हल्ली माणसाच्या भावना कशाने दुखावल्या जातील हे सांगता यायचे नाही. चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचे आणि त्याविरुद्ध कुणी बोलले, लिहिले कि आमच्या भावना दुखवल्या म्हणून बोंब मारायची हे नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे माणसांच्या भावनांचा कितपत विचार करायचा याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही कि माणसाच्या भावनेला, त्याच्या श्रद्धेला काहीच किंमत नाही. चांगल्या गोष्टींबद्दल समाजात अनेक जणांची चांगली भावना असते. त्याला विरोध करायचे काहीच कारण नाही. परंतु समाजातील एखाद्या अनिष्ट रूढीचे, प्रथेचे समर्थन समाज करू लागला तर अशा वेळी मात्र त्यांच्या या भावनेचा विचार करून त्या अनिष्ट रुधीविरुद्ध कुणी बोलायचे, लिहायचे नाही हे कोणत्याही सुज्ञ माणसाला पटणार नाही.
पूर्वी समाजात सतीप्रथा, बालविवाह, केशवपन यासारख्या अनेक अनिष्ट रूढी अस्तित्वात होत्या. भारतातील समाजव्यवस्था ही पुरुषप्रधान असल्याने साहजिकच स्त्रियांवर बंधने लादणार्या या परंपरा समाजातील विशिष्ठ लोकांनी तयार केल्या. त्या परंपरा मुठभर लोकांचे हित जोपासणाऱ्या असल्याने या लोकांनी या परंपरा कशा टिकतील, त्याचे कसे संवर्धन होईल याची नेहमीच काळजी घेतली आहे. भारतातील अनेक समाजसुधारकांनी या परंपरा नष्ट करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. नंतर भारतात ब्रिटीशांचा अंमल सुरु झाल्यानंतर मात्र या परंपरा नष्ट करण्यासाठी कायदे निर्माण केले गेले. त्यावेळीही लोकांना इंग्रज सरकारचे आपल्यावरती सामाजिक, धार्मिक आक्रमण वाटत होते. अर्थात ब्रिटीशांच्या इतर धोरणाकडे तात्पुरते दुर्लक्ष केले तर आपणास असे दिसून येईल कि ब्रिटीशांनी कुणाचीही परवा न करता या अन्याय्य चाली बंद करण्यासाठी कडक आणि योग्य धोरण अवलंबले. त्या अनिष्ट प्रथा बंद झाल्याने आपला सामाजिक विकास होण्यास मदतच झाली. जर ब्रिटीशांनी त्यावेळी लोकांच्या भावनांचा विचार करून या प्रथा तशाच चालू ठेवल्या असत्या तर आज समाज कुठे असता ? महत्वाचा मुद्धा हा आहे कि लोकांच्या भावना जर चुकीच्या गोष्टीशी निगडीत असल्या तर आपण केवळ या भावनांचा विचार करून अनिष्ट प्रथांचे समर्थन करायचे का ?
परवा वानखेडे मैदानावर सत्यनारायण पूजेचा विधी करण्यात आला. मग जागृत आणि सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तींनी त्या गोष्टीला विरोध केला तर बिघडले कुठे ? साधारण वर्षभरापूर्वी सातार्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका नव्या कक्षाचे उद्घाटन सत्यनारायण पूजेने केले. जर जिल्हाधिकारी कार्यालयातच अशा प्रकारे अंधश्रद्धांचे उदात्तीकरण केले गेले तर सर्व सामान्य जनतेत कोणता संदेश जाईल ? त्यावेळी दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार विजय मांडके यांनी या चुकीच्या गोष्टीविरुद्ध वृत्तपत्रातून आवाज उठवला होता. यावेळीही लोकमतचे पत्रकार नितीन सावंत यांनीही या वानखेडे मैदानातील सत्यनारायण पुजेची बातमी वृत्तपत्रात दिली. त्यांचे अभिनंदन करायचे राहिले बाजूला पण त्यांनाच "कोत्या मनाचे पत्रकार" म्हणून हिणवले गेले. म्हणजे आपण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत राहायचे आणि जे त्या गोष्टीना विरोध करतील त्यांना कोत्या मनाचे, असहिष्णू ठरवायचे हा दुटप्पीपणा आहे. पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यांनी सर्व सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व वृत्तपत्राद्वारे करून अन्याय्य गोष्टीना विरोध केला पाहिजे. पण समाजात असे किती पत्रकार आहेत जे खरोखर समाजहिताची भूमिका घेतात ? पत्रकार आणि प्रसारमाध्यमे यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. परंतु या नकारात्मक वातावरणात हि विजय मांडके किंवा नितीन सावंत यांच्यासारखे सत्याची चाड आणि अन्यायाची चीड असणारे पत्रकार समाजात आहेत हीच आमच्यासारख्या सर्व सामान्य लोकांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमांची गोष्ट आहे.
'लोकप्रतिनिधींच्या अंधश्रद्धा' हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
'लोकप्रतिनिधींच्या अंधश्रद्धा' हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
5 टिप्पणी(ण्या):
Atishay chhan lekh ahe. Satyanarayan kinva tatsam andhashraddhana apan haddapar kele pahije.
मांसाहार अशास्त्रीय , असमर्थनीय
सतीश कामत यांचा ' शाकाहारी हिंसा ' लेख अनावश्यक दर्प व कुतर्क यांचा शिकार आहे. या संदर्भात काही गोष्टींचा विचार आवश्यक आहे.
(1) भारतीय घटनेत काही मूलभूत कर्तव्ये सांगितली आहेत. article 51 a-it shall be the duty of every citizen of India to have compassion for living creatures .
2) नैतिकदृष्ट्या समर्थ , सशस्त्र असलेल्याने असमर्थ , नि:शस्त्राशी कसे वर्तन करावे ? मी मुक्या प्राण्याला माझ्या उपभोगासाठी मारत असेन तर व्यक्ती , समाज , राष्ट्र म्हणून आमच्यापेक्षा समर्थ , सशस्त्र असलेल्याकडून वेगळी अपेक्षा करू नये.
(3) पालक/ मेथी व बकरी/ कोंबडी हे दोन्ही सजीव असले तरी तुलना शक्य नाही. कारण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत फळे/ भाजीपाल्याचा विकास होतो , त्यानंतर ते सडायला/ खराब व्हायला लागतात. तेव्हा ते खाऊन मानवाने आपला विकास करावा , हीच अपेक्षा आहे. ही अपरिहार्य अशी क्षम्य हिंसा आहे. परंपरा व शास्त्र न समजून घेता शाकाहाराला मांसाहार ठरवणे ही विकृती आहे.
(4) एक किलो मांस तयार व्हायला प्राण्याला सुमारे 25 किलो गवत खावे लागते. हे पर्यावरणाला धोकादायक आहे.
(5) निसर्गसंकेतानुसार मनुष्य शाकाहारीच आहे. सस्तन मांसाहारी प्राणी चाटून , जीभ बाहेर काढून पाणी पितात व शाकाहारी प्राणी पाणी खेचून/ओढून पितात. शाकाहारी दिवसा जागतात , रात्री झोपतात. मांसाहारी दिवसा झोपतात व रात्री शिकार शोधतात. मांसाहारी प्राण्यांना बाह्य उपकरणे लागत नाहीत , माणूस मात्र बाह्य साधने व अग्नीचा उपयोग मांसाहारासाठी करतो. लाळेचा प्रकार , आतड्यांची लांबी इ. अनेक गोष्टींचा विचार करताही माणूस शाकाहारीच आहे.
(6) मांसाहारी व्यक्ती/ समाज हिंसेला अधिक लवकर प्रवृत्त होऊ शकतो. इतिहाससुद्धा हेच सांगतो.
(7) गांधीजी कट्टर शाकाहारी होते. सोयीचे नसेल तर आम्ही त्यांना बरोबर टाळतो.
मांसाहारी व्यक्तींना कशी वागणूक मिळते इ. चर्चा करण्यापेक्षा शाकाहार योग्य की मांसाहार , ही चर्चा अधिक प्रबोधन करेल.
- गिरीश शांडिल्य , नाशिक
मागोवा
मुंबईत शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा वाद पेटला तेव्हा त्यातून उपवाद निर्माण झाला तो शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार श्रेष्ठ असा. आणि उप उपवाद निर्माण झाला तो माणूस निसर्गत: शाकाहारी की मांसाहारी असा. माणूस निसर्गत: शाकाहारीच , अशी , शाकाहारश्रेष्ठत्वाचाही छुपा युक्तिवाद मांडणारी प्रतिक्रिया व्यक्त होताच मिश्राहारीही सरसावले आणि माणसाच्या आहाराच्या सवयींचा ' मागोवा ' च वाचकांनी घेतला...
माणूस 15 लाख वर्षे सर्वभक्षी !
' रविवार संवाद ' मधील ' मांसाहार , अशास्त्रीय , असमर्थनीय ' हे गिरीश शांडिल्य यांचे पत्र वाचले. त्यांचे मुद्दे न पटणारे व अशास्त्रीय आहेत.
मानवाच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीच्या काळात तो द्विपाद व वानरसदृश असताना झाडावर राहणारा व मुख्यत: झाडांची पाने व फळे खाणारा होता. तेव्हा त्याच्या मेंदूचा आकार केवळ 450 घनसेमी होता ; परंतु अंदाजे 17 लाख वर्षांपूवीर्च्या काळात मेंदूच्या आकारात 700-800 घनसेमीपर्यंत वाढ झाली , तेव्हा तो मोठ्या प्राण्यांची शिकार करायला लागला. तेव्हापासून त्याच्या आहारात बदल झाला तो कायमचाच.
शास्त्रज्ञांनी 229 शिकारी जमातींची आहारातील सूचक गोष्टींच्या आधारावर पुनर्रचना केली , तेव्हा असा निष्कर्ष निघाला की , 40 लाख वर्षांपूवीर् कसेबसे केवळ वनस्पतींवर तगून राहणारा मानव मोठया प्रमाणात प्राणीजन्य आहार घेत होता. अर्ध्याहून अधिक जमातींना दोन-तृतियांश कॅलरी प्राणीजन्य आहारातून मिळत होत्या. उत्तर धृवीय प्रदेशातील एस्किमोंचा आहार तर 95 टक्के मांसाहारी होता. अन्नधान्यातून मिळणाऱ्या आहाराचे प्रमाण प्राचीन मानवात अत्यंत अल्प होते.
सांगाड्यांच्या अवशेषावरून केलेल्या अभ्यासातून असे दिसते की , लोकांच्या आहारात अंदाजे 60 टक्के प्राणीजन्य आहार , तर उरलेले 40 टक्के वनस्पतीजन्य आहार असे प्रमाण असावे. काही शास्त्रज्ञांच्या मते , आपल्या पचनसंस्थेमध्ये मांसाहारी प्राण्यांत आढळणारे अनेक गुणधर्म आढळतात. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे आपल्या आतड्यात अमिनो आम्ल टाऊरीन (taurine) बनविणाऱ्या वितंचकांची उणीव असते. शाकाहारी प्राण्यांमध्ये या वितंचकाची पातळी जास्त असते. बीटा कॅरोटीनचे व्हिटामिन-ए मध्ये रूपांतर करणाऱ्या वितंचकाचे प्रमाण तसेच 20 आणि 22 कार्बन फॅटी आम्लामध्ये रूपांतर करणाऱ्या वितंचकाचे प्रमाण मानवामध्ये शाकाहारी प्राण्यांपेक्षा कमी असते.
वानरांच्या चार जातींच्या आतड्यांच्या रचनेपेक्षा मानवांच्या आतड्याची रचना भिन्न आढळते. मानवाचे मोठे आतडे आखूड आहे , तर लहान आतडे लांब आहे , जवळपास मांसाहारी प्राण्यांसारखे. प्रख्यात आहारतज्ज्ञ डॉ. अॅटकीन यांचा युक्तिवाद असा की , आपला आहार काबोर्हायड्रेटरी मेळ बसायला योग्य नाही. स्वास्थ्यकारक जीवनासाठी प्रोटीन व मेदयुक्त आहाराची ते शिफारस करतात. उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आणि मानववंश शास्त्रज्ञ यांनी मानवाची गणना ' सर्वभक्षी ' ( प्राणी आणि वनस्पतीजन्य आहार घेणारा) प्राण्यांत केली आहे. सुमारे 15 लाख वर्षांपासून मानवाचा आहार सर्वभक्षी (Omnivorous) राहिला आहे.
- डॉ. तरुण खिलारे , डहाणू , ठाणे.
युक्तिवाद अशास्त्रीय , असमर्थनीय
गिरीश शांडिल्य यांचा युक्तिवाद अशास्त्रीय आणि असमर्थनीय आहे. त्यांच्या मुद्द्यांबरहुकूम कारणे पुढीलप्रमाणे:-
1) भूतदयेचा संबंध मांसाहाराशी जोडणे चुकीचे ठरेल ; सोवळं पाळण्यासाठी मांग-महारांचा द्वेष करून पशुपक्ष्यांवर प्रेम दाखविणाऱ्या शाकाहारींपेक्षा , सर्वांशी मिळून-मिसळून वागून पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या मांसाहारींची ' भूतदया ' च अधिक श्रेयस्कर ठरेल.
2) मांसाहारींची तुलना आक्रमक साम्राज्यवाद्यांशी करणेही चूक आहे ; कारण पशुपालनात पशूंची काळजीही मानवच घेतो , साम्राज्यवादाच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही.
3) पशु-पक्षी व वनस्पती यांची तुलना करताना हिंसेची विभागणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न लेखकाने केलाय. लेखकाने वनस्पतींप्रमाणेच पशु-पक्ष्यांचे देखील अन्नसाखळीतील स्थान लक्षात घ्यायला हवे होते.
4) पर्यावरणाच्या धोक्याबद्दल एक शंका होती , एक लिटर दूध देण्यासाठी गाय किती किलो गवत खाते ?
5) जीवशास्त्रानुसार मानव ' सर्वाहारी ' (Omnivorous) आहे , इतर सस्तन प्राण्यांपेक्षा त्याच्या पचनसंस्थेत असलेल्या मूलभूत फरकांमुळेच तो न शिजवलेले अन्न पचवू शकत नाही. हीच त्याची मुख्य ओळख आहे.
6) ' इतिहास ' या शब्दाचा उल्लेख करण्यापूर्वी गोध्रा हत्याकांडाच्या प्रतिक्रियेवर नजर टाकली असती , तर बरे झाले असते. जुन्या काळीसुद्धा युद्ध करणाऱ्या क्षत्रियांपेक्षा , यज्ञातील बळी , सती यांसारख्या कर्मकांडांचे , रूढींचे स्तोम माजवणारे ब्राह्माणच हिंसेला अधिक प्रवृत्त नव्हते काय ? कोणाचीही प्रवृत्ती आहारावरून ठरत नसते.
7) मांसाहारी दलितांना महात्माजींनी ' हरिजन ' म्हणून जवळ केले होते , तसं जवळ करणं तर सोडाच , पण त्यांच्या बाजूला राहणंदेखील , स्वत:ला त्यांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांना जमत नाही , हा उल्लेख लेखकाने टाळलाय.
अन्नसाखळीतील मानवाचे स्थान लक्षात घेता मांसाहार कधीच असमर्थनीय ठरत नाही.
- रोशन टिवळेकर , डोंबिवली.
शाकाहारी हिंसेचे काय ?
' मांसाहार अशास्त्रीय... ' हे पत्र गैरसमजांनी परिपूर्ण आणि पूर्वग्रहदूषित आहे.
शाकाहारी माणसे भाजीपाला कापून म्हणजेच त्यांना ' मारून ' च खातात. झाडावरून पडून सडायला लागलेला भाजीपाला वा धान्य खाल्ले जात नाही. गांधीभक्त श्री. शांडिल्य यांनी कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करणे ही गांधीजींशी प्रतारणा ठरेल.
प्राणीशास्त्राबद्दलचे त्यांचे ज्ञान फारच थोटके आहे. अन्य सस्तन , शाकाहारी प्राण्यांप्रमाणे माणूस खेचून/ओढून पाणी पीत नाही.
शाकाहारी/मांसाहारी प्राणी अन्नसेवनासाठी बाह्य साधने वापरत नाहीत. पण , माणूस प्रगत असल्याने , तो कुठलाही अन्नप्रकार कच्चा न खाता त्यावर विविध प्रकारची हत्यारे , भांडी , अग्नी यांचा वापर करून त्याला खाण्यायोग्य बनवतो.
शाकाहारी प्राण्यांच्या तोंडात केवळ पटाशीचे दात आणि दाढा असतात. मांसाहारी प्राण्यांसारखे त्यांना सुळे असत नाहीत. माणसांमधे मात्र या तीनही प्रकारचे दात असतात. त्यामुळे माणूस हा ' मिश्राहारी ' (Omnivorous) आहे.
मांसाहारी प्राणी दिवसभर झोपून फक्त रात्रीच शिकार करतात हा श्री. शांडिल्य यांचा भ्रम आहे.
' मांसाहारी व्यक्ती हिंसेला लवकर प्रवृत्त होते ' हे पांचट विधान सिद्ध करण्यासाठी ' अहिंसावादी गांधीजी हे संपूर्ण शाकाहारी होते ' असे उदाहरण देऊन त्यांनी इतिहासाबद्दलचे अगाध अज्ञान प्रकट केले आहे. दुसऱ्या महायुद्धात लक्षावधी ज्यूंचे शिरकाण करणारा क्रूरकर्मा अॅडॉल्फ हिटलरही संपूर्ण शाकाहारी होता!
- सुधांशु पुरोहित , गुरु तेगबहादुर नगर , मुंबई
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ