विश्वचषक अंतिम सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत बी.सी.सी.आय. ने प्रत्येक खेळाडूला एक करोड रुपये देण्याची घोषणा केली. भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला आणि गर्भश्रीमंत असणाऱ्या सर्व खेळाडूंवर बक्षिसांच्या रुपाने करोडो रुपयांची उधळण झाली. खेळाडूंना पैसा देण्यास आमचा विरोध नाही. परंतु क्रिकेटकडे इतके लक्ष देत असताना या देशातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न नजरेआड करून चालणार नाहीत. जे लोक देशासाठी आपली जमीन देतात. त्यांच्या जमिनीवर अनेक प्रकल्प उभे राहतात, त्या लोकांना मात्र आपले गाव सोडून आश्रीतासारखं दुसऱ्याच्या गावात राहायला लागतं. त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. या सर्व समस्या सोडवण्यासाठी हजारो लोक दररोज संघर्ष करत आहेत. खेळाडूंना सामना जिंकल्यावर बक्षीस देण्यासाठी जशी तत्परता दाखवली, तशी तत्परता प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी का दाखवली जात नाही ? त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी वणवण भटकावं लागतं. काबाडकष्ट करावे लागतात. यांनी केलेल्या त्यागामुळे प्रकल्प उभे राहतात. त्याचा लाभ संपूर्ण देशाला होतो. तरीही ज्यांनी त्याग केलाय त्यांच्याकडे पाहायला सरकारला सवड नाही. क्रिकेटचा सामना हरला तर आपण रागाने लालबुंद होतो. खेळाडूंना शिव्या देतो. जर सामना जिंकला तर रस्त्यावर येवून जल्लोष करतो. खूप आनंदित होतो. परंतु या देशात लाखो लोक अत्यंत दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. त्याचे भान कुणाला आहे. या देशात अनेकांना आजही माणसाप्रमाणे स्वाभिमानी जीवन जगता येत नाही त्याचा खेद आपणाला वाटत नाही ? या देशात हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी काय प्रयत्न होतात ? चार-दोन हजार रुपयांची सरकारी मदत मिळाली म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुटला असे समजायचे का ?



प्रकाश पोळ

Posted in: