कालच अंधश्रद्धेवर टीका करणारा एक लेख लिहिला. वानखेडे स्टेडियम वर झालेल्या सत्यनारायण पुजेसंदर्भात सदर लेख लिहिला होता. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अंधश्रद्धांचे उदात्तीकरण केले तर निश्चितच समाजात चुकीचा संदेश जाईल.
![]() |
येडीयुराप्पा |
लगोलग अंधश्रद्धेवर हा दुसरं लेख लिहायला घेतलाय त्याचे कारण म्हणजे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या अंधश्रद्धाळू स्वभावाच्या चर्चा जनमानसात होवू लागल्या आहेत. येडीयुरप्पा यांना आपल्यावर काळ्या जादूचा वाईट परिणाम झाला असल्याने अनेक संकटे येत आहेत असे वाटत आहे. त्या काळ्या जादूचा प्रभाव संपवण्यासाठी येडीयुराप्पानी एक नामी शक्कल शोधून काढली आहे. अर्थातच त्यांना ही युक्ती त्यांच्या एखाद्या मांत्रिकाने सांगितली असेल. येडीयुराप्पानी लगेच ते प्रमाण मानून तीन दिवस विवस्त्र अवस्थेत फरशीवर झोपणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आपल्यावरील काळ्या जादुंमुळे आलेले संकट निघून जाईल असे येडीयुराप्पाना वाटते. यापूर्वीही येडीयुराप्पांच्या अंधश्रद्धांची काही प्रकरणे समोर आली होती. आता असे अंधश्रद्धाळूच नव्हे तर अंधश्रद्धेच्या पूर्णपणे आहारी गेलेले मुख्यमंत्री समाजाला कोणती शिकवण देणार ? समाजाचा निकोप विकास होण्यासाठी समाजातून अंधश्रद्धांना हद्दपार करण्याची नितांत गरज आहे. अशा वेळी कायद्याचा आधार घेवून अंधश्रद्धा समाजातून संपवण्यासाठी प्रयत्न चालले असताना मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती इतक्या बेजबाबदारपणे अंधश्रद्धांचे पालन आणि समर्थन करू लागली तर त्यांना त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.
![]() |
विलासराव देशमुख |
कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे अंधश्रद्धांच्या आहारी गेले आहेत त्याच प्रमाणे ‘पुरोगामी’ महाराष्ट्रातील माजी मुख्यंमंत्री ही काही कमी नाहीत. विलासराव देशमुख यांचे ‘सत्यसाई प्रेम’ सर्वांनाच ठावूक आहे. कोणताही निर्णय घेताना विलासराव सत्यसाई बाबांचा निर्णय शिरोधार्ह मानतात. निवडणुकीचा अर्ज भरायचा असो की मंत्रीपदाची शपथ असो, प्रत्येक वेळी ते आधी सत्यसाई बाबाचा आशीर्वाद घेवूनच पुढील कार्याला सुरुवात करतात. विलासराव ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते.
![]() |
अशोक चव्हाण |
आदर्श प्रकरणी मुख्यमंत्री पदावरून गच्छंती झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रत्येक बाबतीत विलासरावांशी स्पर्धा करतात. मग अंधश्रद्धांचे पालन करण्याच्या बाबतीत ते कसे मागे राहतील ? पदावरून डच्चू मिळायच्या आधीच काही दिवसापूर्वी सत्यसाई बाबाच्या आदेशानुसार अशोक चव्हाण यांनी आपल्या नावासमोर ‘राव’ लावायला सुरुवात केली. यामुळे त्यांची राजकीय भरभराट होईल असे त्यांना वाटले असावे. परंतु अशोकरावांच्या म्हणा किंवा सत्यसाई बाबाच्या दुर्दैवाने नावापुढे ‘राव’ लावताच अशोकारावांचे पद गेले. त्यातूनही अशोकराव चव्हाण काही शिकले नसणार हे नक्की. कारण एकदा का माणूस अंधश्रद्धांच्या आहारी गेला की त्याला मागचे पुढचे काहीच दिसेनासे होते. तो मानसिक दृष्ट्या गुलाम बनतो. येडीयुरप्पा, विलासराव, अशोकराव हे तिघेही मानसिक दृष्ट्या गुलाम बनलेले आहेत. त्यांचा स्वताच्या कर्तुत्वावर आणि मेहनतीवर ठाम विश्वास असता तर त्यांना अशा भोंदू बाबांचा आधार घ्यावा लागला नसता. दुर्दैव हे की हे तिघेही अनुक्रमे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मातब्बर नेते आहेत. आपापल्या राज्यात त्यांना जनाधार आहे. त्यांचे तिथे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थक अथवा कार्यकर्ते निश्चितच त्यांचे अनुकरण करण्याची दाट शक्यता आहे. आपण आपापल्या राज्याचे नेतृत्व करतो हे भान राखून तरी त्यांनी या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. पण ते विचार करतात का किंवा त्यांची तशी मानसिकता आहे का हे मात्र मला माहित नाही.
अंधश्रद्धांचे उदात्तीकरण हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
अंधश्रद्धांचे उदात्तीकरण हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ