गुरुवार, एप्रिल १४, २०११

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १० - लेखन

१. युनिकोडचा अधिकृत वापर – संगणक माध्यमात देवनागरी लिपीच्या उपयोगाबाबत सर्वत्र एकवाक्यता नसल्याने मराठीतून संगणकीय संवाद साधण्यास मर्यादा येतात. म्‍हणून, जागतिक पातळीवर सर्व प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन युनिकोडच्या अंतर्गत विकसित केलेल्या देवनागरी लिपीच्या प्रमाणित संस्करणाचा शासनव्यवहारात अधिकृत वापर करणे बंधनकारक करण्यात येईल. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि शासन यांना संगणकाच्या माध्यमातून परस्परांशी संवाद साधणे सोपे होईल. आवश्यकता असल्यास संबंधितांकडून युनिकोडमधील त्रुटी दूर करण्यात येतील.
२. ‘शुद्ध’ नव्हे, ‘प्रमाण’ लेखन - लेखनाच्या बाबतीत सर्वत्र आणि विशेषत: अध्ययन-अध्यापन या क्षेत्रात प्रमाण लेखनाला शुद्धलेखन संबोधले जाते. त्याऐवजी प्रमाण लेखन असे संबोधण्यात येईल.
३. मुद्द्यांच्या मांडणीसाठी वर्णक्रम - लेखनामध्‍ये एखाद्या मुद्द्याच्‍या मांडणीचे विशिष्‍ट पद्धतीने वर्गीकरण करताना क्रमशः ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ इत्यादी अक्षरांचा उपयोग करून उपमुद्द्यांची मांडणी करण्‍याची पद्धत आपल्‍याकडे बरीच रूढ झाली आहे. ही अक्षरे इंग्रजी भाषेतील ‘A’, ‘B’, ‘C’, ‘D’ इ. वर्णांचा क्रम व उच्‍चार यांना अनुसरणारी आहेत. मराठी भाषेमध्‍ये लेखन करताना अशा प्रकारे इंग्रजी वर्णमालेतील वर्णांचा क्रम अनुसरण्‍याऐवजी मराठी वर्णमालेनुसार ‘अ’, ‘आ’, ‘इ’, ‘ई’ इत्यादी अक्षरांचा उपयोग करण्‍याची पद्धत स्‍वीकारण्‍यात येईल.
४. कार्यक्रमफलक मराठीत - राज्य शासनाच्या सर्व कार्यक्रमांत मंचावर दर्शनी भागात लावण्यात येणार्‍या माहितीफलकावरील कार्यक्रमविषयक मजकूर प्रथम ठळक अक्षरात मराठीमध्ये असेल आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार अन्य भाषेत/भाषांत असेल.
५. सूचनाफलक लेखन - शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इ. ठिकाणी मराठी भाषेतून विविध सूचना देणारे फलक लावले जात असतात. अशा फलकांवरील सूचनांचे लेखन प्रमाण मराठी भाषेच्‍या नियमांचे पालन करणारे असावे, अशी अपेक्षा असते. या सूचना फलकांवर लिहिण्‍यापूर्वी त्‍या बिनचूक असल्‍याची खातरजमा जाणकार व्यक्तींकडून करून घेण्‍याविषयी संबंधितांना सांगण्‍यात येईल. सूचनाफलक लावण्‍याच्‍या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक म्‍हणून या बाबीकडे पाहिले जाईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes