'मातृभाषेविषयी प्रामाणिक भूमिका' आणि 'मराठी शब्दांकडे दुर्लक्ष करणे चुकीचेच' ही पत्रं दि. २१ ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये वाचली. अनेकदा मराठीच्या प्रमाणिकरणाचा किंवा शुद्धतेचा अतिरेकी आग्रह धरला जातो. मायमराठी जगली पाहिजे, वाढली पाहिजे ही प्रत्येक मराठी भाषिकांची प्रामाणिक इच्छा असेल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा म्हणूनही प्रयत्न चालू आहेत. परंतु मराठीचे संवर्धन करण्यासाठी आपण ती भाषाच शुद्ध उच्चार, प्रमाणीकरण, व्याकरण अशा कुंपणानी बंद करणार असू तर तिची अवस्था साचलेल्या डबक्याप्रमाणे होऊन जाईल. भाषा ही नेहमी प्रवाही असते व ती तशीच असली पाहिजे. ज्ञानेश्वरकालीन मराठी, शिवकालीन मराठी आणि सध्या वापरात असलेली मराठी यामध्ये खूप फरक आहे.
भाषेचा लहेजा, उच्चार, व्याकरण यात काळानुसार खूप बदल होत असतात. इतर भाषांचा प्रभाव पडून अनेक नवनवीन शब्द तयार होत असतात. कालांतराने ते नवीन भाषेत इतके चपखल बसतात कि मूळचे कोणत्या भाषेचे शब्द आहेत हेही ओळखता येणे कठीण होते. मराठीवरही संस्कृत, उर्दू, हिंदी, कन्नड, तेलुगू, तामिळ, गुजराती या भारतीय भाषांप्रमाणे इंग्रजी, फारसी, अरबी, पोर्तुगीज या परकीय भाषांचा मोठा प्रभाव आहे. आज आपण मराठीत सर्रास वापरत असलेले अनेक शब्द या भाषांमधून आलेले आहेत.
उदा.
इंग्रजी- सिनेमा, बस, ड्रायवर, फी, एजंट, पेन, डॉक्टर
फारसी- मादी, दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात
अरबी- रयत, इनाम, मंजूर, बातमी
पोर्तुगीज- बटाटा, तंबाखू, कोबी, हापुस
कन्नड- अण्णा, आक्का, तूप, लवंग, गुढी, उडीद
गुजराती- डबा, रिकामटेकडा
तेलुगू- डबी, अनारसा, गदारोळ
तामिळ- पिल्लू, भेंडी, सार, मठ्ठा, चिलिपिल्ली
अशा प्रकारे शब्दांची देवाणघेवाण झाल्याशिवाय भाषा प्रवाही राहत नाही. इतर भाषेतील शब्दांनी मराठीचे मूळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भाषेच्या प्रमाणिकरणाचा व शुद्धतेचा. यातूनच प्रमाण मराठी व ग्रामीण मराठी असा भेद तयार झाला आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या भाषेला कमी लेखले जाते. त्यांच्या भाषेतील उच्चाराच्या व व्याकरणाच्या चूका दाखवल्या जातात. महात्मा फुल्यांनी आपल्या रांगड्या शैलीत ग्रंथनिर्मिती केली जेणेकरून अशिक्षित/अल्पशिक्षित बहुजनांना आपला उपदेश समजेल. परंतु स्वतःला 'मराठी भाषेचे शिवाजी' म्हणवून घेणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी फुल्यांच्या विचारांवर प्रतिवाद न करता त्यांच्या व्याकरणाच्या चुका काढल्या. अशाच प्रकारे अनेक वर्षे ग्रामीण/बहुजन मुलांच्या मनात मराठीबद्दल न्यूनगंड तयार करण्यात आला. मराठी भाषेतील देशी शब्द खरेतर अस्सल मराठी शब्द असताना त्यांना कमी लेखण्यात आले. अशा प्रवृत्तींमुळे खरेतर मराठीचे नुकसान झाले. इथून पुढे हे नुकसान टाळायचे असेल आणि खऱ्या अर्थाने मराठीचे संवर्धन करायचे असेल तर मराठीला तिच्या नैसर्गिक पद्धतीने वाढूदे.
1 टिप्पणी(ण्या):
व्याकरणाचं सोडा, अनेकवेळा, वि० मालिकांत भयानक मराठी असतं. शब्द थोडे इकडे-तिकडे केले तर अधिक परिणामकारक वाटलं असतं अस जाणवत राहतं. शेवटी भावना पोहोचाल्याशी मतलब! पण, तरीही, कितीही झालं तरी, शब्दांचा, पुन्हा लिहितांना अचूक वापर हवाच. आपण https://www.facebook.com/praveenbardapurkarblog प्रवीण बर्दापुर्कारांचे लेख अवश्य वाचावेत. https://goo.gl/cLw3hL वर "माझी माय मराठी, अचूक मराठी " विषयावर त्यांचे विचार वाचायला मिळतील. बाकी लेखा बद्दल धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ