बुधवार, जानेवारी ०९, २०१३

साहित्य संमेलनावर वादाचा ‘परशु’

साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण काही नवे नाही. प्रत्येक साहित्य संमेलनात साहित्यबाह्य विषयावरून वाद होतात आणि ते संमेलन इतर गोष्टींसाठीच लक्षात राहते. जो मूळ हेतू लक्षात घेऊन या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते तो हेतू सफल करण्याचे प्रयत्न कितपत होतात असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण साहित्य महामंडळाचे कारभारी आणि स्थानिक संयोजन समिती कशा प्रकारे वाद निर्माण करत असतात हे दरवर्षी आपण पाहत आहोतच. यावेळचे साहित्य संमेलन तर अनेक कारणांनी गाजत आहे. या संमेलनातील वादाची सुरवात झाली ती अध्यक्षीय निवडणुकीतील ह. मो. मराठे जातीयवादी प्रचाराने. ब्राम्हण मतांचे धृविकरण आपल्या
बाजूने करण्याच्या नादात ह. मो. मराठे यांनी आपली नेहमीची ब्राम्हणवादी भूमिका संमेलनाच्या निवडणुकीत उघड केली. गेल्या काही वर्षापासून ब्राम्हणवादाविरुद्ध काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. परिणामी दुसर्या बाजूला ब्राम्हणही संघटीत होत आक्रमक झाले. ब्राम्हण समाजात काही प्रमाणात असुरक्षितता निर्माण झाली. या परिस्थितीचा फायदा घेऊन ब्राम्हणांना चुचकारण्याचा प्रयत्न मराठे यांनी करून पहिला. प्रचाराच्या पत्रिकेत या सर्व गोष्टींचा उहापोह करत आपण ब्राम्हण समाजासाठी लढणारे खंदे कार्यकर्ते असून ब्राम्हण समाजाच्या कल्याणासाठी आपणाला निवडून द्यावे असे आवाहन मराठे यांनी केले. हे करत असतानाच जेम्स लेनचे खोडसाळ आणि द्वेषमुलक वाक्य त्या पत्रिकेत छापण्याचा नीचपणाही मराठे यांनी करून दाखवला. मराठे यांच्या या आगाऊपणावर समाजाच्या सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर ह.मो. ची माफी आणि अटक यामुळे वादाचा धुरळा काही काळ खाली बसला जरूर. पण ह.मो. आणि साहित्य महामंडळाचे कारभारी यांना ते मंजूर नसावे. वादाशिवाय शांततेत जर साहित्य संमेलन पार पडले तर आपल्या परंपरेला बट्टा लागेल असा विचार त्यांनी केला असावा. त्यामुळेच एक वाद शमतो न शमतो तोवर दुसरा वाद उभा करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. त्याची परिणीती परशुरामाचे चित्र आणि त्यांची कुर्हाड संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात झाली.

कुर्हाड कुणाची आणि कुणासाठी ?

संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर आयोजकांनी परशुरामाचे छायाचित्र छापले. त्याचबरोबर लेखणीला कुर्हाडीचा आकार देत अजून निर्लज्जपणा केला. परशुराम हा संमेलनाच्या आयोजकांसाठी प्रेरणास्थान असू शकतो त्याबद्दल दुमत नाही. पण परशुरामाच्या माध्यमातून आपण समाजावर कोणत्या प्रकारच्या मानवी मूल्यांचे रोपण करत असतो त्याचाही विचार झाला पाहिजे. परशुरामाचे चरित्र आपणाला काही उत्तुंग विचार, उच्च मानवी मुल्ये शिकवते का हा प्रश्न आम्हाला पडला आहे. निवडणुकीच्या प्रचारातील ह.मो. यांचा जातीय प्रचार आणि संमेलन आयोजकांचा जातीयवाद याच्या प्रेरणा ब्राम्हणवादाच्या मुळाशी दडल्या आहेत. निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाची कुर्हाड कशासाठी चितारली आहे याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल. ही कुर्हाड कुणाची आहे आणि कुणावर चालवली जाणार आहे हेही आम्हाला पाहावे लागेल. जातीयवादी लोकांच्या जाणीवाही जातीयवादीच असणार आहेत. परंतु दुखः एकाच गोष्टीचे वाटते कि मान्यताप्राप्त संस्थांवर अशाच जातीयवादी शक्तींचा पगडा आहे. या जातीयवाद्यांच्या परशुरामीय प्रेरणा समजून घेण्यासाठी आपणाला परशुरामाची कथा थोडक्यात नजरेखालून घातली पाहिजे.

परशुरामाची कथा 

धार्मिक ग्रंथातून परशुरामासंबंधी ज्या-ज्या कथा आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांशी काल्पनिक आहेत हे स्पष्ट आहे. परशुराम हा विष्णूच्या अवतारांपैकी एक. हा एकमेव विष्णूअवतार चिरंजीव मानण्यात आलेला आहे. मुळात परशुरामाचा संबंध अनेक पिढ्यातील लोकांबरोबर आल्याचे दाखवले आहे. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे जर परशुरामाचे वय काढायचे म्हटले तर ते हजारो वर्षे होईल. आणि हजारो वर्षे कोणतीही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. परशुरामाभोवती काल्पनिक आणि चमत्कारी घटनांची इतकी गुंफण करून ठेवली आहे कि त्यामुळे परशुरामाचे खरे चरित्र समजणे फार अवघड आहे. नरसंहाराचा उच्चांक गाठलेला असतानाही परशुरामाला आगळे दैवत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे परशुराम हा ‘काही’ लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. परंतु जर प्रामाणिक चिकित्सा करायची असेल तर परशुराम या व्यक्तीवर चमत्कारांची, काल्पनिक कथांची जी पुटे चढवली आहेत ती दूर करून परशुरामाचे चरित्र समजावून घ्यावे लागेल.

परशुरामाच्या आयुष्यात ज्या काही प्रमुख घटना घडल्या त्यात परशुरामाने रेणुकेचा केलेला शिरच्छेद ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. चित्ररथ गंधर्वाला पाहून रेणुकेचे मन विचलित झाले. त्यामुळे जमदग्नी रागावले आणि आपल्या पाच मुलांना रेणुकेचा वध करण्याची आज्ञा केली. त्यापैकी फक्त परशुरामाने पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून आईचा शिरच्छेद केला. त्यानंतर जमदग्नी पराशुरामावर संतुष्ट झाले आणि वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करण्याचा वर मागितला. रेणुका पुन्हा जिवंत झाली. एखादी व्यक्ती एकदा मरण पावल्यानंतर पुन्हा जीवंत होवू शकत नाही. त्यामुळे रेणुका पुन्हा जिवंत झाली हे पुराणकारांचे म्हणणे साफ खोटे आहे. त्यामुळे या कथेतील चमत्कारिक भाग वगळता परशुरामाने आईचा शिरच्छेद केला हेच एकमेव सत्य दिसून येते. रेणुकेचा तथाकथीत अपराध झाला होता असे वादासाठी गृहीत धरले तरी शिरच्छेद करण्याची शिक्षा देण्याची काहीही गरज नव्हती. तरीही जमदग्नीच्या आदेशावरून रेणुकेला पश्चातापाची किंवा स्वतःची बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता परशुरामाने तिचा वध केला ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल. आणि याबाबतीत परशुरामाच्या कृतीचे कधीही समर्थन होवू शकणार नाही.

परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केल्याच्या कथा रंगवून सांगितल्या जातात. पण गमतीचा भाग असा आहे कि एकदा पृथ्वी निक्षत्रीय केल्यानंतर पुन्हा क्षत्रिय आले कोठून ? आणि जर संपूर्ण क्षत्रिय नष्ट झाले नसतील तर पृथ्वी निक्षत्रीय केली असे आपण कसे म्हणू शकतो ? म्हणजे पुराणकारानी इतक्या विसंगत कथा लिहिल्या आहेत त्यांचा बऱ्याच वेळा आपापसात ताळमेळ लागत नाही. हैहय वंशातील राजांचे भृगु हे पुरोहित होते. पण त्यांच्यात नंतर वैर उत्पन्न झाले. हैहय कुळातील कार्तविर्याने वसिष्टांचा आश्रम जाळला. त्यांनतर वसिष्ठाने त्याला शाप दिला कि, ‘भार्गवकुलोत्पन्न परशुराम तुझा वध करील’. यामुळे जमदग्नी, परशुराम आणि कार्तवीर्य हे वैर अधिक तीव्र झाले. कार्तविर्याने जमदग्नीची कामधेनु पळविली. त्यामुळे रागावून परशुरामाने कार्तविर्याबरोबर युद्ध केले व त्याला ठार मारले. कार्तविर्याच्या मृत्यूने संतप्त होवून त्याच्या मुलांनी जमदग्नीचा वध केला. पित्याच्या वधाची बातमी कळताच परशुरामाने सर्व पृथ्वी निक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा घेतली. आता या कथेत जमदग्नी, परशुराम आणि कार्तवीर्य यांचे वैर अधिक भडकून त्याचे पर्यावसान कार्तवीर्य आणि जमदग्नी यांच्या हत्येत झाले हे दिसून येते. परंतु यांनतर परशुरामाने पृथ्वी निक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा घेतली हे कितपत संयुक्तिक होते ? जमदग्नीच्या मृत्युनंतर परशुरामाने अंग, वंग, कलिंग, विदेह, दरद, त्रिगर्त, ताम्रलीप्ती, मालव इ. देशातील राजांचाही संहार केला. त्याच्या क्षत्रिय संहाराची वर्णने तर भयानक आहेत. इतका नरसंहार करणारा परशुराम आदरणीय कसा ठरावा ? समाजातील एखाद्या व्यक्तीशी, घटकाशी शत्रुत्व आहे म्हणून संपूर्ण समाजाचा संहार करण्याची ही कृती निंदनीयच म्हंटली पाहिजे. कार्तविर्याने जमदग्नीची कामधेनु पळवली होती ही कार्तविर्याची चूक झाली. परंतु त्यासाठी कार्तविर्याची हत्या करणे म्हणजे किरकोळ चोरी करणाऱ्या चोराला फाशीची शिक्षा देण्यासारखे आहे. कार्तविर्याने पळवलेली कामधेनु परत मिळवून किंवा त्याला आर्थिक दंड करून परशुराम कार्तविर्याला योग्य शिक्षा करू शकला असता. परंतु परशुरामाने कार्तविर्याची हत्या केली आणि हे वैर अधिक पेटले.त्याची परिणती पुढे हजारो क्षत्रियांच्या हत्येत झाली.

आपण ब्राम्हण आहोत असे भासवून कर्ण परशुरामाचा शिष्य बनतो. परंतु कर्णाचे सत्य एक दिवशी परशुरामास समजते. त्यानंतर परशुराम कर्णाला शाप देतो कि तुला आयत्यावेळी मंत्राचा विसर पडेल. त्यामुळे अर्जुनाकडून कर्ण मारला जातो. ही महाभारतातील कथा. इथे कर्ण हा जाती/वर्णव्यवस्थेचा बळी ठरला आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. कर्ण ब्राम्हण नाही म्हणून तो विद्या ग्रहण करण्यास अपात्र आहे असा परशुरामाचा समज होता. विद्या ग्रहण करण्यासाठी का होईना कर्ण खोटे बोलला ही त्याची चूकच होती. परंतु ब्राम्हण असल्याचे भासवून शिक्षण घेणे यापेक्षा ब्राह्मणेतरांना शिक्षणाचा अधिकार नाकारणे हा गंभीर अपराध म्हंटला पाहीजे. आपल्या शिष्याची छोटीशी चूक झाली आणि तीही कुणाला फसवण्यासाठी, कुणाचे नुकसान करण्यासाठी केलेली नव्हे तर शिक्षण घेण्यासाठी चूक केलेली असताना परशुरामाने कर्णाला इतका मोठी शिक्षा देणे संयुक्तिक वाटत नाही. शाप देण्याची कृती जरी काल्पनिक असली तरी त्यामागील जाणीवा, भावना अन्यायकारकच आहेत. रेणुका, कार्तवीर्य, कर्ण या सर्वांच्याबाबतीत परशुरामाने केलेला व्यवहार न्यायाचा नव्हता हे पुराणातील कथांवरून स्पष्ट होते. पराशुरामाच्या या कृती निश्चीतच समर्थनीय ठरणार नाहीत. परशुरामाच्या चरित्राकडे पाहायचे असेल तर बुद्धिवादी आणि चिकित्सक बनूनच पहावे लागेल आणि त्यासाठी श्रद्धेच्या पोकळ कल्पना आपणास बाजूला साराव्या लागतील.

परशुराम हा पुरुषप्रधान संस्कृतीच्या समर्थकांना आणि जातीयवाद्यांना आपलासा वाटणे साहजिक आहे. परंतु इतका अन्यायी परशुराम आम्ही स्व्करू शकत नाही. त्यामुळे त्याचा उघड उदो उदो केलेलाही आम्ही खपवून घेणार नाही.

डो. आ. ह. साळुंखे आपल्या ‘परशुराम जोडण्याचे प्रतिक कि तोडण्याचे ?’ या ग्रंथात लिहितात, ‘पण एक गोष्ट स्पष्ट आहे, द्वेषाचे आणि हिंसेचे निखारे पेरून या देशात सुखशांतीची फुले फुलवता येणार नाहीत, माणसे प्रसन्नतेने उमलाविता येणार नाहीत. कुराडीच्या घावाने फुलही उमलू शकत नाही आणि तिच्या धाकाने माणूसही उमलू शकत नाही’.

जेथे सूड उगवतो- तेथे माणूस मावळतो !
जेथे सूड मरतो- तेथे माणूस जन्म घेतो !
आणि आपल्याला माणूस मावळू द्यायचा नाही,
मरू द्यायचा नाही !

1 टिप्पणी(ण्या):

Vijay म्हणाले...

Parashuramanni konala marale ---- Dattatryanch shishya- sahasrarjun yala.
ka marale--- karan tyane atyachar kela jamadagnincha aashram lutala vashishtanchahi lutala
Aeka lutarula thar marane va tyachya sarva samarthakanna marane garajechech aahe nahitar sarvatra lutalutach zali asati Dattagurunchya ashrayane unmatta zalelyas thar marane sopi goshtha nahi .

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes