1990 ला RSS-BJP
ने पुन्हा अशाच षडयंत्राची रचना केली. परंतू ब्राम्हणी व अब्राम्हणी या दोन्ही
शत्रूंनी एकमेकांचा मागचा अनुभव पाहता, RSS-BJP चे नेते जसे हुशार
झाले होते तसे ओबीसी नेतेही सतर्क व सावध झाले होते. 1989चा जनता दल व 1977
चा जनता पक्ष यांच्यात बराच मुलभूत फरक होता. परिस्थितीही आमूलाग्र बदललेली होती.
यावेळी RSS-BJP ने संभाव्य मंडलविरोधी लढ्याची तयारी खूप
आधीपासूनच सुरु केलेली होती. त्यांनी आपल्या पक्षात ओबीसी जातीतून भरपूर
नेते
निर्माण करुन ठेवले होते. त्यामुळे त्यांना 1977 प्रमाणे जनता दलात सामील होण्याची
गरजच नव्हती. 1989 च्या निवडणूकीत युती करून जनता दल सरकारला बाहेरून पाठींबा
दिला. जनता दलाचे मुख्य संस्थापक नेते व्हि.पी. सींग यांनीही RSS-BJP ला
सुरुवातीपासूनच लांब ठेवले. जनता प्रयोगातून RSS-BJP वजा झाल्यामुळे
जनता दल पक्ष कट्टर ओबीसीं नेत्यांचा पक्ष झालेला होता. त्यामुळे मंडल आयोग लागू
होताच सरकार पडणार हे माहीत असूनही व्हि.पी. सींगांना आयोग लागू करावा लागला.
परंतू तत्त्वासाठी सत्तेलाही तिलांजली देण्र्या
या ओबीसी नेत्यांचा कट्टरवाद आज कोठे गेलेला आहे? सर्वोच्च न्यायालयाने 1992 साली
दिलेल्या मंडल निवाड्यानंतर यांना आपला कार्यभाग संपला असे वाटते काय? मंडलचं झाड
लावलं, ते मोठं केलं आता फक्त त्या झाडाच्या सावलीत बसून त्याची फळं खाणं एवढेच
काम शिल्लक राहीले आहे, असे या ओबीसी नेत्यांना वाटते काय? परंतू आता या झाडाची
फळं खाण्यासाठी अनेक जाती पुढं सरसावल्या आहेत. त्यात मराठा-जाट सारख्या जमिनदार व
सत्ताधारी जाती वाटा मागण्याच्या नावाखाली झाडाचा बुंधाच कापून न्यायचे म्हणत
आहेत. ओबीसींचा बॅकलॉग, ओबीसी जनगणना वगैरे सारखे प्रश्न सोडविले नाहीत तर, या
झाडाची रसदच कापली जाणार आहे. फळ झाडावर आहे पण खाउ शकत नाहीत, अशी परिस्थिती बर्याच
ठिकाणी तयार केली जाते. त्यामुळे ताटात असूनही खाणे अशक्य झालं आहे. सामाजिक व
सांस्कृतिक चळवळ भक्कम असेल तरच प्रबोधनाचे व जनजागृतीचे काम होउ शकते. सत्तेवर
असतांना या ओबीसी नेत्यांनी अशा चळवळी भक्कम करण्यासाठी कोणते काम केले?
(4)
कॉंग्रेसी
प्रवृत्तीच्या (राष्ट्रवादी, भाजप-सेना वगैरे) पक्षातील ओबीसी नेत्यांकडून ही
अपेक्षा नाही. अपेक्षा होती ती करुणानिधी, यादवत्रयी, देवेगौडा, नितीशकुमार
यासारख्या स्वयंभू, स्वयंपूर्ण व विचार-तत्त्वज्ञानाचा भक्कम आधार असलेल्या
नेत्यांकडून! ब्राम्हणेतरांचे वर्चस्व असलेल्या जनता पक्ष व जनता दल सारख्या
पक्षातून यांच्या नेतृत्वाचा उदय झाला आहे, ही एक मोठी जमेची बाजू. तरीही देशव्यापी
ओबीसी चळवळ उभारण्याच्या अनेक संध्या यांनी वाया घालवल्या. सर्वप्रकारची साधने व
अनुकूल वातावरण असूनही हे काम या स्वयंभू ओबीसी नेत्यांनी का केले नाही?
राजकारणात
व्यक्तीगत राजकीय महत्वाकांक्षा केंद्रस्थानी असली तरी सामजिक पाठींब्याशिवाय ती
पुर्णत्वास जात नाही. कर्पूरी ठाकूरांसह हे सर्व ओबीसी नेते मुख्यमंत्रीपद व
केंद्रीय मंत्रीपदापर्यंत जाउन पोहोचले ते केवळ गेल्या शतकभर सुरु असलेल्या ओबीसी
चळवळींमुळे! या चळवळी जशा जशा सत्ताकारणात प्रभावी होउ लागल्या तशीतशी ब्राम्हणी छावणीही
आपल्या प्रतिक्रांतीच्या चळवळी धोरण व डावपेंच बदलत आक्रमक करीत गेली. मंडलनिवाडोत्तर
काळात तर त्यांनी स्वतःचेच (खोटे) ओबीसी नेते तयार केल्याने ते बर्याच अंशी
बिनधास्त झालेले असलेत तरी त्यांना या खोट्या ओबीसी नेत्यातही संभाव्य फिडेल
केस्ट्रोचे भूत दिसत असते. म्हणून ते आपल्याच पक्षातील ओबीसी नेत्यांचे पाय (पसरत नसले
तरी) सतत कापत असतात व त्यांची उंची कमी करीत राहतात. त्यांनीच निर्माण केलेले
अडवाणी, राजनाथ, कल्याणसिंग, उमा भारती, येडीरप्पा, असे कितीतरी ब्राम्हणेतर व
ओबीसी नेते आज ते संपवून टाकत आहेत. राहीला प्रश्न स्वयंभू-स्वतंत्र ओबीसी
नेत्यांचा. या नेत्यांना आता वेगळेच प्रश्न भेडसावू लागले आहेत. यांच्या राजकीय महत्वाकांक्षा
आता व्यक्तीगत राहील्या नाहीत, त्या रूंदावत जाउन कौटुंबिक झाल्या आहेत. त्यासाठी सर्वप्रथम
विचार-तत्त्वज्ञानाची आहुती द्यावी लागते, ती त्यांनी कधीच सहजपणे देउन टाकली आहे.
मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे, बायकोला खासदार बनवायचे आहे, पुतण्याला आमदार
बनवायचे आहे, शालक केंद्रात मंत्री होण्यासाठी रूसून बसला आहे आणि स्वतःला तर
प्रधानमंत्रीच बनायचे आहे. आणि त्यासाठी प्रचंड तडजोडी चाललेल्या आहेत. ओबीसी चळवळ
भक्कम करण्याऐवजी आपले कुटूंबच भक्कम करणे चालू आहे. त्यांना प्रधानमंत्री व्हायची
घाई झालेली आहे. राजकीय अस्थिरतेपायी व्ही.पी.सिंग देवेगौडाप्रमाणे आपणणाकडे
केव्हाही प्रधानमंत्रीपद चालून येईल, असे त्यांना वाटते. या लालसेपायी ते 1995
पासूनच कॉंग्रेस, RSS-BJP, डावे इत्यादींना नाराज करू इच्छित
नाहीत. यात मुख्य सूत्रधार RSS असल्याने त्याच्या कलाने वागण्याचा त्यांचा
प्रयत्न आहे. परिणामी ओबीसींसाठी देशव्यापी चळवळ उभारण्याच्या अनेक संधी त्यांनी
जाणीवपूर्वक गमावल्या. कॉंग्रेसी,उपकॉंग्रसी व समकॉंग्रेसी पक्षातील खोटे ओबीसी
नेते व चळवळीतून आलेले खरे ओबीसी नेते यांच्यात आता फारसा फरक राहीलेला नाही.
या देशाचा प्रधानमंत्री
ओबीसी होणारच आहे. या देशाचा प्रधानमंत्री ओबीसी होणे म्हणजे 5 हजार वर्षापूर्वी
पाताळात गाडून टाकलेला बळीराजा पुनरुज्जीवीत होउन ब्राम्हणवाद्यांच्या छातड्यावर बसणे
होय. आणि हे घडणारच, याची जाणीव ओबीसी व ब्राम्हणेतरांना नसली तरी RSS ला आहे. फक्त हा प्रधानमंत्री
स्वयंभू असावा की मांडलिक, हे एकीकडे RSS ठरवेल व दुसरीकडे
ओबीसी-दलीत-आदीवासी चळवळी ठरवतील. RSS ने भाजपमधील सगळे
ओबीसी नेते संपवले असले तरी ते अजून मोदींना संपवू शकलेले नाहीत. भाजपला आता 2014
च्या निवडणूकीत मोदींना ओबीसी मुखवटा म्हणून वापरुन निवडणूका जिंकायच्या
आहेत. पण याचा अर्थ ते मोदींना प्रधानमंत्री बनवतील असे नाही. मुरलीमनोहर जोशी
प्रधानमंत्री बनतील व मोदींना कॉंग्रेसच्या मदतीने जेर(जेल)बंद करण्यात येईल, याची
जाणीव खुद्द मोदींनाही आहेच.
दुसरीकडे 1967-77-89 प्रमाणे पुन्हा एकदा जनता प्रयोगासारखा प्रयोग राबवून ओबीसी-दलीत-आदीवासी चळवळींनी एकत्र येउन स्वयंभू ओबीसी प्रधानमंत्री बनवायचा आहे. ओबीसी-ब्राम्हणेतर नेत्यांनी एक गोष्ट
लक्षात ठेवायची आहे की, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-सेना यासारख्या पक्षाच्या
मदतीने ते प्रधानमंत्री पदापर्यंत पोहचतीलही, परंतू हे पक्ष तुमचा सिंग-देवेगौडाप्रमाणे
केव्हा एन्काउंटर करतील याचा पत्ताही लागू देणार नाहीत. हे होउ द्यायचे नसेल तर
देशातील सर्व पक्षातील ब्राम्हणेतर नेत्यांनी 1977 व 89 प्रमाणे फेडरल स्वरूपात
एकत्र येउन राजकारण करणे गरजेचे आहे.
असा प्रयोग यशस्वी झाला तर ते जातीअंताच्या दिशेने एक क्रांतीकारक पाउल ठरेल. एक स्वयंभू ब्राम्हणेतर प्रधानमंत्री (व्ही.पी.सिंग) फक्त 1 वर्षासाठी झालेत तर त्यांनी घेतलेल्या एका मंडल-निर्णयाने देशाची ब्राम्हणी राजकीय व्यवस्था खिळखिळी करुन टाकली आहे. एव्हढेच नव्हे तर देशाचे राजकारण ओबीसी केंद्रीत करून टाकलेले आहे. आता जर स्वयंभू ओबीसी नेता जर प्रधानमंत्री झाला तर तो या देशाची ब्राम्हणी संस्कृतीच नष्ट करण्यास कारणीभूत होईल. नियती फिडेल
केस्ट्रोचा सुवर्ण मुकूट कोणात्या ओबीसी नेत्याच्या डोक्यावर ठेवते, ते आता येणारा
नजिकच्या काळात दिसणारच आहे.
-- समाप्त --
-- प्रा.
श्रावण देवरे, नाशिक.
मोबा-
94 22 78 85 46
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ