू शकतात. मात्र असे काही मतभेद
असल्यास ते व्यक्त करण्याचे मार्ग अहिंसक असावेत, याबाबतही जनजागृती
करण्यात येईल. (अंतीम आवृत्तीतून वगळले)
प्रयोगात्मक
या कलाप्रकारात नाटक, संगीत, नृत्य, आदिवासी कला आणि लोककला यांचा समावेश करण्यात आला आहे.
(अ) १. संरचनात्मक सुविधा
१. चित्रनगरीचे व्यापक कार्य – चित्रपटक्षेत्राबरोबरच रंगभूमी आणि
अन्य सांस्कृतिक उपक्रम यांच्यासाठी (विशेषत: प्रयोगात्म कलांसाठी)
विविध अंगांनी कार्य करण्याच्या उद्दिष्टाने ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट,
रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळ’ स्थापन झाले आहे. तथापि, सध्या या
मंडळाचे कार्य दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी), गोरेगाव, येथे
चित्रपटांच्या चित्रणाकरिता सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यापुरतेच सीमित
आहे. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे हे कार्य
अबाधित ठेवून सांस्कृतिक विकासाच्या अन्य योजनाही या मंडळामार्फत हाती
घेण्यात येतील. अशा योजना हाती घेताना सांस्कृतिक कार्य संचालनालय, तसेच
‘पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’ यांचेही सांस्कृतिक क्षेत्रात सुरू
असलेले उपक्रम, तसेच त्यांच्या द्वारा नव्याने प्रस्तावित उपक्रम यांची
पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. त्याचप्रमाणे
चित्रनगरीत चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक उपक्रम या विषयांवर कार्यशाळा,
परिसंवाद, चर्चासत्रे इत्यादी आयोजित करण्यासाठी दालने आणि अतिथिगृह
यांसारख्या सुविधा निर्माण करण्यात येतील.
२. नाट्यगृहांसाठी तज्ज्ञांचा सल्ला - राज्यात नाट्यगृह बांधताना,
राज्यशासनाने नेमलेल्या या क्षेत्रातील व्यक्तीचा/व्यक्तींचा सल्ला घेणे
बंधनकारक राहील. यासाठी शासन तज्ज्ञ व्यक्तींची समिती नेमेल.
३. सांस्कृतिक कार्यालये - सांस्कृतिक कार्य संचालनालयाची कार्यालये
प्रारंभी विभागीय पातळीवर आणि नंतर जिल्हा पातळीवर तातडीने स्थापन करण्यात
येतील.
४. पु. ल. अकादमीला स्वायत्तता – ‘पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला
अकादमी’ला अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी पुरेसे सक्षम करण्यात येईल. या
अकादमीला आवश्यक ती स्वायत्तता देऊन सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी अधिक
आर्थिक साहाय्य देण्यात येईल.
(अ)-२. शिक्षण-प्रशिक्षण-जतन-संशोधन
१. शालेय स्तरावर कलाशिक्षण - माध्यमिक शालेय शिक्षण स्तरावर प्रयोगात्म
कला हा विषय ऐच्छिक विषय म्हणून शिकण्याची सोय उपलब्ध करून देणे सर्व
शाळांना बंधनकारक करण्यात येईल. सध्या चित्रकला हा विषय ऐच्छिक विषय म्हणून
शिकवण्यात येतो. तशाच पद्धतीने ही सोय असेल.
२. आदिवासी विद्यार्थ्यांना कलाशिक्षण - आदिवासींसाठी असलेल्या आश्रम
शाळांमध्ये प्रयोगात्म कलेचा विषय सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल.
३. कला प्रशिक्षण केंद्र - शास्त्रीय संगीत, शाहिरी, दशावतार, खडी गंमत,
चित्रकथी, लावणी, तमाशा अशा कलांचे प्रशिक्षण देण्याकरिता शासन 'निवासी
कलाप्रशिक्षण केंद्र' (रेसिडेंशियल आर्ट ट्रेनिंग सेंटर) सुरू करण्याची
योजना तयार करील. खाजगी सहभागाने सुरू करण्यात येणार्या अशा केंद्रांमध्ये
शिष्यांनी गुरूच्या सान्निध्यात राहून कलेचे प्रशिक्षण घेणे अपेक्षित
असेल. यात शासनाचा सहभाग गुरू, साथीदार यांचे मानधन आणि विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती यापुरता मर्यादित असेल. गुरू आणि शिष्य यांचा निवास-भोजन इ.
खर्च करणे, अभ्यासक्रम ठरविणे व प्रशिक्षण देणे ही जबाबदारी सहभागी
संस्थेची असेल.
४. लावणीचे अभिजात स्वरूप - कथ्थक आणि भरतनाट्यम यांसारखे कलाप्रकार
पूर्वी शास्त्रीय कलाप्रकारांत गणले जात नसत. परंतु त्यांना शास्त्रीय बैठक
दिल्यानंतर हे नृत्यप्रकार अभिजात नृत्य म्हणून ओळखले जाऊ लागले.
महाराष्ट्रात लावणी हा लोकप्रिय नृत्यप्रकार आहे. सर्वसामान्यत: समजले जाते
तसा तो केवळ शृंगाराशी संबंध असलेला नृत्यप्रकार नाही. या नृत्यप्रकाराची
स्वत:ची स्वतंत्र बैठक आहे. हे लक्षात घेऊन लेखन व सादरीकरण या माध्यमातून
लावणीतील भावमुद्रांचे शास्त्रीय स्वरूप सिद्ध करता येईल. त्यासाठी या
क्षेत्रातील संस्थांद्वारे किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींद्वारे
प्रयत्न करण्यात येतील.
५. विद्यापीठाच्या कलाविभागांना अनुदान - राज्यातील विद्यापीठांच्या प्रयोगात्म कलाविभागांना अनुदान देऊन अधिक सक्षम करण्यात येईल.
६. ‘सेट’ परीक्षा – नाट्यशास्त्र, संगीत आणि नृत्य या विषयांत एम.ए. वा
तत्सम पदवी प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांसाठी सध्या सेट परीक्षा आयोजित
केली जात नाही. ती आयोजित करण्यात यावी, असे संबंधितांना सांगण्यात येईल.
७. संतसाहित्य कला प्रशिक्षण - विविध संतांनी आपल्या उपदेशाच्या
आविष्कारासाठी भारूड, लळित, फुगडी, कीर्तन, चक्रीनृत्य, स्तोत्रगान
(Psalm) इ. ज्या ज्या पारंपरिक कलाप्रकारांचा उपयोग केला, अशा सर्व
कलाप्रकारांच्या सर्वांगीण अभ्यासाची तसेच प्रशिक्षणाची सोय पैठण येथील
संतपीठात केली जाईल. ही सोय प्रामुख्याने सादरीकरणाच्या दृष्टीने केली
जाईल.
८. एफटीआयआय आणि एनएसडी मार्गदर्शन वर्ग - ज्याप्रमाणे आय.ए.एस.
प्रवेशाकरिता शासनाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध
करून दिली आहे, त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या पुणेस्थित ‘फिल्म ऍण्ड
टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एफ.टी.आय.आय.) आणि दिल्लीतील ‘नॅशनल
स्कूल ऑफ ड्रामा’ (एन.एस.डी.) या शिक्षण संस्थांमध्ये महाराष्ट्रातील
विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या
संस्थांमध्ये प्रवेश मिळवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शनाचे
वर्ग आयोजित करण्यात येतील.
९. नाट्यसंहितांचे संगणकीय जतन - रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे
प्रारंभीच्या काळापासून असलेल्या नाटकांच्या अप्रकाशित आणि निवडक संहितांचे
संगणकीय स्वरूपात जतन (डिजिटायझेशन) करण्यात येईल.
- मराठी रंगभूमीच्या इतिहासाचे लेखन
- लूप्त होत चाललेल्या कलांचे दस्तएवजीकरण
- लोकवाद्ये
१०. संगीतठेव्यांचे श्रवणसत्र - अनेक संस्थांकडे जुन्या संगीत
ध्वनिमुद्रिकांचे संग्रह आहेत. या संस्था तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली
अशा ठेव्यांचे श्रवणसत्र कार्यक्रम आयोजित करीत असतात. या संस्थांना अशा
कार्यक्रमांसाठी विशेष अनुदान देण्यात येईल.
(अ)-३. सादरीकरण व अनुदान
१. समांतर नाटकांचा महोत्सव – महाराष्ट्रात अव्यावसायिक अशा समांतर/
प्रायोगिक नाटकांची स्वतंत्र चळवळ आहे. अशा नाटकांचा राज्य पातळीवरील
स्वतंत्र नाट्य महोत्सव राज्याच्या विविध भागांत सांस्कृतिक कार्य
संचालनालयामार्फत आयोजित केला जाईल.
२. समांतर रंगभूमीकरिता प्रयोगशाळा – समांतर नाट्यचळवळीच्या माध्यमातून
महाराष्ट्राच्या विविध भागांत हौशी, तसेच बालरंगभूमीवर कार्य करणार्या
काही नाट्यसंस्था व्यावसायिक हेतू न बाळगता मराठी रंगभूमीवर चाकोरीबाहेरील
प्रयोग करीत असतात. रंगभूमीच्या विकासासाठी असे प्रयोग होणे महत्त्वाचे
असते. अशा प्रयोगांसाठी मुंबईत रंगप्रयोगशाळा बांधण्यात येईल. या
प्रयोगशाळेत अव्यावसायिक प्रायोगिक नाटकांच्या सादरीकरणासाठी तातडीने दोनशे
आसनक्षमतेचे सुसज्ज नाट्यगृह बांधण्यात येईल. या प्रयोगशाळेत तालीम,
ध्वनिमुद्रण यासाठी आवश्यक सोयी असतील. तसेच, नाट्यवाचन, परिसंवाद, चर्चा
यांच्या आयोजनाकरिताही सुविधा असतील.
३. समांतर रंगभूमीसाठी अनुदान - समांतर किंवा प्रायोगिक रंगभूमीसाठी
कार्य करणार्या संस्थांना त्यांच्या नाट्यकृतींचे प्रयोग सादर करण्यासाठी
विशेष अनुदान देण्यात येईल.(अंतीम आवृत्तीतून वगळले)
४. ग्रामीण कलावंतांना संधी – मुंबईबाहेरील महाराष्ट्रीय कलावंतांना
‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’त आपले कार्यक्रम सहज सादर करता
यावेत, यासाठी विशेष योजना आखण्यात येईल.
५. नाटकेतर कलांसाठी स्पर्धा - सध्या नाटक वगळता अन्य कोणत्याही
प्रयोगात्म कलेच्या बाबतीत राज्य शासनातर्फे स्पर्धा घेण्यात येत नाहीत. या
कलाक्षेत्रांत राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येतील. त्यासाठी
आवश्यकता भासल्यास या क्षेत्रातील अशासकीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येईल.
स्पर्धेचे नियम शासन ठरवून देईल. परीक्षक शासन नेमेल. बक्षिसाची रक्कमही
शासन देईल. स्पर्धेचे आयोजन मात्र संस्था करील.
६. प्रसारमाध्यम म्हणून लोककला पथक - राज्य शासनाच्या योजनांची माहिती
लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पथनाट्यांचा/लोककलांचा (शाहिरी, तमाशा,
कव्वाली, भारूड, दशावतार, कीर्तन, खडीगंमत आदींचा) उपयोग करून घेण्यात
येईल.
७. प्रयोग परवाने सवलत - मान्यताप्राप्त शिक्षण संस्था, तसेच सांस्कृतिक
उपक्रम आयोजित करणारी केंद्रीय तसेच राज्य शासनाची कार्यालये यांनी
शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन या हेतूने आयोजित केलेल्या अव्यावसायिक अशा
सांस्कृतिक उपक्रमांसाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची परवानगी
घेण्याची आवश्यकता नसेल. संबंधित संस्था किंवा कार्यालय अशा
कार्यक्रमांच्या संदर्भात पूर्णत: जबाबदार असेल.(अंतीम आवृत्तीतून वगळले)
८. परवान्यांसाठी एक खिडकी योजना - प्रयोगात्म कलेच्या सादरीकरणासाठी
आवश्यक असणार्या विविध परवान्यांसाठी 'एक खिडकी योजना' राबविण्यात येईल.
परिसर परवाना (प्रिमायसेस लायसंस), प्रयोग सादरीकरण परवाना (परफॉर्मंस
लायसंस), तिकीट विक्री परवाना हे परवाने अग्निशमन दल, प्रयोग परिनिरीक्षण
मंडळ (सेंसॉर बोर्ड), वीज वितरण कंपनी, पोलीस यंत्रणा इत्यादींकडील परवाने
यासाठी ही योजना राबविण्यात येईल. तसेच, ही योजना प्रत्यक्षात अमलात
येईपर्यंत या परवान्यांसाठी अर्ज केल्यानंतर पाच दिवसांच्या आत परवाने
देण्यात येतील. पाच दिवसांच्या आत एखादा परवाना देण्यात आला नाही वा
नाकारल्याचे कळविण्यात आले नाही, तर तो परवाना देण्यात आला असे गृहीत
धरण्यात येईल. याकरिता संबंधित नियमांत दुरुस्ती करण्यात येईल.
दृश्यात्मक
(इ) १. संरचनात्मक सुविधा
१. आधुनिक कला संग्रहालय - आधुनिक कलाकृतींसाठी संग्रहालय स्थापन
करण्यात येईल. दरवर्षी कलावंतांच्या नव्या कलाकृतींची तज्ज्ञांमार्फत
निवड करून त्या कलासंग्रहालयात प्रदर्शित करण्यात येतील. तेथे कलावंत
आपल्या कलाकृतींची स्वयंनिर्णयानुसार विक्री करू शकतील.
२. दिल्लीतील सदनात कलादालन - दिल्ली येथील नव्या महाराष्ट्र सदनात
महाराष्ट्राच्या कलावंतांसाठी चित्रकला आणि शिल्पकला यांच्यासाठी स्वतंत्र
दालन राखून ठेवण्यात येईल. हे दालन महाराष्ट्रातील कलावंतांसाठी असेल. ते
त्यांना आपल्या कलाकृती प्रदर्शित करण्याकरिता सवलतीच्या दरात उपलब्ध
असेल.(अंतीम आवृत्तीतून वगळले)
- बाबूराव पंटर कलाभवन -कोल्हापूर
(इ) २. शिक्षण-प्रशिक्षण-जतन -संशोधन १. चित्रकला अभ्यासक्रमात बदल -
शालेय स्तरावर शिकविण्यात येणार्या चित्रकला विषयाच्या अभ्यासक्रमांमध्ये
काळाच्या दृष्टीने सुसंगत असा बदल करण्यात येईल.
२.कलाविषयक कार्यशाळा - विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ कलावंतांच्या मार्गदर्शनाखाली कलाविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.
३. समग्र आढावा प्रकाशन - महाराष्ट्राच्या दृश्यात्मक कलांच्या परंपरेचा
अभ्यासपूर्ण असा समग्र आढावा घेऊन त्याचे ग्रंथरूपाने प्रकाशन करण्यासाठी
प्रस्तावित ‘महाराष्ट्र ललित कला अकादमी’ अथवा ‘राज्य साहित्य आणि
संस्कृती मंडळ’ पुढाकार घेईल.
४. हस्तकलांचा माहिती कोश – महाराष्ट्राच्या विविध भागांत अनेक हस्तकला
लोकप्रिय आहेत. पैठणी, कोल्हापुरी चपला, घोंगडी, लोकरीचे जेन (जॅन) बुरणूस,
बिद्री कारागिरी, हिमरू शाल, लाकडी खेळणी, भद्रावतीच्या चिनी मातीच्या
वस्तू, बांबूपासून तयार केल्या जाणार्या वस्तू, अशा अनेक हस्तकलांची
माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी या हस्तकलांचा
माहिती कोश तयार करण्यात येईल.
५ ऊपयोजीत कलांचा विकास
(इ) ३. सादरीकरण व अनुदान -
१. कलामेळे - दृश्यात्मक कलाक्षेत्रातील कलावंतांना आपापल्या कलाकृतींचे
प्रदर्शन करता यावे यासाठी कला संचालनालयामार्फत विभागीय पातळीवर प्रत्येक
विभागात दरवर्षी ‘कलामेळे’ भरविण्यात येतील.
२. रेल्वेप्रवास सवलत - देशात भरविण्यात येणार्या राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रदर्शनांसाठी प्रवास करणार्या कलावंतांना
रेल्वेची प्रवास सवलत मिळावी, याकरिता केंद्र सरकारकडे आग्रह धरण्यात येईल.
३. कलादालन नियमावली - राज्यात दृश्यात्मक कला प्रदर्शनासाठी मोजकी
कलादालने (आर्ट गॅलरीज) आहेत. कलादालनांची संख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन
देण्याची योजना राबविण्यात येईल. अस्तित्वात असलेली दालने उदयोन्मुख
कलाकारांनाही उपलब्ध होण्यासाठी या सर्व दालनांकरिता किमान समान नियमावली
तयार करण्याची शक्यता पडताळून पाहिली जाईल.
४. संस्था अनुदान - सांस्कृतिक संस्थांना अनुदान देण्याच्या
योजनेप्रमाणे दृश्यात्मक कलाक्षेत्रात कार्य करणार्या संस्थांना अनुदान
देण्याची योजना कला संचालनालयामार्फत राबविण्यात येईल.
५. कलाकृती निवड समिती - शासकीय इमारतींमध्ये/विश्रामगृहांमध्ये
लावण्यात येणार्या कलाकृतींच्या निवडीसाठी संबंधित क्षेत्रातील जाणकारांची
समिती नेमण्यात येईल. ही समिती संबंधित शासकीय यंत्रणांना चित्र/शिल्प
निवडीसाठी मार्गदर्शन करील.
६. चित्रकला स्पर्धा - महाराष्ट्र पातळीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील.
७. मुखपृष्ठ व मांडणी पुरस्कार - दरवर्षी शासनातर्फे मराठीतील
उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांबरोबर मराठी
भाषेतील ग्रंथांचे सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ, मांडणी तसेच छपाई व बांधणी
यांसाठी स्वतंत्र पुरस्कार देण्यात येतील.
८. व्यंग्यचित्र कलावंतांसाठी पुरस्कार - व्यंग्यचित्र हे दृश्यात्मक
कलेतील वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र आहे. महाराष्ट्राला या कलेची वेगळी परंपरा
आहे. या क्षेत्रातील कलावंतांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासन
व्यंग्यचित्रकारांकरिता पुरस्काराची योजना सुरू करील.
चित्रपट
१.लघुपट निर्मिती व प्रदर्शन साहाय्य - सामाजिक आणि ऐतिहासिक
महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करणार्या
चित्रपट निर्मात्याला विशेष आर्थिक साहाय्य देण्याची योजना सध्या
राबविण्यात येते. त्या योजनेऐवजी नवी योजना राबविण्यात येईल. महाराष्ट्राला
अभिमानास्पद असणार्या तसेच महत्त्वाच्या व्यक्तींवर, संस्थांवर आणि
सामाजिक विषयांवर दर्जेदार लघुपट/ अनुबोधपट/ माहितीपट तयार करण्यासाठी
शासनाकडून अर्थसाहाय्य देण्यात येईल. हे लघुपट/अनुबोधपट/माहितीपट
महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत दाखविणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच ते
अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे खेळ आयोजित करणार्या
संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल.
- लघूपट निर्मिती व प्रदर्शन सहाय्य
१. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या आयोजनासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते.
हे दोन्ही महोत्सव राज्य शासनाचे महोत्सव असल्याने या महोत्सवांची ख्याती
आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच जास्तीत
जास्त लोकांमध्ये चित्रपटकलेच्या आस्वादनाची क्षमता वाढावी, याकरिता
अस्तित्वात असलेल्या फिल्म सोसायट्यांना आर्थिक मदत/प्रोत्साहन देण्यात
येईल.
- फिल्म सोसायट्यांना मदत
- चित्रपट कथांच्या स्पर्धा
- मराठी चित्रपटांचे जतन
- कोल्हापूर चित्रनगरीचा विकास
२. नागपूर येथे चित्रनगरी - मुंबईतील चित्रनगरीत चित्रपटांच्या
निर्मितीसाठी असलेल्या सुविधांसारख्या सोयी नागपूर येथे उपलब्ध करून
देण्यात येतील.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ