शनिवार, ऑगस्ट ३१, २०१३

काय आहे जादूटोणाविरोधी विधेयकात?

तुम्हीच ठरवा : अंधश्रद्धेवर प्रहार की श्रद्धेवर आच?
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धाविरोधी चळवळीचे अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाल्यानंतर त्यांनी दीर्घकाळ ज्यासाठी लढा दिला त्या जादुटोणा विरोधी विधेयकाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विधेयकातील तरतुदींवर वेगवेगळी मते व्यक्त होत असताना त्यात नेमके काय आहे, हे जाणून घेतल्यास हे विधेयक म्हणजे श्रद्धेवर घाला आहे की अंधश्रद्धेवर प्रहार याचा फैसला लोक करू शकतील.


राज्य सरकारने या विधेयकाचा जो मसुदा निश्‍चित केला आहे त्यात प्रामुख्याने जी कृती गुन्हा ठरू शकेल, अशी बारा कलमे अशी आहेत. 

ही कलमे अशी: 
१) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील.(भूत उतरविण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा ठरत नाही.

२) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल.


३) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणे हा गुन्हा.

४) गुप्तधन, जारणमरण, करणी, या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे.

५) अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे हा गुन्हा असेल पण केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही.


६) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे.


७) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे. 


८) भूत पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भीती घालणे, भुताच्या कोपामुळे शारीरिक इजा झाली, असे सांगणे.


९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे.


१0) बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे. गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे.


११) स्वत:ला विशेष शक्ती असल्याचे सांगून अथवा गेल्या जन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून लैंगिक संबंध ठेवणे.अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्‍वासन देत लैंगिक संबंध ठेवणे.


१२) एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा, व्यवसायासाठी करणे.

Ref.-Daily Lokmat.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes