गुरुवार, एप्रिल १४, २०११

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती

१. लोकसाहित्य समिती - लोकसाहित्याचे संकलन व प्रकाशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या लोकसाहित्य समितीला अधिक आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या समितीचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल.
२. आदिवासी कोश - महाराष्ट्रातील आदिवासींचा सामाजिक-सांस्कृतिक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या समग्र
अभ्यास करून त्याचा कोश तयार करण्यात येईल. यासाठी वेगळे स्वतंत्र मंडळ नेमण्यात येईल अथवा हे कार्य पुणेस्थित आदिवासी संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडे किंवा अशा प्रकारच्या संशोधनाचे कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांकडे/ विद्यापीठांकडे सोपविण्यात येईल.
३. जाती-जमाती कोश - महाराष्ट्रातील विविध जातींचा आणि आदिवासींखेरीज इतर जमातींचा सामाजिक-सांस्कृतिक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या समग्र अभ्यास करून त्याचा कोश तयार करण्यात येईल. यासाठी वेगळे स्वतंत्र मंडळ नेमण्यात येईल अथवा 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'कडे हे काम सोपविण्यात येईल किंवा अशा प्रकारच्या संशोधनाचे कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांकडे/ विद्यापीठांकडे हे कार्य सोपविण्यात येईल.(अंतीम आवृत्तीतून वगळले)
४. ग्रामीण जीवन कोश - शेती व तत्संबंधित पारंपरिक ग्रामीण जीवनाशी व व्यवसायांशी तसेच अन्य कारागिरांच्या व्यवसायांशी निगडित अनेक संज्ञा, संकल्पना आणि वस्तू काळाच्या ओघात लोप पावत चालल्या आहेत. अशा संज्ञा व संकल्पना यांचा सचित्र स्वरूपातील कोश तयार करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येईल. हे कार्य ‘लोकसाहित्य समिती’ वा तत्सम संस्था यांच्याकडे सोपविण्यात येईल.
५. स्थित्यंतरांचा इतिहास - एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून आतापर्यंत महाराष्‍ट्रात झालेल्‍या सामाजिक-सांस्‍कृतिक स्थित्यंतरांचा इतिहास लिहिण्‍यात येईल. ‘राज्य साहित्य संस्कृती मंडळा’मार्फत हा प्रकल्प राबविण्यात येईल.
६. फुले-शाहू-आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन मंडळ - महात्‍मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, कार्य आणि लेखन याबाबतची सामग्री प्रकाशित करण्यासाठी सध्या अस्थायी स्वरूपात तीन समित्‍या कार्यरत आहेत. या तिन्ही महामानवांच्या कार्यांत व विचारांत एकवाक्यता आहे. म्हणून तिन्ही समित्यांच्या कार्यात समन्वय असणे व्यवहार्य ठरेल. शिवाय, या समित्यांचे कार्य अधिक गतिमान करणे, या कार्यात एकसूत्रता आणणे आणि त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतुदीसह व्यापक स्वरूपाची स्वतंत्र व स्थायी प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी ‘फुले-शाहू-आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन मंडळ’ स्थापन करण्‍यात येईल. या मंडळाच्या तीन समित्या मंडळाच्या अंतर्गत पण स्वतंत्रपणे कार्य करतील. त्‍यासाठी दरवर्षी गरजेनुसार स्‍वतंत्र आर्थिक तरतूद करण्‍यात येईल.
७. सण कोश - राज्‍यामध्‍ये वर्षभरात विविध सण साजरे केले जातात. काही सणांना विशिष्‍ट गाव, शहर, प्रादेशिक विभाग इ. ठिकाणचे स्‍थानिक वेगळेपण व महत्त्व असते. एकच सण वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो, असेही घडते. हे सण हा सांस्‍कृतिक जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. म्‍हणून अशा सणांची माहिती कोशरुपाने प्रकाशित केली जाईल. हे कार्य ‘लोकसाहित्‍य समिती’कडे सोपविले जाईल.
८. जत्रा आदींचे माहिती प्रकाशन - राज्‍यात गावोगाव विविध जत्रा, यात्रा, मेळे, उरूस, शीख समाजाचा हल्लाबोल, फेस्ता, फेअर इत्यादींचे आयोजन केले जात असते. या आयोजनांच्‍या प्रसंगी वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक सांस्‍कृतिक उपक्रम राबविले जातात. अशा प्रकारचे उपक्रम हे महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक जीवनाचे एक महत्त्वाचे अंग आहे. अशा जत्रा आदींचा परिचय करुन देणा-या जिल्हावार माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्‍यात येतील. या पुस्तिकांच्‍या आधारे त्‍यांचा राज्‍य पातळीवरील कोश तयार करण्‍यात येईल. हे कार्य ‘लोकसाहित्‍य समिती’कडे सोपविले जाईल.
९. जाती-जमाती भाषा कोश/संशोधन - महाराष्ट्रातील ज्या जाती-जमातींच्या मातृभाषा प्रमाण मराठीपेक्षा, मराठी बोलींपेक्षा अथवा हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू इत्यादी आधुनिक/अभिजात भाषांपेक्षा वेगळ्य़ा आहेत, त्यांच्या भाषांसाठी लिपी निश्चित करणे, कोश तयार करणे, तसेच त्यांचे मौखिक व लिखित साहित्य, रूढी, मिथके इत्यादींचे अध्ययन/संशोधन करणे इत्यादी उद्देशांनी कार्य करणार्‍या व्यक्तींना/संस्थांना अर्थसाहाय्य दिले जाईल.
१०. अन्य साहित्य संमेलने अनुदान - मुख्य मानल्या गेलेल्या प्रवाहापेक्षा वेगळ्या प्रवाहातील जनसमूहांच्या आणि उपेक्षित वर्गांच्‍या मराठी साहित्य संमेलनांनाही त्या त्या संमेलनाच्या एकंदर स्वरूपावर आधारित अनुदान देण्यात येईल. ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ या संदर्भात प्रस्ताव तयार करील.
११. ग्रामीण विद्यार्थी मार्गदर्शन - ग्रामीण भागांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना शहरी भागात वावरताना भेडसावणार्‍या समस्यांची माहिती देणारे आणि त्या समस्यांवर मात करण्याविषयी, तसेच त्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या अंगभूत क्षमतांचा विकास आणि गुणवत्‍तेचा आविष्‍कार करण्‍याविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण आवश्यक असते. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अशा प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याविषयी शैक्षणिक संस्थांना सांगण्यात येईल.
१२. अप्रयोगार्ह शब्द सूची - पूर्वी प्रचलित असलेले काही शब्‍द, वाक्प्रचार, म्‍हणी वगैरेंची प्रयोगार्हता आता वेगवेगळया कारणांनी कालबाह्य झाली आहे. आपले सार्वजनिक जीवन न्यायाधिष्ठित, संघर्षरहित, निकोप व अभिरुचिसंपन्न ठेवण्‍याच्‍या दृष्‍टीने असे वाक्प्रयोग टाळता यावेत म्हणून शिक्षक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत, राजकीय नेते वगैरेंना अशा शब्‍दांची माहिती असणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी अशा शब्‍दांची सूची तयार करण्‍यात येईल. ‘यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी’ सारख्या (‘यशदा’सारख्या) संस्थेमार्फत अशी सूची तयार करण्यात येईल. इतिहास, समाजशास्‍त्र, भाषाशास्‍त्र इत्‍यादी स्वरूपाच्या लेखनामध्‍ये अशा शब्‍दांचा निर्देश करणे अपरिहार्य असल्‍यास तो निर्देश अपवाद म्‍हणून आणि निकोप हेतूने केला जावा, अशी अपेक्षा असेल. अप्रयोगार्ह शब्‍दांची काही उदाहरणे परिशिष्ट क्रमांक २ मध्ये दिली आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes