३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे या पुण्यातील धर्मांध विचाराच्या (?) व्यक्तीने हत्या केली. महात्मा गांधींचे विचार पटत नसलेला एक वर्ग त्याकाळी होता. त्या गांधीविरोधी गटाचा महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांना विरोध होता. परंतु वैचारिक संघर्ष करण्याची त्यांची कुवत नव्हती त्यामुळे त्यांनी गांधींचा विचार संपवण्यापेक्षा गांधीनाच संपवले.
कारण तसे करणे सोयीस्कर होते. परंतु त्या मूर्खाना एवढे कळत नव्हते कि माणूस मारून त्याचे विचार मरणार नाहीत.
आज अचानक हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा पुण्यात झालेला निर्घृण
खून. डॉ. दाभोलकर हे गेली ३०-३५ वर्षे अंधश्रद्धा निर्मुलन, जाती निर्मुलन, पर्यावरण संवर्धन अशा अनेक सामाजिक क्षेत्रात काम करत होते. प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात दाभोलकरांनी आवाज उठवला होता. त्यांच्यामुळे ज्यांची बुवाबाजीची, अंधश्रद्धेची, मध्ययुगीन जात मानसिकतेची दुकानं बंद पडत होती त्यांच्यापैकी कुणीतरी दाभोलकराना संपवले.
ता. २० ऑगस्ट २०१३. स्थळ- ओंकारेश्वर मंदिराशेजारी विठ्ठल रामजी शिंदे पूल. रक्षाबंधनाचा दिवस
असल्याने सर्वत्र सुट्टीचे वातावरण होते. त्यात वेळ सकाळची सहा सव्वासहाची. त्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती.
डॉ. दाभोलकर सह्याद्री वाहिनीवरील मुंबईचा कार्यक्रम आटपून रात्रीच पुण्यात दाखल झाले होते. त्याचा मुक्काम होता साधना मिडिया सेंटर जवळील रा. ग. जाधव यांची सदनिका.
सकाळी नेहमीप्रमाणे दाभोलकर फिरायला बाहेर पडले. साधना मिडिया सेंटर वरून निघून ते ओंकारेश्वर मंदिराजवळील वि. रा. शिंदे पुलावरून बालगंधर्व रंगमंदिराकडे चालले होते. पुलाच्या एका टोकाला लागुनच पोलीस चौकी आहे. तिथूनच दाभोलकर पुलावर आले. तिथून १०० पावलं पुढे गेले. तोच मागून दोन युवक मोटार सायकलीवरून आले. मोटार सायकल थोडी पाठीमागेच लावून ते दाभोलकरांच्या मागून चालत आले. आणि काही कळायच्या आत तीन-चार फुटांवरून दाभोलकांवर चार गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्यांनी त्यांचा वेध घेतला. हल्लेखोर गोळीबार करून पसार झाले. दाभोलकरांचा देह निस्तेज होवून जमिनीवर पडला. त्यांचा चष्मा त्यांच्या जवळच पडला. जवळच हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी होती. तसेच काही कारणामुळे तिथे पोलिसांनी नाकाबंदीही केली होती. गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकून पोलीस व काही नागरिक धावत आले. एका व्यक्तीची गोळ्या मारून हत्या झाली आहे, एवढेच त्यांना समजले होते. परंतु थोड्या वेळाने ती व्यक्ती म्हणजे साक्षात दाभोलकर असल्याची खात्री पटली तेव्हा पोलिसांना सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आहे. लागलीच प्रमुख पोलीस अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजार झाले आणि न्यूज चनेलवर बातम्या झळकल्या आणि सर्व महाराष्ट्राला धक्का बसला. दाभोलकरांच्या हत्येने पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सैरभर झाले. क्षणभर कुणाचाच विश्वास बसेना. परंतु जसजशी ही बातमी सर्व ठिकाणी पोहचली तसतसे कार्यकर्ते पुण्याकडे रवाना झाले.
दाभोलकरांचा देह पोस्टमार्टेम साठी ससून रुग्णालयात नेला होता. थोड्याच वेळात ससून सर्व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी खचाखच भरून गेले. कार्यकर्ते खूपच उद्विग्न झाले होते. अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. दाभोलकरांच्या प्रती कार्यकर्त्यांची असलेली निष्ठा, प्रेम हे सर्व त्यातून व्यक्त होत होते. कार्यकर्त्यांनी ससूनमधेच धरणे धरले. अतुल पेठे, अमोल पालेकर, अच्युत गोडबोले, भाई वैद्य, लक्ष्मण माने, अजित अभ्यंकर, अभिजित वैद्य, प्रतिमा परदेशी असे मान्यवरही त्यात सामील झाले. दाभोलकरांच्या मारेकऱ्याना शिक्षा झालीच पाहिजे, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक पारित झालेच पाहिजे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
राज्यकर्ते किंवा प्रशासनातील अपवाद वगळता कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी येवून ठोस आश्वासन देवू शकत नव्हते. राजकीय इच्छाशक्ती कमी पडत होती. पुण्यातील अंकुश काकडे, जयदेव गायकवाड आदी नेते आले होते. ते कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कुणीही त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद यांनी कार्यकर्त्यांना समजावल्यावर सर्वजण शांत झाले. डॉ. दाभोलकरांची अंत्ययात्रा ससून रुग्णालय ते साधना मिडिया सेंटर पर्यंत काढण्यात आली. हजारो तरुण-तरुणी, आबालवृद्ध यात सामील झाले होते. दाभोलकर अमर रहे, विवेकाचा विचार दबणार नाही, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा दिल्या जात होत्या. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरही दाभोलकरांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते.
शेवटी दाभोलकर तर आपल्यातून गेले. परंतु त्यांचा विचार संपणार नाही यांची जबाबदारी पुरोगामी कार्यकर्त्यांवर आहे. दाभोलकरांना अंतिम निरोप देताना सर्वांचाच बांध दाटून आला होता. तरीही विवेकाचा विचार पुढे नेणारच असा ठाम निर्धार सर्वांनी केला. दाभोलकर अमर रहे च्या घोषणा पुण्याच्या आसमंतात दुमदुमल्या. त्या घोषणांनी सनातनी प्रवृत्तींचा जातीय-धर्मांध विचारांचा किल्ला ढासळला जाईल अशी आशा वाटली.
दाभोलकरांचे मारेकरी हे नथूरामचेच वारसदार आहेत. नथुराम गोडसेने ज्याप्रमाणे गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे दाभोलकरांचा विवेकाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्यांच्या शत्रूंनी केला आहे. त्यांचा प्रयत्न कदापीही सफल होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा करू. आणि ‘नथुराम’लाही एकच सांगणे आहे,
नथुराम तू मूर्ख मूर्ख रे...
सांगू या त्याला
गांधीजी का मारून जातील
भ्रम जाहला तुझा...
डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे...
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ