![]() |
लालासाहेब पोळ |
आज Father's Day...आयुष्यभर ज्या बापाने खस्ता खाऊन आपणाला वाढवले त्या बापाच्या संघर्ष, त्यागापुढे नतमस्तक होण्याचा दिवस...सकाळीच मोबाईलचे इंटरनेट चालू केले आणि Father's Day चे मेसेज यायला लागले. काळजात चर्रर्र झाले. ज्या दिवशी पप्पा अपघातात गेले तो दिवस आठवला. 5 फेब्रुवारी 2013...आयुष्यातला काळा दिवस...वाटलं नव्हतं कि असं काही होईल...घरून फोन आला आणि ती दुःखद बातमी ऐकून अवसान गळून गेलं.
आतापर्यंत पप्पांसोबत घालवलेले क्षण नजरेसमोर तरळायला लागले. अक्षरशः कोसळून पडलो. घरातील मोठा मुलगा म्हणून सर्वांसमोर दुःख व्यक्त करण्यालाही मर्यादा येत होत्या. लहान भाऊ, आई, आजी आजोबा सर्वांकडे बघून दुःख गिळून टाकलं. दोन काका, चुलतभाऊ-बहिणी, मित्र, नातेवाईक सर्वांनी धीर दिला. ठरवलं कि पप्पांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच जगायचं. माझ्यावर पप्पांनी खूप चांगले संस्कार केले. गोरगरिबांचं दुःख आपलं मानायला शिकवलं. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा दिला. आयुष्यात गुलामी पत्करून जगण्यापेक्षा संघर्ष करण्याचा मंत्र दिला. मला वाचायला येत नव्हतं तेव्हापासून पुस्तकं आणून दिली. वाचायला शिकवलं. लिहायला शिकवलं. सर्वसामान्य उपेक्षितांच्या वेदनांना वाचा फोडायला शिकवलं. मी सहावीत असताना ते मला म्हणाले, "तू आयुष्यात कितीही मोठा हो. परंतु तुझ्या ज्ञानाचा फायदा जोपर्यंत वंचितांना होत नाही तोपर्यंत ते ज्ञान व्यर्थ आहे. स्वतःसाठी जगण्यापेक्षा नेहमी दुसऱ्यांसाठी जग". त्यावेळी या वाक्यांचा नीट अर्थही कळत नव्हता. परंतु जसं जसं कळायला लागलं तसं तसं पप्पानी सांगितलेली एक एक गोष्ट उमगत गेली.
माझ्यासाठी त्यांनी खूप स्वप्नं पहिली. मी डॉक्टर होऊन निस्वार्थी भावनेने गोरगरिबांची सेवा करावी असे त्यांना वाटत होते. परंतु मेडिकल प्रवेशासाठी महत्वाचा असणारा टप्पा म्हणजे बारावीत माझी गाडी अडकली. दहावीपर्यंत 85-90 % मार्क्स असणारा मुलगा बारावीत चक्क नापास झाला त्यावेळी त्यांना काय दुःख झाले असेल याची कल्पनाही करवत नाही. इतके होऊनही मला ते एका शब्दानेही बोलले नाहीत. मला धीर दिला आणि पुढच्या वर्षी चांगला प्रयत्न करायला सांगितले. माझ्या निष्क्रियतेमूळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. पुढच्या वर्षी बारावी पास झालो मात्र CET ला कमी मार्क्स असल्याने मेडिकलला प्रवेश मिळू शकला नाही. ते आतून खूप उदास झाले होते. परंतु माझ्या क्षमतांवर त्यांनी नेहमी विश्वास ठेवला. मी पुरोगामी चळवळीत काम करत असताना मला खंबीर पाठिंबा दिला. प्रत्येक प्रसंगात ते पहाडासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. लालासाहेब पोळ यांचा मुलगा अशी माझी ओळख होती. परंतु प्रकाश पोळ याचा बाप अशी ओळख त्यांना पाहिजे असे ते नेहमी म्हणत असत. मी त्यांची काही स्वप्ने पूर्ण करू शकलो नाही. तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवत नव्या उमेदीने स्वप्नं पाहत राहिले. माझ्यासाठी त्यांनी पाहिलेलं शेवटचं स्वप्न म्हणजे आपला मुलगा प्रशासकीय अधिकारी झाला पाहिजे, कलेकटर झाला पाहिजे. ते त्यांच्या मित्रांमध्ये नेहमी म्हणायचे कि मी एक दिवस कलेक्टरचा बाप होणार. आता हे स्वप्न पूर्ण करणं माझ्या हातात होतं. त्यांनी दिलेल्या अनेक संधी मी हातातून घालवल्या. हि संधी व्यर्थ घालवायची नाही असे मनोमन ठरवले.
नोव्हेंबर 2012 ला मी स्पर्धा परिक्षा करण्यासाठी पुण्यात आलो. फेब्रुवारी 2013 मध्ये पप्पा अपघातात गेले. त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहायची असेल तर त्यांचं स्वप्न पूर्ण करणे गरजेचे होते. भरपूर अभ्यास केला आणि मार्च 2017 मध्ये MPSC मधून उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी झालो. कलेक्टर झालो नाही तरी वर्ग 1 चा प्रशासकीय अधिकारी झालो. पप्पांचं अर्धं स्वप्न पूर्ण झालं. आज Father's Day च्या निमित्ताने या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. पप्पा आज हे सर्व पाहायला नसले तरी त्यांचे विचार, त्यांची स्वप्नं माझ्यासोबत आहेत. त्यांची उणीव सदैव भासत राहील. Miss u lot Pappa...
-प्रकाश लालासाहेब पोळ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ