![]() |
निधी चौधरी (IAS) |
IAS अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीजींबद्दल एक ट्विट केले आणि महाराष्ट्रभर वादाचा धुरळा उडाला. यामध्ये अनेक जण सामील झाले अन निधी चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी केली गेली. माध्यमांनी हा विषय फारच लावून धरला. माध्यमांच्या अति जागृकतेमुळे आणि सोशल मीडियामधील नेटिझन्समुळे गेली चार दिवस हा विषय खूपच तापला. महात्मा गांधींसारख्या राष्ट्रपित्यावर अशा पद्धतीने कुणी टीका केली, त्यांचे पुतळे तोडा वगैरे म्हटलं तर लोकांना राग येणं साहजिकच आहे. ज्यांना गांधी पटतात वा किमान त्यांना विरोध तरी नाही असे सर्व लोक व्यक्त झाले. निधी चौधरी यांच्यावर चोहोबाजूंनी तुफान टीका झाली. यामुळे त्यांची बदली मंत्रालयात केली गेली.
पण वादाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी निधी यांनी हे ट्विट उद्विग्नपणे केलं असून ते उपरोधिक आहे अशा प्रकारची बातमी बाहेर आली. निधी यांचे जुने ट्विट, जुन्या पोस्ट वाचल्या तर याची खात्री पटेल. निधी यांनी गांधीजींना विरोधासाठी टीका केली नसून सध्याच्या सामाजिक वातावरणाची चीड म्हणून ते उपरोधिक ट्विट केले होते. निधी या कोणत्या विचाराने प्रेरित आहेत हे 99% लोकांना माहीत नसल्याने सर्वांना त्या गांधी विरोधक वाटल्या. माध्यमांनी या गोष्टीला खतपाणी घातले. आणि निधी यांनी खरंच गांधीजींवर टीका केल्याचा आव आणत माध्यमांसकट सर्वजण त्यांच्यावर तुटून पडले. चार-पाच दिवस त्यांना खूप ट्रोल केले गेले. आता सत्य बाहेर येऊनही ज्या वेगाने असत्य पसरवले गेले त्या वेगाने सत्य मात्र पसरताना दिसत नाही. माध्यमांनी निधी यांच्या ट्विटची बातमी देताना त्यांच्याशी बोलून सत्य परिस्थिती समोर आणायला हवी होती. मात्र अपवाद वगळता सर्व माध्यमे सत्य दडपून ठेऊन निधी यांनी गांधीजींवर टीका केली अशीच बातमी शेवटपर्यंत दाखवत होते. सत्याच्या मुळाशी जायला कोणीच तयार नव्हते. सोशल मीडिया मधून मात्र निधी यांची बाजू काहीजण मांडत आहेत. सध्या महात्मा गांधी यांबद्दल केली जाणारी टीका, गोडसेचा उदो उदो करून गांधी विचार संपविण्याचे प्रयत्न विविध स्तरावरून होत आहेत. या सर्व गोष्टींमुळे उद्विग्न होऊन निधी यांनी ते ट्विट केले. ते उपरोधिक आहे. ते गांधीजींच्या प्रेमापोटी आलेले आहे. गांधी विचार टिकला पाहिजे या उदात्त भावनेने परंतु संतापाने ते लिहिले आहे. परंतु निधी यांची खदखद, त्यांचा उपरोध आम्ही समजू शकलो नाही. निधी यांच्यावर आम्ही पातळी सोडूनही टीका केली. शेवटी या वादावर निधी यांनी अतिशय दुःखी मनाने केलेल्या कवितेच्या काही ओळी पाहिल्या तरी सत्य लक्षात येईल. निधी लिहितात,
मैने तो बस दुःखी मन से एक व्यंग लिखा था |
बदले बदले हालातो पर क्षुब्ध होकर तंज कसा था |
क्या देख नही पाये तुम वो चेहरा आसूओं से लबरेज |
निधी आम्हाला माफ करा. जिथे आम्ही अजून गांधींना समजून घेतले नाहीत तिथे निधी यांना कसं समजून घेणार?
१. मीडिया मतलबी आहे. आपला छुपा अजेंडा राबवण्यासाठी ते एखाद्याला बदनाम करू शकतात किंवा बदनाम व्यक्तीला हिरो बनवू शकतात.
२. सोशल मीडिया मध्ये 90% लोक मेसेज फॉरवर्ड करताना घाई करतात. मेसेज ची सत्यता तपासून पाहिली जात नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे हे नेटिझन्स प्रवाहाच्या दिशेने वाहतात.
३. चुका सर्वांकडून होऊ शकतात. निधी यांची विचारसरणी कुणाला फारशी माहिती नसल्याने त्यांच्या ट्विट मधील उपरोध समजू शकला नाही. परंतु आता सत्य बाहेर आल्यानंतर त्यांची माफी मागायलाही लाज न वाटावी.
४. मीडियाने थेट त्यांच्याशी बोलून त्यांचे मत जाणून घेतले असते, सत्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न केला असता तर एवढा गहजब झाला नसता. माध्यमांनी येथे जाणीवपूर्वक चूक केली असे म्हणायला वाव आहे.
५. निधी यांच्या विरोधात ट्रोलिंग/टीकेचा प्रवाह इतका जबरदस्त होता की त्यामध्ये निधी यांचा एकटीचा आवाज विरून गेला.
६. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निधी चौधरी आणि पायल रोहतगी यांच्या वादग्रस्त ट्विट आणि त्याबद्दलच्या चर्चांमुळे डॉ. पायल तडवीच्या आत्महत्या/रॅगिंग/जातीय अत्याचाराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
1 टिप्पणी(ण्या):
get best marathi news updates on marathi news
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ