गुरुवार, नोव्हेंबर ०६, २०१४

भारताचा पाकिस्तान होऊ नये

'हे कसले पाक' (6 नोव्हेंबर) हा अन्वयार्थ लोकसत्तामध्ये वाचला. पाकिस्तानच्या कोट राधाकिशन या गावात एका ख्रिस्ती दाम्पत्याला ईश्वरनिंदेच्या आरोपावरुन ठार मारण्यात आले. पाकिस्तान हा धर्मांध विचाराने कसा गुरफटला आहे त्याची प्रचिती आली. कट्टर धर्मांधता आणि त्यामाध्यमातून होणारा हिंसाचार ही सर्वच जगाची अतिशय गंभीर समस्या आहे. धर्म, धार्मिक प्रतिके यांची विटंबना किंवा निंदा केल्याच्या आरोपावरुन अनेकाना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते, तिथले लष्कर आणि धार्मिक नेते यानी पाक मधील सामाजिक वातावरण नेहमीच गढूळ ठेवले. कट्टर धर्मांधता जोपासत त्यानी
नवीन पिढ्यांवरही हेच संस्कार केले. पाक मध्ये ईश्वरनिंदेला फाशी देण्यासारखे काही कायदे अशा धार्मिक कट्टरतावादाला अधिकच खतपाणी घालतात. त्यात तिथे कायद्याचे कमी अन दहशतीचे राज्य जास्त चालत असल्याने काही लोक कायदा हातात घेतात. त्यातूनच अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडतात. पाकिस्तानमध्ये कदाचित ही गोष्ट जास्त गंभीर मानली जाणार नाही. परंतु पाकचे सख्खे शेजारी म्हणून भारतीयानी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. पाकमध्ये घडलेल्या या हिंसक प्रकरणाची चर्चा करताना पुण्यात झालेली मोहसीन शेख याचीही दुर्दैवी हत्या आपण विसरता कामा नये. जे पाक मध्ये झाले तेच पुण्यात घडले. सोशल नेटवर्किंग साईटवरुन हिंदू देवदेवता किंवा महापुरुष यांची बदनामी झाल्याचे निमित्त झाले आणि स्वत:ला धर्माचे ठेकेदार म्हणवनारी मंडळी जागी झाली. त्यानी धार्मिक मुद्द्यावरुन सामाजिक वातावरण कलुषित केले. अनेक ठिकाणी जाळपोळ, मारहाणीच्या घटना घडल्या. याचे टोक गाठले ते मोहसीनच्या हत्येने. ज्या बदनामीशी मोहसीनचा किंवा इथल्या मुस्लिम समाजाचा काडीमात्र संबंध नव्हता त्याना कट्टर धर्मांध लोकानी त्रास दिला. मग भारताची परिस्थिती पाक पेक्षा वेगळी आहे असे कसे म्हणता येईल. दोन्हीकडेही कट्टर धार्मिक भावनांचे प्रदर्शन झाले. त्यामाध्यमातून निष्पाप जीव बळी गेले. त्यामूळे अशा प्रकारच्या घटनाना पायबंद घालण्यासाठी समाजानेच पुढाकार घेवून धर्मांध लोकांचे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे.

1 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

अहो एक गोष्ट लक्षात येते आहे का


यांच्या देवाची बदनामी केलि की याना पाकिस्तानात चालत नाही

आणि ह्यांनी मात्र ठेका घेतल्या सारख दुसर्यांच्या धार्मिक भावनांची पयमल्लि करायची हे त्याना चालत

आणि जवळपास पाकिस्तान एवढेच मुस्लिम भारतात राहतात आणि एकादी दूसरी घटना घडली की तुम्ही बोंबाबोंब करायची

आहो पाकिस्तानात काय चालु आहे ते नीट पहा ज़रा
हिन्दू आणि ख्रिश्चन तर सोडाच् तिथे मुस्लिम सुद्धा सुरक्षित नाहीत
आणि तुम्ही कोणाची तुलना करता आहात..??

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes