लेखक- प्रा. श्रावण देवरे
![]() |
प्रा. श्रावण देवरे |
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा'' हे पुस्तक 6 महिन्यापुर्वीच लिहुन तयार आहे.
आर्थिक स्थिती बरी असलेल्या ओबीसी नेत्यांना व कार्यकर्त्यांना पुस्तक छपाईसाठी
आर्थिक मदतीची विनंती केली. परंतू फारसा चांगला अनुभव नाही. ईलेक्शनची हौस भागविन्यासाठी आमचे ओबीसी
3/4 लाख रुपये सहज उडवुन टाकतात. परंतू चळवळीला मार्गदर्शक ठरणारे
पुस्तक छपाईसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.
या पुस्तकातील एक लेख आपल्या सह्याद्री बाणाच्या वाचकांसाठी----------
फिडेल केस्ट्रो बनण्याची क्षमता असलेले ओबीसी नेते
![]() |
छगन भुजबळ |
मी मा. ना. छगन भुजबळ यांच्या गेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दै.
लोकनायकमध्ये एक लेख लिहीला होता. लेखाचे शिर्षक होते- फिडेल क्रेस्टो बनण्याची
क्षमता असलेले ओबीसी नेते - ना. छगन भुजबळ. शिर्षक वाचूनच अनेकांच्या भुवया
उंचावणे स्वाभाविक होतं. केवळ ना. छगन भुजबळच नव्हे तर प्रस्थापित असलेल्या सर्वच
राजकीय पक्षांमधील ओबीसी नेत्यांमध्ये ही क्षमता निश्चित आहे. त्यासाठी त्यांना
पुढील कार्यक्रमातून जावे लागणार आहे. पण त्या आधी फिडेल केस्ट्रो बनणे म्हणजे काय, हे समजुन घेतले पाहिजे. फिडेल केस्ट्रो
हे क्युबन क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात कम्युनिस्ट नव्हते. त्याकाळी
रशियन क्रांतीच्या प्रभावाची लाट जगभर पसरत असतांना तरूणांमध्ये मार्क्सवादाचे
आकर्षण निर्माण झाले होते. केस्ट्रो अशा तरूणांपैकी एक. देशांतर्गत चळवळीच्या अमेरिकाविरोधी असंतोष व शितयुद्धाच्या
जागतिक दडपणाखाली ते कम्युनिझमकडे झुकत गेले व देशात साम्यवादी क्रांतीचे जनक
ठरले. भारतीय राजकारण मुस्लीम-दलीत व्होट-बँकेकडून ओबीसी व्होट-बँकेकडे वेगाने
सरकत असतांना स्वयंघोषीत ओबीसी नेते मात्र त्याची दखल न घेता, नेहमीची आपली
गुलाम-मांडलिकत्वाची भुमिका वठवत ओबीसी-घातक राजकारण करीत आहेत. ओबीसी नेता या
कॅटेगिरीचे मुख्यतः दोन भाग होतात. पहिल्या प्रकारात जे ओबीसी नेते येतात ते
स्वयंभू व स्वतंत्र ओबीसी नेते. म्हणजे या नेत्यांना प्रत्यक्षपणे कोणीही उच्चजातीय
नेता (बॉस) नाही. दुसर्या प्रकारचे ओबीसी नेते हे असे नेते आहेत की ज्यांना
प्रत्यक्षपणे उच्चजातीय नेत्यांच्या हाताखाली मांडलिक म्हणून काम करावे लागते. यासंदर्भात
काही महत्वाचे मुद्दे आपण चर्चेसाठी घेत आहोत. -----
दुसर्या प्रकारात मोडणार्या ओबीसी नेत्यांबाबत सर्वप्रथम विचार
करू या!
1) पहिला सर्वात महत्वाचा
प्रश्न असा की या नेत्यांना ओबीसी नेते का म्हणायचे? गेल्या शतकाच्या नव्वदीला
मंडल आयोग चळवळ राजकीय व सामाजिक फलितापर्यंत पोहोचली होती, तो पर्यंत कोणीही
राजकीय नेता (नगरसेवक ते आमदार-खासदार) स्वतःला ओबीसी नेता म्हणवून घ्यायला धजत
नव्हता. तेव्हा हे लोक आपापल्या पक्षात नेते म्हणून मान्यता पावलेले होतेच. पण
त्यावेळी हे लोक बाबरी मशिद पाडू इच्छिणारे हिंदू नेते होते. आपापल्या ओबीसी-जातीचा मर्यादित पाठींबा
घेउन या हिंदू नेत्यांनी मशिद पाडण्याचे म्हणजेच मंडल आयोग गाडण्याचे मनुदत्त पुण्यकर्म
केले! हा इतिहास हे नेते विसरले असतील तर त्यांनी त्याची उजळणी करून घेणे आवश्यक
आहे.
2) कॉंग्रेस व तिच्यातून नंतर बाहेर
पडलेल्या अनेक उपकॉंग्रेस (उदा. राष्ट्रवादी वगैरे) तसेच सम-कॉंग्रेसी
पक्ष (उदा. भाजप, शिवसेना वगैरे) हे सर्व ओबीसींचे शत्रू नं. 1 आहेत. प्रथम कॉंग्रेसने 1955 साली प्रत्यक्षपणे कालेलकर आयोग कायमचा गाडून
टाकला. मंडल आयोगच्या काळापर्यंत ओबीसी बर्यापैकी जागृत झालेला असल्याने त्याला
गाडण्याचे काम भाजप-शिवसेनेकडे सोपविण्यात आले. कारण ही ओबीसी जागृती हिंदु जागृतीच्या लाटेत बुडविण्याचे
काम भाजपच करु शकत होता. किंबहुना त्यासाठीच भाजपची निर्मिती झाली आहे. त्यामुळे
कॉंग्रेस व तिचे सर्व उपपक्ष, समपक्ष (भाजप, राष्ट्रवादी,
शिवसेना आदी) ओबीसींचे कट्टर शत्रू असतांना या पक्षात काम करणार्यांना ते केवळ ओबीसी जातीत जन्मले म्हणून
त्यांना ओबीसी नेता म्हणायचे का?
3) ओबीसींच्या भल्याचे काहीही
काम न करता तुम्हाला रातोरात ओबीसी नेता करण्यामागे तुमच्या उच्चजातीय वरिष्ठ नेत्यांचा
उद्देश काय, हे कधी या नेत्यांनी समजून घेतले आहे काय?
4) वर्गीय चळवळीवर ब्राम्हण
नेतृत्व लादता येते, परंतु जातीय चळवळीसाठी तेथे पाहिजे जातीचेच हा
सिद्धांत काम करतो. शेतकरी चळवळ ही शूद्र जातींची चळवळ असली तरी ती वर्गीय
स्वरुपात संघटित केल्याने शरद जोशी हे शुद्र शेतकर्यांचे नेते बनू शकलेत. याच न्यायाने बहुसंख्य
कामगार शूद्रादिअतिशूद्रच असले तरी त्यांच्या वर्गीय संघटनेचे नेते दत्ता सामंत
असतात. याच संघटना जेव्हा जातीअंतक सत्यशोधक चळवळीच्या भाग असतात, तेव्हा लोखंडे-भालेकर
हे शुद्रच त्यांचे नेते होउ शकत होते. ब्राम्हण सर्व
प्रतिगामी-पुरोगामी व क्रांतीकारक-प्रतिक्रांतीकारक चळवळींचे नेतृत्व करु शकतात व करतातही, परंतू जातीअंताच्या चळवळीचे
नेतृत्व ते करू शकत नाहीत, असे जयप्रकाश नारायण सांगतात. (जयप्रकाश नारायण- समाजवाद
का?, या ग्रंथात) शूद्ध जात आधारावरच्या चळवळींचे नेतृत्व त्या त्या जातींचे नेतेच करू शकतात.
कारण वर्गव्यवस्था व जातीव्यवस्था या कॉ. शरद पाटील सांगतात त्याप्रमाणे, दोन स्वतंत्र शोषणाच्या
व्यवस्था असून त्यांच्यात मुलभुत फरक आहे. हे सर्व स्पष्टीकरण करण्याचे कारण एवढेच
की, आता जे लोक कोणतेही मेरीट नसतांना केवळ आपल्या पक्षाच्या उच्चजातीय बॉसच्या
मेहेरबानीने स्वतःला ओबीसी नेते म्हणून मिरवून घेत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे की, ते
त्यांच्या बॉसच्या मेहेरबानीने ओबीसी नेते बनलेले नसून जातीव्यवस्थेच्या अंगभूत
गुणामुळे व प्रामाणिक व अराजकीय ओबीसी कार्यार्त्यांच्या भीतीपोटी ओबीसी नेते बनले आहेत. जर
जातीव्यवस्था वर्गव्यवस्थेप्रमाणे खूली राहीली असती तर आज ओबीसी नेतेपदी मुंडे-भूजबळांच्याऐवजी
जोशी-कुलकर्णी दिसले असते. बाबरी मशिद पाडण्यासाठी जुंपलेल्या या हिंदू नेत्यांवर ओबीसी
नेतृत्वाची झूल का टाकण्यात आली? ते पुढील भागात समजून घेवू.
2 टिप्पणी(ण्या):
छान लेख आहे. आता मुस्लिम ओबिसी नेतृत्वावर देखील असाच लेख लिहावा म्हणजे "हिंदू ओबिसी" आणि "मुस्लिम ओबिसी" यातील फरक स्पष्ट होईल. तसेच "मुस्लिम ओबिसी" आपल्या "हिंदू ओबिसी" बांधवांबरोबर दोन्ही धर्मांतील उच्चवर्णीयांच्या विरोधात लढायला तयार आहेत का हे ही कळेल.
DEVARE SAHEB LEKH CHAN AHE.PARANTU MALA EK SANGAWESE
WATTE KI OBC CHALWAL BRAHMAN DWESHA KARTA WAPRUN
TICYA MUL HETUN PASUN DUR NENYACHE KARSTHAN RACHALE
JAT AHE.APAN ATISHAY SAWADH RAHILE PAHIJE.RASHTRAWADI
HA JASA MARTHASAMAJ BAHUL PUSH AHE TASA OBC CHA SWATANTRA
PUSH KADHLA PAHIJE.JO KHARAKHURA MUKTA WICHARSARNI
CHA ASEL.YENARI SHEKDO WARSHA SATTA OBC N CHYA HATAT
ASANAR AHE HE NIRVIVAD SATTYA AHE.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ