शनिवार, नोव्हेंबर ०२, २०१३

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत पुणे विद्यापीठाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा ठराव एकमताने पास केला. या निर्णयामुळे पुरोगामी वर्तुळात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे तर दुसऱ्या बाजूला सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या विचारांना नेहमी विरोध करणाऱ्या समूहामध्ये नाराजी पसरली आहे. या नामविस्ताराचा मुहूर्त साधून अनेकांनी पुणे विद्यापीठाच्या गुणवत्तेची चर्चा सुरु केली आहे. एरव्ही आपल्याला गुणवत्तेचे फारसे देणे-घेणे पडले नसताना आरक्षण किंवा नामांतर अशा प्रकारच्या गोष्टी समोर आल्या की लगेच आपणाला गुणवत्ता आणि मेरीट आठवते. दुर्दैवाची बाब ही की या मेरीट किंवा गुणवत्तेची चर्चा फक्त फुले-आंबेडकर अशा ठराविक नावामुळेच होत असते.


वास्तविक पाहता ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि जोतीराव या फुले दाम्पत्याने देशात बहुजन समाज आणि स्त्री वर्गाच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळी ब्राह्मण आणि सनातनी लोकांचा विरोध पत्करून, प्रसंगी छळ सोसून या दाम्पत्याने दलित-बहुजन आणि स्त्रियांना शिकवले. शिक्षणाच्या क्षेत्रात एक अभूतपूर्व क्रांती करून दाखवली. जो समाज आजपर्यंत फक्त आणि फक्त दुसऱ्यांची सेवा करण्यासाठीच जन्माला आला होता त्यांना हातात लेखणी देवून लिहायला लावले. वाचायला लावले. समाजात जागृती निर्माण करून भोळ्या-भाबड्या समाजाला मुक्तीचा मार्ग दाखवला. जोतीरावांनी सुरु केलेल्या या पवित्र कार्यात सावित्रीबाईनी स्वतःला झोकून दिले. पहिली स्त्री-शिक्षिका, पहिली मुखायाध्यापिका असणाऱ्या सावित्रीबाईंच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा ही समस्त पुरोगामी लोकांची इच्छा होती.

त्यासाठी अनेक संघटनांनी, संघर्ष केला. या सर्वांच्या संघर्षाला यश मिळाले. आता महाराष्ट्र सरकारने वेळ न लावता पुणे विद्यापीठाचे नामांतर स्वारी नामविस्तार करावा ही विनंती.

तसेच पुणे विद्यापीठाच्या या निर्णयावर ज्या प्रकारची चर्चा चालू आहे, गुणवत्तेचे ढोल पिटले जात आहेत त्यांना माझे एकाच सांगणे आहे की इतका उथळ विचार करू नका. सावित्रीबाईंचे नाव विद्यापीठाला दिल्याने विद्यापीठाच्या गुणवत्तेत काही वाढ होणार आहे का अशा प्रकारचा सवाल विचारला जात आहे. सावित्रीबाईंचे नाव दिल्याने गुणवत्ता वाढणार नसेल पण कमी तर होणार नाही. गुणवत्ता वाढीसाठी आपण इतर प्रयत्न करू शकतो ना ? की सावित्रीबाईंचे नाव दिल्याने विद्यापीठाच्या गुणवत्ता वाढीचे सर्व दरवाजे बंद होणार आहेत की काय ?

मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देतानाही खूप गहजब झाला. अनेक ठिकाणी जातीय द्वेष पसरला. या महापुरुषांच्या नावाबद्दल, कामाबद्दल एक प्रकारची घृणा मनात बाळगली जाते  हे योग्य नाही. यांचे कार्य सर्वसमावेशक आहे. ते प्रामाणिकपणे सर्वानी समजून घ्यावे. मग यांच्या नावाला विरोध करण्याचे (वैचारिक) धाडस कुणाचेही होणार नाही.

2 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

गुणवत्तेची चर्चा तर सर्वच शैक्षणिक क्षेत्राची होता. पण पुणे विद्यापिठाच्या नामांतराची मागणी काय होती आणि ठराव काय मंजूर झाला ? सिनेटमध्ये कोणाचे बहुमत आहे? कोणी कोणाची जिरवली? वाद कोणाचे बोम्ब कोणाच्या नावाने ? पुरोगामी म्हणजे नक्की काय. हो भाऊ?

अनामित म्हणाले...

By changing the name of university, what u gain all of u need free education/ all india free
I think mahatma phule was not excepting such type of foolish thing which u people think

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes