भाषा, साहित्य, कला इ. प्रकारच्या वर्गीकरणात चपखलपणे समाविष्ट होऊ न
शकणा-या, तथापि सांस्कृतिक दृष्टया ज्यांची नोंद करणे अत्यावश्यक
आहे, अशा काही महत्त्वपूर्ण बाबींचा ‘संकीर्ण’ या गटामध्ये अंतर्भाव
करण्यात आला आहे.
१. सामाजिक सलोखा – आपला समाज वेगवेगळी जीवनशैली असलेल्या जनसमूहांनी
बनलेला आहे. जीवनप्रणालीतील वेगळेपणामुळे सामाजिक ऐक्याला बाधा पोचू नये
याची दक्षता घेणे, हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी अत्यंत
आवश्यक आहे. यासाठी धर्म, जाती, भाषा, प्रादेशिक विभाग या अंगानी भिन्नता
असलेल्या जनसमूहांमध्ये विधायक संपर्क निर्माण होणे, त्यांनी एकमेकांशी
संवाद साधणे, परस्परांना वस्तुनिष्ठ दृष्टीने व आत्मीयतेने समजून घेणे,
भिन्न जीवनशैली असूनही एकमेकांचा आदर करणे इत्यादी प्रकारची सामंजस्याची
जीवनशैली निर्माण झाल्यास आपला समाज आंतरिकदृष्टया एकसंध व सबळ होईल.
तसेच, संवादाच्या अभावामुळे निर्माण होणारे सामाजिक ताण दूर करण्याच्या
दृष्टीने एकमेकांचे आचारविचार, चालीरीती, सण, उत्सव, श्रद्धास्थाने इत्यादी
बाबींचे यथार्थ ज्ञान होणे उपकारक ठरेल. यासाठी शासन पुढील प्रकारचे
विधायक उपक्रम हाती घेईल.
१.१ आंतरधर्मीय/आंतरजातीय सामंजस्य समिती स्थापन करणे. ही समिती समाजात
ताणतणाव निर्माण होऊ नयेत तसेच समाजात एकात्मता टिकून राहावी म्हणून योग्य
ते प्रयत्न करील. तणावाचे रूपांतर संघर्षात झाल्यास संबंधित समाजघटकांमध्ये
दिलजमाई करण्यासाठी पावले उचलेल.
१.२ विविध धर्मांतील लोकांना स्वत:च्या धर्माबरोबरच अन्य प्रमुख
धर्मांमधील महत्त्वाच्या संकल्पना, धारणा, तत्त्वज्ञाने, मिथके, सण,
सांस्कृतिक इतिहास इत्यादींचा परिचय करून देणारे लघुमुदतीचे अभ्यासक्रम
सुरू करणे
१.३ भिन्न जनसमूहांची एकत्र साहित्य संमेलने आयोजित करणे
१.४ अनेक महान समाजसुधारकांनी आपल्या समाजातील अस्पृश्यतेसारख्या
अनिष्ठ रुढी दूर करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले असूनही काही
ठिकाणी अशा रुढींचे समूळ उच्चाटन झाल्याचे दिसत नाही. असे उच्चाटन
व्हावे, म्हणून लोकांची मानसिकता बदलण्याच्या हेतूने सध्या सुरु
असलेल्या उपक्रमांची कार्यवाही अधिक गांभीर्याने करण्याचे, तसेच काही
नवीन उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करणे.
२. संप्रदाय-सलोखा - महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या वारकरी, महानुभाव,
नाथ, वीरशैव, रामदासी, सूफी आदी संप्रदायांच्या विविध संस्था/संघटना
राज्यात आपापल्या परीने सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.
त्यांतील ज्या संस्था/ संघटना राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा
वृद्धिंगत करण्यासाठी व परस्परांमध्ये समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेऊन
योग्य कामगिरी बजावतील, त्यांना संतपीठामार्फत पुरस्कार देण्यात येतील.
३. विशाल जनसमूहांच्या उपक्रमांकरिता समन्वय - राज्यातील अनेक भागांत
विविध जनसमूहांचे सांस्कृतिक वारसा असलेले उपक्रम साजरे होत असतात. अशा
उपक्रमांत सहभागी होण्यासाठी लोक ठिकठिकाणांहून पायी/वाहनांद्वारे फार
मोठ्या प्रमाणात एकाच वेळी विशिष्ट ठिकाणी जमत असतात. सदर उपक्रमांत सहभागी
होणार्या लोकांना स्वच्छ पाणी, प्रथमोपचार, तातडीची वैद्यकीय सेवा,
स्वच्छतागृहे, सुरक्षितता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता
असते. या उपक्रमांशी विविध संस्था /संघटना निगडित असतात. त्यांनी संबंधित
शासकीय कार्यालयांशी समन्वय साधून या उपक्रमांत सहभागी होणार्या
व्यक्तींना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे
अपेक्षित आहे. अशा उपक्रमांची माहिती उपक्रमाच्या व्यापकतेनुसार जिल्हा,
विभागीय अथवा राज्य पातळीवरील गृहविभागाच्या कार्यालयांना कळविण्याची काळजी
संबंधितांनी घेतल्यास याबाबतीत समन्वय साधणे आणि साहाय्य करणे शासकीय
यंत्रणेला सोयीचे होईल. संबंधित कार्यालयांनी त्या संस्थांना/संघटनांना मदत
करावी, असे सांगण्यात येईल.
४. खाद्यसंस्कृती – महाराष्ट्राला स्वत:ची अशी विभागवार खाद्यसंस्कृती
आहे. खानदेशी, कोल्हापुरी, वैदर्भी, मालवणी, मराठवाडी इ. खाद्यपदार्थ, तसेच
कोकम सरबत, पन्हे, आंबील, माडगे इत्यादी पेये ही महाराष्ट्रातील
खाद्यपदार्थांची/पेयांची खासियत आहे. असे विविध पदार्थ महाराष्ट्राच्या
विविध भागांत व महाराष्ट्राबाहेरील महत्त्वाच्या ठिकाणी सहजपणे उपलब्ध
व्हावेत, अशी लोकांची मागणी असते. शासकीय अतिथिगृहे, शासकीय कार्यालये,
तसेच आमदार निवास, शैक्षणिक संकुले, पर्यटनस्थळे, रेल्वे व एस टी स्थानके,
विमानतळ आदी ठिकाणी असलेल्या उपाहारगृहांमध्ये हे खाद्यपदार्थ मिळावेत,
यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील. हे खाद्यपदार्थ तयार करण्याचे
प्रशिक्षण देण्याविषयी महाराष्ट्रातील केटरिंग कॉलेजांना सांगण्यात येईल.
अशा खाद्यपदार्थांचा परिचय करून देणारा महाराष्ट्र खाद्यपदार्थकोश तयार
करण्यास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाला सांगण्यात येईल.
५. अलंकार आणि वेशभूषा – डोरली, जोडवी, नथ इ. प्रकारचे अलंकार, तसेच
विविध प्रकारचे फेटे इ. प्रकारची वेशभूषा हे महाराष्ट्रीय संस्कृतीचे एक
वैशिष्टय आहे. त्यांचा परिचय करुन देणारे ‘राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळा’तर्फे प्रकाशित करण्यात येईल.
६. रस्त्यांचा दुरुपयोग-जनजागृती - कौटुंबिक किंवा सामूहिक अशा
कोणत्याही कार्यक्रमांसाठी सार्वजनिक रस्त्यांचा दुरुपयोग न करण्याची जाणीव
रुजविण्यात येईल. त्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत या
संदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल.
७. कॉपी प्रकरणांना आळा - परीक्षाकेंद्रांवर वाढत्या प्रमाणात होणारी
कॉपी प्रकरणे आणि विशेषत: सामुदायिक कॉपीची प्रकरणे ही महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक जीवनाच्या दृष्टीने एक गंभीर समस्या बनली आहे. अशा प्रकरणांचे
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासावर विपरीत परिणाम होत आहेत. या
प्रकारांना आळा घालण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यापासून परावृत्त व्हावे याकरिता विद्यार्थी आणि
पालक यांच्या प्रबोधनाचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात येईल. त्याबरोबरच
कॉपी करणार्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी
परीक्षाकेंद्रांचे/वर्गांचे चित्रीकरण करण्यात येईल. त्या चित्रफिती त्या
त्या दिवशीच परीक्षा मंडळाच्या/विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयास/मुख्य
कार्यालयास/जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे बंधन असेल.
जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली
ही कार्यवाही करण्यात येईल.(अंतीम धोरणात वगळले)
८. कचरा विल्हेवाट आणि धूम्रपानकक्ष - सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,
थुंकणे वा धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. परंतु बर्याच ठिकाणी कचरा टाकणे,
धूम्रपान करणे इ.साठी नियमांतर्गत योग्य ती सोय उपलब्ध करून देण्यात येत
नाही. म्हणून उपाहारगृहे, बसस्थानके, शासकीय-अशासकीय कार्यालये, शैक्षणिक
संस्था इ. सार्वजनिक ठिकाणी कचरा पेट्यांची/कुंड्यांची व्यवस्था करणे आणि
त्यांतील कचर्याची वेळच्या वेळी विल्हेवाट लावणे बंधनकारक केले जाईल.
तसेच, धूम्रपान करू इच्छिणार्या लोकांसाठी स्वतंत्र धूम्रपानकक्षाची
(स्मोकिंग झोनची) व्यवस्था करणे तर्कसंगत होईल. धूम्रपान न करणा-यांना
त्रास होऊ नये, तसेच धूम्रपाननिषेधाचा कायदा मोडला जाऊ नये म्हणून असे
स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात येईल. त्यासाठी
नियमात दुरुस्ती करण्यात येईल. (अंतीम धोरणात वगळले)
९. तरुणांना प्रवासासाठी अभ्यासवृत्ती - महाराष्ट्राबाहेरील नानाविध समाजांच्या कला, साहित्य, जीवनशैली इ. सांस्कृतिक स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी देशाच्या विविध विभागांत प्रवास करता यावा म्हणून दरवर्षी सुमारे दहा महाराष्ट्रीय तरुणांना अभ्यासवृत्ती देण्यात येईल. त्यांनी नोंदविलेली निरीक्षणे प्रबंधिकेच्या स्वरूपात सादर करणे बंधनकारक राहील. ‘साहित्य अकादमी’ सध्या राबवीत असलेल्या अशा प्रकारच्या योजनेसारखी ही योजना असेल व ती साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत राबविण्यात येईल.
- अभ्यासक्रम समीक्षण मंडळ
१०. दिन महत्त्व - शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती
यांच्या संदर्भात विद्यार्थ्यांना अधिक सजगता यावी, याकरिता त्या त्या
दिवसांचे औचित्य साधून दिल्या जाणार्या सुट्ट्यांच्या आधी वा नंतर
विद्यार्थ्यांना त्या दिनाचे महत्त्व सांगणारे उपक्रम हाती घेण्यास
शैक्षणिक संस्थांना सांगण्यात येईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ