गुरुवार, एप्रिल ०७, २०११

क्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख

विश्वचषक अंतिम सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत बी.सी.सी.आय. ने प्रत्येक खेळाडूला एक करोड रुपये देण्याची घोषणा केली.  भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला आणि  गर्भश्रीमंत असणाऱ्या सर्व खेळाडूंवर बक्षिसांच्या रुपाने करोडो रुपयांची उधळण झाली.  खेळाडूंना पैसा देण्यास आमचा विरोध नाही. परंतु क्रिकेटकडे इतके लक्ष देत असताना या देशातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न नजरेआड करून चालणार नाहीत.  जे लोक  देशासाठी आपली जमीन देतात. त्यांच्या जमिनीवर अनेक प्रकल्प उभे राहतात, त्या लोकांना मात्र आपले गाव सोडून आश्रीतासारखं दुसऱ्याच्या गावात राहायला लागतं. त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. या सर्व समस्या सोडवण्यासाठी हजारो लोक दररोज संघर्ष करत आहेत. खेळाडूंना सामना जिंकल्यावर बक्षीस देण्यासाठी जशी तत्परता दाखवली, तशी तत्परता प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी का दाखवली जात नाही ?  त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी वणवण भटकावं लागतं. काबाडकष्ट करावे लागतात. यांनी केलेल्या त्यागामुळे प्रकल्प उभे राहतात. त्याचा लाभ संपूर्ण देशाला होतो. तरीही ज्यांनी त्याग केलाय त्यांच्याकडे पाहायला सरकारला सवड नाही. क्रिकेटचा सामना हरला तर आपण रागाने लालबुंद होतो. खेळाडूंना शिव्या देतो. जर सामना जिंकला तर रस्त्यावर येवून जल्लोष करतो. खूप आनंदित होतो. परंतु या देशात लाखो लोक अत्यंत दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. त्याचे भान कुणाला आहे. या देशात अनेकांना आजही माणसाप्रमाणे स्वाभिमानी जीवन जगता येत नाही त्याचा खेद आपणाला वाटत नाही ? या देशात हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी काय प्रयत्न होतात ? चार-दोन हजार रुपयांची सरकारी मदत मिळाली म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुटला असे समजायचे का ?


अनेकांना वाटेल काय हा माणूस आहे. भारताने विश्वचषक जिंकला त्याचा आनंद साजरा करायचा राहिला बाजूला आणि काहीतरी बरळत बसलाय.  माझी एकच विनंती आहे. विश्वचषक जिंकल्याचा आनंद जरूर साजरा करा. पण ते करत असताना आजही भारतातील लाखो लोक काय जीवन जगत आहेत ते विसरू नका. त्या उपेक्षित लोकांची मुले आजही प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्याही भविष्याचा विचार आपणाला करावा लागेल. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. लाखो लोक आपल्या मुलभूत अधिकारांसाठी रोज संघर्ष करताहेत. तरीही सरकारला त्यांच्याकडे बघावसं वाटत नाही. त्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची जबाबदारी आपली नाही का ? कारण त्या लोकांनी त्याग केला नसता तर आपणाला अनेक सोयी-सुविधांपासून वंचित राहावं लागलं असतं.  स्वतंत्र (?) भारताचं दुर्दैव हे कि इथे माणसांच्या मुलभूत हक्क-अधिकारापेक्षा इतर गोष्टींनाच जास्त महत्व दिले जाते. ज्यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे त्यांनाच अनेक सवलती दिल्या जातात. त्यांच्यावरच पैशाची उधळण केली जाते. पण जे खरोखर वंचित, उपेक्षित आहेत त्यांच्या वाटयाला केवळ निराशाच आली. क्रिकेटच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जसे आपण रस्त्यावर आलो त्याचप्रमाणे वंचित लोकांच्या हक्कासाठी सर्वजण रस्त्यावर उतरले पाहिजेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes