समाजाला असाधारण योगदान देणार्या स्त्री-पुरुषांची मोठी मालिका
महाराष्ट्राच्या इतिहासात निर्माण झालेली आहे. अशा व्यक्तींविषयी कृतज्ञता
व्यक्त करण्याचा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा एक मार्ग म्हणजे
त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारणे वा त्यांच्या नावाने विशिष्ट
पुरस्कार देणे होय.
१. स्मारक सल्लागार समिती - शासनातर्फे नवीन स्मारकांची निर्मिती
करताना संबंधित स्मारकाची आवश्यकता, स्वरूप, जतन इत्यादी बाबींवर
शासनाला सल्ला देण्यासाठी ‘स्मारक सल्लागार समिती’ स्थापन करण्यात येईल.
स्मारकांचे स्वरूप स्मृतिदर्शक प्रतीकांच्या उभारणीबरोबरच
अभ्यासकेंद्र, संशोधनकेंद्र, कलाकेंद्र, प्रशिक्षणकेंद्र इ. प्रकारचे
रहावे, याची दक्षता घेण्यात येईल.
२. पुरस्कारांसाठी व्यापक प्रतिनिधित्व – राज्य शासनातर्फे दिल्या
जाणा-या सन्मादर्शक पुरस्कारांसाठी निवड करताना, तसेच केंद्र शासनातर्फे
दिल्या जाणा-या पुरस्कारांसाठी शिफारस करताना श्रेष्ठ गुणवत्ता, विशेष
कर्तृत्व इ. बाबींबरोबरच विविध समाज घटकांचे आणि समाजजीवनाच्या विविध
क्षेत्रांचे प्रतिनिधित्व ही देखील कसोटी मानली जाईल.
३. यथोचित स्मरण – सर्वसामान्य, प्रसंगी उपेक्षित अशा विविध
समाजघटकांतून पुढे आलेल्या आणि देदीप्यमान कर्तृत्व गाजविलेल्या
व्यक्तींचा यथोचित सन्मान करणे हे शासनाचे सांस्कृतिक कर्तव्य आहे.
येथून पुढे शासन नव्याने विविध पुरस्कार वा अन्य महत्त्वाचे उपक्रम सुरू
करील, तेव्हा ज्या कर्तृत्ववान व्यक्तींची पुरेशी नोंद घेणे राहून गेले
आहे, त्या व्यक्तींची नावे या पुरस्कारांना वा उपक्रमांना देण्यात
येतील.
४. पुरस्कार निवडीच्या प्रक्रियेत बदल - विविध क्षेत्रांत उत्कृष्ट
कार्य करणार्या व्यक्तींना महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार दिले जातात.
काही पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्याची पद्धत असल्यास अशा पुरस्कारांसाठी
अर्ज मागविण्यात येणार नाहीत. पुरस्कारयोग्य व्यक्तींची निवड करण्यासाठी
स्वतंत्र प्रक्रिया अवलंबिण्यात येईल. वैधानिक संस्थांच्या सर्वोच्च पदांवर
व्यक्तींची निवड करण्यासाठीही अर्ज मागविण्यात येणार नाहीत.
५. नावांचा योग्य वापर – स्मारके, पुरस्कार, सांस्कृतिक केंद्रे,
विशिष्ट संस्था, महत्त्वाच्या इमारती, महामार्ग व अन्य मार्ग, चौक
इ.ना देण्यात आलेल्या नावांचे संक्षेप न वापरता ती नावे पूर्णपणे वापरली
जातील, याविषयी दक्षता घेतली जाईल. हा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने
अशा प्रकारची नावे देताना ती अनेक पदव्या वगैरेसह लांबलचक न होता सुटसुटीत
असावीत, असा प्रयत्न राहील.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ