ज्ञानाचे संचयन आणि संक्रमण स्थलकालांच्या मर्यादा ओलांडू शकते, ते
प्रामुख्याने भाषेमुळेच होय. संगीतनृत्यांपासून ते चित्रशिल्पांपर्यंत
नानाविध कलांना अधिक आस्वाद्य बनविण्याचे कार्यही भाषा नक्कीच करते. ती
एकीकडे व्याकरणाच्या आणि लेखनपद्धतीच्या नियमांचा मानही राखते आणि दुसरीकडे
काळाच्या ओघात त्या नियमांच्या संहितेला वेगळे वळण देऊन आशयाला सतत
ताजेपणाही देत राहते. ती ललित साहित्यापासून ते गंभीर विवेचनापर्यंत विविध
मार्गांनी अंतर्बाह्य सृष्टीला अभिव्यक्त करते. भाषेचे हे अंगभूत सामर्थ्य
ओळखून मराठी भाषेला अधिक विकसित करणे आवश्यक आहे. शब्दसृष्टी आणि साहित्य
यांच्या बाबतीत पूर्वीपासूनच समृद्ध असलेली मराठी भाषा आधुनिक काळाची
आव्हाने पेलण्यासाठी सर्व अंगांनी सतत विकास पावत संपन्न अशी ज्ञानभाषा
व्हायला हवी. मराठी भाषा आणि देशातील व विदेशांतील भाषा यांच्यामध्ये
परस्पर साहित्य-व्यवहार वृद्धिंगत झाल्यास मराठीची समृद्धी होण्याबरोबरच
महाराष्ट्राची संस्कृती सर्वदूर पोहचण्यास मदत होईल. शिवाय, आशयाच्या
संपन्नतेबरोबरच मराठीची लेखनपद्धती तर्कशुद्ध, सुलभ आणि गतिमान करणेही
गरजेचे झाले आहे. या सर्व बाबी ध्यानात घेऊन शासन मराठी भाषा व साहित्य
यांच्या विकासासाठी विविध उपक्रम अमलात आणेल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ