महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत
आहेत. राज्यस्थापनेपासूनच या संपूर्ण कालखंडात महाराष्ट्र शासनाने विविध
सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. तरीही सांस्कृतिक क्षेत्रात आतापर्यंत
झालेल्या महाराष्ट्राच्या प्रवासाचा आढावा घेणे आणि भावी वाटचालीचे
नियोजन करणे, या दृष्टीने हा क्षण निर्णायक महत्त्वाचा आहे. हे महत्त्व
ध्यानात घेऊन आणि राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून
महाराष्ट्र शासनाने राज्याचे सांस्कृतिक धोरण निश्चित केले आहे.
प्रस्तुत सांस्कृतिक धोरण
१. भारतीय संविधानाची मूळ उद्दिष्टे साध्य होतील, अशा रीतीने आखण्यात आले आहे.
- शासनाची कर्तव्ये
२. सर्व समाजघटकांना आपापल्या विधायक सांस्कृतिक जीवनमूल्यांची जपणूक
करण्यासाठी स्वातंत्र्य देणारे व साहाय्य करणारे आहे परंतु त्याबरोबरच
आपल्यापेक्षा वेगळी सांस्कृतिक मूल्ये मानणार्या समाजघटकांशी सुसंवाद
साधणे आणि त्यांना समजावून घेणे हे स्वत:ला अधिक परिपूर्ण करण्यासाठी
आवश्यक आहे, ही जाणीव वृद्धिंगत करणारे आहे.
३. महाराष्ट्राच्या सर्व सांस्कृतिक अंगांना सामावून घेणारे आहे.
४. सर्व उपक्रमांमध्ये शासनाचे प्रोत्साहन, साहाय्य इत्यादी देताना
समाजाच्या विविध घटकांना आणि त्या त्या घटकांतील महिलांना उपक्रमांच्या
स्वरूपानुसार यथोचित प्रतिनिधित्व देण्यासाठी बांधील आहे.
५. राज्याच्या सर्व भागांतील जनतेला लाभदायक ठरणारे आहे.
६. समाजाच्या सर्व घटकांतील आणि संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांतील
गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी व विकास साधण्यासाठी यथोचित उपक्रम राबविणारे
आहे.
७. सर्वांना आत्माविष्काराच्या सुयोग्य संधी देणारे आहे.
८. महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील विविध सांस्कृतिक घटकांबरोबरची नाळ
तुटू न देता समग्र भारतीय संस्कृतीबरोबरचे नाते दृढ करणारे आहे.
९. जागतिकीकरणाचा वेध घेत, भारताबाहेरील समाजांच्या संस्कृतींशी
आदानप्रदान करीत विज्ञाननिष्ठा आणि मानवतावादी विचारांवर भर देणारे आहे.
१०. महाराष्ट्राच्या परंपरेतील सध्याच्या काळात अभिमानास्पद ठरणार्या
उज्ज्वल वारशाची जोपासना करणारे, तसेच नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे आहे.
११. व्यक्तीचे स्वातंत्र्य व समाजाचे हित यांच्यामध्ये संतुलन साधून त्यांना परस्परपूरक बनविणारे आहे.
१२. केवळ नियम/कायदे करण्यावर विसंबून राहण्यापेक्षा समाजात इष्ट
परिवर्तन व विकास घडविण्याचे उद्दिष्ट बाळगून लोकांची मानसिकता बदलण्यासाठी
प्रभावी उपक्रम राबविण्यावर भर देणारे आहे.
१३. राज्यशासन सध्या राबवीत असलेले व विद्यमान काळाशी सुसंगत असे उपक्रम
अधिक परिणामकारकरीत्या कसे राबविता येतील आणि वरील सर्व उद्दिष्टांच्या
पूर्तीसाठी या उपक्रमांमध्ये समन्वय कसा साधता येईल, याचा या धोरणात विचार
करण्यात आला आहे. तसेच, विविध उपक्रमांची नव्याने भरही घालण्यात आली
आहे.(अंतीम मजकुता वाक्यात बदल आहेत)
१४. हे धोरण योग्य त्या क्रमाने व टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ