बुधवार, एप्रिल २५, २०१८

मराठी बिग बॉसमधील कलाकारांची विकृत मानसिकता

सध्या मराठी बिग बॉस हा कलर्स वाहिनीवरील रिऍलिटी शो खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमात काही स्पर्धकांना ठराविक दिवस एका घरामध्ये बंद करून ठेवलेले असते. त्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात आणि त्यातून नामांकन व मतदानाच्या प्रक्रियेने एकेका स्पर्धकाला बाद ठरवले जाते. त्या घरातील स्पर्धकांचा बाहेरील जगाशी काहीही संबंध नसतो. मात्र घरात काय चालुय हे बाहेर सर्व जग पाहू शकते. 



कलर्स वाहिनीने कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'यात कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा अपमान करण्याचा व कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही', हे स्पष्ट केले आहे. तरीही २४ एप्रिल च्या भागात कार्यक्रमातील एक स्पर्धक राजेश श्रुंगारपुरे याने अतिशय आक्षेपार्ह विधान केले. या भागात काही स्पर्धकांच्या अंगावर त्यांच्या विरोधी संघातील स्पर्धकांनी कचरा, शाम्पू अशा प्रकारच्या गोष्टी टाकल्या. मुळात टास्क हाच होता कि अंगाला हात न लावता विरोधी संघातील स्पर्धकांना संतप्त करायचे. या प्रकाराने संतत्प होऊन श्रुंगारपुरे याने असे उद्गार काढले कि ,'असली फालतुगिरी, चिप झोपडपट्टी मेन्टलिटी मला चालणार नाही'. भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना कलम १९ ने भाषण स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. परंतु या स्वातंत्र्याला मर्यादाही आहेत. भाषण स्वातंत्र्य असले म्हणून कुणीही एखाद्याची बदनामी करू शकत नाही. आपण एखाद्याविरुद्ध अश्लाघ्य टिपण्णी करू शकत नाही. बिग बॉसच्या या भागात जो काही घाणेरडा प्रकार चालू होता त्याला शृंगारपुरे याने 'चिप झोपडपट्टी मेंटलिटी' म्हणून हिणवले यावरून त्याच्या मनात व्यवस्थेतील सर्वात खालच्या थरातील लोकांबद्दल किती द्वेष भरला आहे हे दिसून येते. 

खरेतर आपली व्यवस्था ही विषमतावादी आहे. या व्यवस्थेत जातींची उतरंड आहे. वरच्या मानल्या गेलेल्या जातींना व्यवस्थेत संधी उपलब्ध होत्या. त्यातून त्यांची सामाजिक, आर्थिक, भौतिक प्रगती झाली. मात्र मागास आणि खालच्या मानल्या गेलेल्या जातींना व्यवस्थेने संधी नाकारली. शिक्षणाचा अभाव, त्यामुळे नोकऱ्या नाहीत, रोजगार करावा तर भांडवल नाही, समाजात सन्मानाचे स्थान नाही, आयुष्यभर वाट्याला हेटाळणी आणि द्वेष. गावात गावगाड्यात राहून अपेक्षित प्रगती नाही, उलट पिढ्यानपिढ्या  चाललेला अत्याचार मुकाटपणे सहन करायचा. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना खेडी सोडून शहरात जाण्याचा संदेश दिला. गावगाड्यात प्रगतीची सर्व दारे बंद असल्याने गेल्या अनेक वर्षात दलित, भटके व मागास समाजाने शहरात स्थलांतर केले. आधीच शहरांना पायाभूत सुविधांची वानवा असताना अनेक समाजघटक शहरात आल्याने शहरात जागेची कोंडी झाली, पायाभूत सुविधांवर ताण पडला. त्यामुळे झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. झोपडीपट्टीत राहणे हे  ऐच्छिक नसून नाईलाज आहे हे कोण लक्षात घेणार ? हे लोक घाणेरडे, गलिच्छ, नालायक असा शिक्का मारणे हे बिग बॉसमधील कलाकारांच्या कोत्या मनोवृत्तीचे लक्षण नाही का? याच झोपडपट्टीतून महाराष्ट्राला शाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, डॉ. नरेंद्र जाधव, नामदेव ढसाळ यांच्यासारखी रत्ने लाभली आहेत. 



झोपडीपट्टीत राहणाऱ्या लोकांचा जातनिहाय सर्व्हे केला तर कोणत्या समूहातील लोक आहेत हे लक्षात येईल. या लोकांचा व्यवसाय म्हणजे साफसफाई किंवा रोजगार. अतिशय कमी कमाई. त्यामुळे दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, बेरोजगारी अशा चक्रव्यूहात हे लोक सापडले आहेत. 'Denial of opportunity' is major cause of poverty असं अमर्त्य सेन म्हणतात आणि त्याबद्दल त्यांना नोबेलही मिळालाय. संधी नाकारल्याने झोपडपट्टीतील लोक अशा अवस्थेत आहेत. त्यांना आपण समाजाच्या प्रवाहात सामील करून घेऊ शकलो नाही (किंबहुना आपली तशी इच्छाही नाही) हे आपल्या व्यवस्थेचे अपयश. आपण त्यांना सन्मानाची वागणूक देऊ इच्छित नाही. वरून त्यांच्याबद्दल आपल्या मनात अतिशय घाणेरडी, विषारी  भावना असते. हाच विखार बिग बॉस या कार्यक्रमात शृंगारपुरेच्या तोंडून बाहेर पडला. आणि हा शृंगारपुरे एकटा नाही. आपल्यापैकी अनेकांनी झोपडपट्टीत राहणाऱ्यांचा वेळोवेळी उद्धार केला आहे. त्याऐवजी आपण त्या लोकांचे जीवन अनुभवले, त्यांना या दलदलीतून बाहेर काढून समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना सन्मानाची वागणूक दिली तर अधिक चांगले होईल. 

फक्त छान छान दिसणे, चांगले कपडे घालणे, बोलताना इंग्रजी शब्द वापरणे म्हणजे आपण प्रगत व सुसंस्कृत झालो का? अंगावर घाणेरडा कचरा टाकण्याचा प्रकार  हा सुसंस्कृतपणा आहे का? याच झोपडपट्टीतील अनेक लोक दिवस उजडायच्या आत रस्त्यावरील, गटारातील घाण साफ करतात म्हणून आपण शहरात मोकळा श्वास घेऊ शकतो याची जाणीव बिग बॉसमधील कलाकारांनी ठेवावी. झाल्या प्रकाराला शृंगारपुरे याच्यासोबत कार्यक्रमाचे दिग्दर्शक, यजमान व कलर्स वहिनीही जबाबदार आहे. कुणीही आपली जबाबदारी झटकू शकत नाही. झोपडपट्टीतील बांधवांच्या भावना दुखवल्याबद्दल या सर्वांनी माफी मागून आपला विवेक जागा आहे हे दाखवून द्यावे. असले घाणेरडे कार्यक्रम प्रसारित केले जातात आणि त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी भेटते हे आपल्या समाजाच्याही अवनतीचे लक्षण आहे.

-प्रकाश पोळ
-कुलदीप कांबळे

3 टिप्पणी(ण्या):

Rohit म्हणाले...

उच्चवर्गीय/उच्चवर्णीय मानसिकतेची अतिशय अभ्यासपूर्ण चिकित्सा या लेखात केल्याबद्दल "लेखकद्वयी"चे मनापासून अभिनंदन!!

Unknown म्हणाले...

चांगला लेख आहे.

Unknown म्हणाले...

हा लेख चांगला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes