लेखक-
किशोर मांदळे
सर्वच चळवळींना अरिष्टात
सापडण्याचा भोग अटळ असतो. चळवळीचे अरिष्ट नेमके कोणते ते आकलल्याशिवाय
त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडू शकत नाही. चळवळींना अरिष्टातून बाहेर
काढण्याचे दिव्य विद्यापीठांच्या "आयव्हरी टॉवर'मधील विचारवंतांच्या आवाक्यातले कधीच नसते. त्यासाठी चळवळीच्या
रणमैदानातूनच "द्रष्टा पुढे यावा लागतो. या द्रष्ट्याचीही वाटचाल सोपी नसते.
कारण, तत्वज्ञानाने कर्मठ बनलेल्या श्रद्धा त्याला मोडीत काढाव्या
लागतात. मार्क्सवादाच्या "सार्वभौम श्रद्धेला' आव्हान देऊन त्याचे
दार्शनिक अरिष्ट जगासमोर मांडणे म्हणजे तर केवढे पाखंड! हे पाखंड कॉ. शरद्
पाटील यांनी तीन दशकांच्या मागेच केले.आत्मरत डाव्या प्रस्थापितांनी कॉ. शरद्
पाटलांची कोंडी
करण्यासाठी जरी मौनाचा कट केला असला तरी परिवर्तनवादी
अस्वस्थ तरूणांचे जथे या प्रस्थापितांपासून आता सरकत आहेत. शरद् पाटलांचे
साहित्य मिळवून मोठ्या प्रमाणात वाचले
जात आहे. त्यांचे समग्र योगदान
त्यांची दार्शनिक महता या छोट्या लेखात
सामावणे शक्य नाही म्हणून
संक्षेपावरच समाधान मानावे लागेल.चक्रधर, बसवराजांच्या अब्राह्यणी प्रबोधनानंतर संत तुकारामांच्या नेतृत्वाखालील वारकरी संप्रदायाची प्रबोधन चळवळ विशेष लक्षवेधी ठरली. त्यानंतर तेवढीच प्रभावी चळवळ झाली ती अव्वल इंग्रजी राजवटीत सत्यशोधक समाजाची, जिचे प्रवर्तक होते महात्मा फुले. या चळवळीची महाराष्ट्रात जी प्रभावक्षेत्रे होती त्यात खानदेशातील धुळे परिसर एक प्रमुख केंद्र होते. धुळे जिल्ह्यातील कापडणे गावच्या वतनी भामरे (पाटील)कुटुंबावर साहजिकच सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता. या ज्ञानलालसी कुटुंबातून आलेले आत्माराम पाटील हे शिक्षणक्षेत्रात डेप्युटी (शाळा तपासनीस) या हुद्यावर कार्यरत होते. सत्यशोधक चळवळींच्या प्रभावाने त्यांनी आपले नाव बदलून तान्हाजी असे घेतले व पत्नीचे नाव मंदोदरी असे ठेवले. या सत्यशोधकी दाम्पत्यापोटी 1925च्या 17 सप्टेंबरला धुळे शहरातच शरद् पाटलांचा जन्म झाला. असामान्य आणि पराकोटीची ज्ञानतृष्णा अगदी लहानवयातच शरद् पाटलांच्या ठायी दिसून आली. "टाईम्स'ने प्रकाशित केलेले "टोटल शेक्सपिअर' त्यांनी समग्र वाचून काढले. तेच मुळी वयाच्या अकराव्या वर्षी. रामायण-महाभारत या महाकाव्यांचे वाचनही त्यांनी या वयातच केले होते. वयाच्या सतराव्या वर्षी धुळ्यातच मॅट्रिक्युलेशन पूर्ण करून ते पेंटींग कोर्ससाठी बडोद्याच्या कलाभवनात दाखल झाले. तेथे एक वर्षात दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते मुंबईच्या प्रतिष्ठित "जे.जे. स्कूल ऑफ आर्ट' मध्ये दाखल झाले. कलावंताचा पिंड असलेल्या शरद् पाटलांच्या व्यक्तीमत्वात सत्यशोधकी जाणीवेचाही एक प्रखर पोत होता, जो त्यांना 1945 च्या पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात ओढून घेऊन गेला. चळवळ्या मंडळींच्या संपर्काने त्यांचा साम्यवादी तत्वज्ञानाशी परिचय झाला. आर्टस्कूलचे शिक्षण मागे पडून ते कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील मुख्यालयात चित्रकार म्हणून काम करू लागले. शरद् पाटील आता जीवनदानी कार्यकर्ते बनलेले कॉम्रेड शरद् पाटील झाले होते.
1947 साली पक्षाने त्यांना धुळ्यात ट्रेड युनियन आघाडीवर पाठविले आणि 1950 ला एक वर्षाची हद्दपारी भोगून ते शेतकरी आघाडीवर कार्यरत झाले. कम्युनिस्ट शिस्तीने काम करतानाच त्यांनी 1956 पर्यंत बहुतांशी मार्क्सवादी साहित्य वाचून काढले होते. वयाची तिशी ओलांडताना ते आदिवासींच्या समस्यांना भिडले व धुळे-नंदुरबारच्या आदिवासीबहुल इलाख्यात त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा व्यापक व भरभक्कम जनतळ उभारला. पुढच्या काळावर भारत-चीन संघर्षामुळे कम्युनिस्टविरोधाचे सावट होते. सरकारनेही कम्युनिस्ट नेतृत्वाची धरपकड चालविली होती. शरद् पाटलांची रवानगी हर्सूल जेलमध्ये झाली. तेथेच त्यांनी पुन्हा एकदा मार्क्सचा दास कॅपिटल टिप्पणांसह तीनवेळा वाचून काढला. मार्क्सचे दुसऱ्या खंडातील एक चुकलेले बीजगणित त्यांनी येरवडा जेलमध्ये असलेल्या कॉ. बी.टी. रणदिवेंना पत्र लिहून कळविले ते याच काळात.
भारतीय समाजाचे, सवार्ंंना स्वच्छपणे दिसणारे जातीव्यवस्थेचे वास्तव फक्त कम्युनिस्ट नवब्राह्यणी नेतृत्वाला दिसत नव्हते व आजही दिसत नाही! पक्षसदस्य नोंदणी तक्त्यात कॉ. शरद् पाटील वर्गाबरोबर जातही लिहून घेत. हाही पक्षामध्ये संघर्षाचा मुद्दा झाला. माकपच्या नेतृत्वाशी त्यांचे मतभेद आता अटळच होते. शूद्राने जेवढे जाणायचे त्यापेक्षा जास्त जाणण्याचे पाखंड नवब्राह्यणी नेतृत्वाच्या नजरेतून सुटण्यासारखे नव्हते. दोन तुरूंगवास भोगून 1966 ला जेव्हा ते संशोधनासाठी बडोद्याला निघाले तेव्हा, चळवळीची हमाली सोडून स्कॉलर बनण्याचा उद्योग करतोय, ही शेरेबाजी त्यांना ऐकावी लागली. संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविल्याशिवाय भारतात तत्वज्ञानाच्या क्षेत्रात पाड लागू शकत नाही. या क्षेत्राचे नियंते प्राय: संस्कृतज्ञ आहेत व या वैदिक पंडितांशीच भविष्यात आपला महासंघर्ष होणार आहे हे जाणून त्यांनी वयाच्या एक्केचाळिसाव्या वर्षीही संस्कृत-पाणिनी शिकण्याची जिद्द बाळगली. बडोद्याच्या वास्तव्यात त्यांनी पहिले वर्ष संस्कृत-पाणिनीचे अध्ययन करण्यातच खर्ची घातले. विद्याभास्कर मणिशंकर उपाध्यायांनी त्यांना प्रवेश दिला खरा. पण, या बुजुर्ग विद्यार्थ्याने उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी मणिशंकरजींनाही रात्र रात्र जागून काढावी लागत असे. कारण, या शंका त्यांना पूर्वीच्या पढीक विद्यार्थ्यांनी मुळीच विचारल्या नव्हत्या. बडोद्यावरून परतल्यानंतर आदिवासीभागात साक्री येथे चळवळ आणि संशोधन या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी स्वत:ला जुंपून घेतले.तेव्हापासून, दिवसा ग्रामीण गोरगरीब व अतिशूद्र यांच्यासाठी लढणे व रात्री त्यांच्या देशाचा इतिहास जाणण्यासाठी पुस्तकांशी...हेच त्यांचे प्राक्तन बनले ते आजतागायत. आज वयाच्या पंच्याऐंशीतही त्यांची रस्त्यावरची लढाई आणि पुस्तकांशी झुंजणे सुरूच आहे.
हद्दपारी, तुरूंगवास हिच काय ती "कमाई' असणाऱ्या व सतत प्रज्ञेच्या पातळीवर जगणाऱ्या या दार्शनिकाचा संसार चालविण्याचा "योग' जिने सिद्धीस नेला. त्या आपल्या सहधर्मचारिणीला-सुशिलाताईंनाच त्यांनी, पंधरा वर्षाच्या ज्ञानसाधनेतून निर्मिलेला पहिला खंड (दास-शूद्र-स्लेव्हरी) अर्पण केला आहे.
हा खंड त्यांनी अन्न-आच्छादन-निवाहापासून पुस्तकांपर्यंत सर्व साधनेे जुळवताना विपन्नावस्था व ज्ञानक्षेत्रातील उपेक्षा यांना एकाकीपणे तोंड देत निर्मिला आहे. मात्र त्यांच्या या पहिल्याच कृतीने तत्वज्ञ आणि विचारवंताच्या वर्तुळात निर्माण झालेला दरारा त्यानंतर कोणालाही रोखता आला नाही. मार्क्सवादाची एकप्रवाही वर्गवादी अन्वेषणपद्धत नाकारून त्यांनी वर्णजातीवर्गवादी अन्वेषणपद्धतीने केलेल्या या नव्या मीमांसेची दखल दिग्गजांना घ्यावीच लागली. भारतीय दासप्रथांची व त्यांच्या तत्वज्ञानांच्या उगमांची ही अन्विक्षा जरी 1972 लाच लिहून पूर्ण झाली असली तरी हा खंड प्रकाशित व्हायला एक दशक लागले. वाईचे प्राज्ञ प्रकाशन, प्रा. मे. पुं. रेगे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचा यासंबंधात त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. दरम्यान, जातीव्यवस्थेविरूद्ध लढायला नकार देणाऱ्या माकपचा 27 जुलै 1978 ला राजीनामा देऊन कॉ. पाटलांनी स्वतंत्र वाट चोखाळत 15 ऑक्टोबर 1978 ला मार्क्सवाद-फुले- आंबेडकरवादावर आधारित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. 1982 ला त्यांनी या पक्षाचे मुखपत्र "सत्यशोधक मार्क्सवादी' सुरू केले. एक दशकभर या मासिकाने डाव्या कार्यकर्त्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला. आजही सत्यशोधक मार्क्सवादीच्या जुन्या अंकांना मागणी आहे. पुढे पाच वर्षांनी पहिल्या खंडाचा दुसरा भागही प्रकाशित झाला. भारतीय इतिहास व तत्वज्ञानाकडे ब्राह्यणी व अब्राह्यणी या मुख्य विभाजनातून पाहण्याचा दंडक घालून देणारे दार्शनिक ही त्यांची ओळख स्थिर होत असतानाच त्यांचा रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष (1986) हा तिसरा भाग प्रकाशित झाला. शंबूक, एकलव्य, सीता, कर्ण, द्रौपदी, विदुर व कृष्ण या मिथकांचा त्यांनी विज्ञानवादी आकलनातून, वास्तवाने केलेला परिहार सर्व परिवर्तनवादी प्रबोधकांनी आवर्जून वाचायला पाहिजे.
पहिल्या खंडासाठी त्यांनी आयुष्याची पंधरा वर्षे खर्ची घातली होती. तर अठरा वर्षांच्या संशोधनातून दुसरा खंड स्वामी-सेवक संबंधावरील, जातीप्रथेच्या उगमविकासाचा जिवंत विषय घेऊन अवतरला-जातीव्यवस्थापक सामंती सेवकत्व (1996) या खंडात अब्राह्यणी बहुप्रवाही अन्वेषणपद्धतीला "समाजवादी सौत्रांतिकवादी' सौंदर्यशास्त्राची जोड मिळाली आहे. दरम्यान, त्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षात फूट पडून आधीचे निर्णायक एकाकीपण आणखी गहिरे झाले होते. या खंडाच्या अर्पणपत्रिकेेेेेेेतही हा एकाकीपणा बुद्ध वचनाच्या साक्षीने आला आहे.
दुसरा खंड तुर्कपूर्व भारतीय सामंतप्रथेतील दार्शनिक व सौंदर्यशास्त्रीय संघर्षावर प्रकाश टाकतो. भारतीय मार्क्सवादी वर्ण-जात समाजाची अनन्यता झटकून"वर्गाचे ब्रह्य' सोडायला आजही तयार नाहीत. जातीव्यवस्थेसह सर्व विषमता या वर्ग नावाच्या ब्रह्याच्या पोटात असल्याचा त्यांचा लाडका आग्रह आहे. (ब्रह्य नाश पावत नसल्याने मग मुक्ती कशी मिळणार?-इति शरद् पाटील) कॉ. शरद् पाटलांनी मार्क्सवाद एकप्रवाही व म्हणूनच अपुरा असल्याचे सर्वप्रथम लक्षात आणून दिले. शिवाय त्यांनी कर्मठ मार्क्सवाद्यांना बजावले आहे की, मार्क्सवादाला अखेरचा शब्द समजणे हेच मुळी ऐतिहासिक भौतिकवादात बसणारे नाही. मार्क्सवाद हे केवळ जाणीवेचे शास्त्र असल्याने ते अद्वैती आकलनात फसले आहे. मनाच्या द्वैती (जाणीव-नेणिवयुक्त) स्वरूपाच्या प्रमाणशास्त्रात दिग्रागाने (इ.स.चौथे शतक) केलेला उपयोग व दिग्राग स्कूलच्या सौत्रांतिक विज्ञानवादाची दखल या खंडात घेण्यात आली आहे. मार्क्सवादाचे प्रतिबिंबक प्रमाणशास्त्र, वर्ग समाजाचेसुद्धा सम्यक आकलन करू शकत नसल्याने ते भारतीय जात-वर्ग समाजाला लावण्याचा खटाटोप कसा निरर्थक आहे ते सांगून त्यांनी, नव्या सौंदर्यशास्त्राचा आग्रह धरला आहे. नेणिवेत ढकलेल्या स्त्रीराज्याच्या समतामूल्यांची उकल हाेऊन ती परिणत साहित्य बनून कादंबरीसारख्या माध्यमातून कशी दृगोचर होतात, हे खुद्द सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कॉ. नजुबाई गावित यांच्या साहित्यातून दिसते. एकाच इयत्तेसाठी चार वर्षे शाळेत काढून व अक्षरओळखही विसरलेल्या नजुबाई ते पहिल्या आदिवासी लेखिका कॉम्रेड नजुबाई हा त्यांचा प्रवास नेणिवेच्या प्रमाणशास्त्राचे यश आहे. "स्त्री-शुद्रांच्या स्वराज्याचा राजा' (1998) हे स्वत: शरद् पाटलांनी लिहिलेले नाटकही या प्रमाणशास्त्राचा वस्तुपाठ आहे. ब्राह्यणी अलंकारशास्त्रही प्रतिबिंबवादी असल्याने ते प्रस्थापितताच निर्माण करील, नवसमाज नव्हे. म्हणून जुने प्रतिबिंबवादी सौंदर्यशास्त्र सोडून नेणिवेचे जास्त भेदक व समर्पक सौंदर्यशास्त्र स्वीकारल्याशिवाय मन बदलता येणार नाही, असे त्यांचे ठाम प्रतिपादन आहे. (मने कशी बदलायची हा प्रश्न तत्त्ववेत्यांनी अनुत्तरीत ठेवला आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.) सर्वहारांचे स्वत:चे सौंदर्यशास्त्र असल्याशिवाय व लेखकाला जाणीव-नेणिव प्रक्रिया उमजल्याशिवाय तो सर्वश्रेष्ठ निर्मिती करू शकणार नाही. या सौंदर्यशास्त्राचे मिशन व सामर्थ्य मनाचे मुलभूत परिवर्तन हेच आहे व "मी समाजवादी समाजाची निर्मिती करतो आहे' हा आत्मविश्वास त्यामुळे कलावंताला मिळेल एवढा आवाका कॉ. शरद् पाटलांनी या सौंदर्यशास्त्रातून उद्घोषित केला आहे.
दुसऱ्या खंडाच्या दुसऱ्या भागात त्यांनी शिवाजी-संभाजीच्या जातीअंतक समतावादी, शाक्त हौतात्म्याचा धगधगता विषय हाताळला आहे- शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण- महंमदी की ब्राह्यणी? (1991) मध्ययुगीन राजकीय संघर्षाला हिंदू-मुस्लिम धार्मिक संघर्षाचा रंग देण्याचा ब्राह्यणी बनाव तर येथे सप्रमाण उघड केलाच आहे, पण शिवाजी-संभाजीचे हौतात्म्य ही अब्राह्यणी प्रबोधनाची अमोघ अस्त्रे होऊ शकतात, हा विश्वास सर्व परिवर्तनवाद्यांना या पुस्तकाने दिला आहे. या पुस्तकाच्या दोन आवृत्या ज्या वेगाने संपल्या आहेत त्यावरूनही भारतीय समाजक्रांतीच्या अब्राह्यणी प्रबोधनात या पुस्तकाची प्रस्तुतता स्पष्ट होते.
स्वत:ची प्रबोधनआघाडी सुद्धा नसलेल्या डाव्यापक्षांकडून शरद् पाटलांचे साहित्य समजायला कठीण असल्याचा प्रचार मात्र आवर्जून केला जातो. वास्तविक, त्यांनी केलेला संकल्पनांचा विकास समजून घेतला की हे साहित्य समजायला मुळीच कठीण नाही, हे कुणाच्याही सहज लक्षात येईल. मार्क्सवाद त्याच्या एकप्रवाही अन्वेषण पद्धतीमुळे वर्ग समाजाशिवाय कशाचाही अभ्यास करू देत नाही. त्यामुळे भारतीय जातवर्ग समाजाच्या आकलनासाठी शरद् पाटलांच्या बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीला पर्याय नाही. त्यांनी आपल्या अन्वेषण पद्धतीला "विधायक-अब्राह्यणी' म्हटले आहे. कारण, नकारात्मक अब्राह्यणी अन्वेषण हे प्रबोधनाला उपयोगी ठरत नाही. उदाहरणार्थ, राम व कृष्ण यांचे भारतीय इतिहासाला काय योगदान आहे ते स्पष्ट करूनच, ते जनमानसात परमेश्वरपदी कसे पोहोचले ते उलगडून दाखवता येईल. त्यामुळे त्यांचे देवत्व गळून मानवीपण ठळक झाल्याने त्यांच्या भक्तीतून बहुजनसमाज मुक्त होईल व तो भारतीय इतिहासाकडे भौतिकवादी दृष्टीने बघायला सक्षम होईल. शरद् पाटलांच्या "बहुप्रवाही विधायक अब्राह्यणी ऐतिहासिक भौतिकवादी' अन्वेषण पद्धतीचे हेच सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा परिचय त्यांच्या तिसऱ्या खंडात जास्त ठळक होतो. "जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती' (2003) हा तिसरा खंड, भारतीय समाजाचे सरंजामी वास्तव रेखाटतो व धार्मिक मूलतत्ववाद व जातीयवादाला पुढे घालून उजवे पक्ष जी औपचारिक लोकशाही हाताळत आहेत; त्यातील भ्रामक विकास, आरक्षण व शोषितांमधील विद्रोहींना सामावून घेणारी बहुस्तरसत्ताक राजनीती यावर प्रकाश टाकतोच पण, मार्क्सवादाच्या अपुरेपणामुळे दोन्ही प्रमुख कम्युनिस्ट पक्षांचे लोकशाही क्रांतीचे "ब्रॅण्ड' असे हतबल झाले आहेत, तेही स्वच्छपणे दाखवून देतो. जातीव्यवस्था नष्ट करण्याचा आग्रह धरताना वरचढ शेतकरी जातींच्या उच्चभ्रूंकडील वरकड जमीन गरीब शेतकरी- शेतमजुरात वाटण्यासाठी जातीअंताचा लढा कसा अटळ आहे, यावरही प्रकाश टाकतो. जगभर समाजवाद उभारणीच्या प्रयत्नांना आलेले अपयश मार्क्सवादाच्या दार्शनिक अरिष्टामुळेच कसे आहे ते स्पष्ट करून मार्क्सवादापेक्षा उच्चतर वाद (इझम) आल्याशिवाय समाजवाद उभारणी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतो. त्यासाठी बौद्ध दिग्राग स्कूलचे प्रमाणशास्त्र व मार्क्सवादाच्या संयोगातून निर्मिलेल्या नव्या "सौत्रांतिक दर्शना'चा आग्रह धरतो.
भारताचा समग्र इतिहास तीन खंडात लिहिल्यानंतर या महान तत्ववेत्त्याने वयाची चौऱ्यांशी पार करताना "क्रांतीचे तत्वज्ञानात्मक शस्त्रागार' ठरू शकणारा चौथा खंड "प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मॅट्रीऑर्की-गायनोक्रसी ऍण्ड मॉडर्न सोशॅलिझम' लिहून हातावेगळा केला आहे. सध्या त्याचे मराठी भाषांतर (प्राथमिक समाजवाद, मातृसत्ता-स्त्रीसत्ता व आधुनिक समाजवाद) करण्यात ते व्यग्र आहेत. क्रांतीकारी चळवळीसाठी तत्वज्ञान हा कळीचा मुद्दा असतो. आपल्या राजकीय पक्षाचा तात्विक पाया मूलग्राही व विस्तृत असावा या कळकळीतून त्यांनी ही साहित्यनिर्मिती केली आहे. भारतात तरी राजकीय पक्षांच्या संस्थापकांपैकी, प्राच्याविद्यापंडीत कॉ. शरद् पाटील यांचा एकमेव अपवाद वगळता कुणाही संस्थापकाने असे साहित्य निर्माण केलेले नाही.
सर्व मार्क्सवादी पंडितांनी मॉर्गन-एंगल्सचे प्रिमिटिव्ह कम्युनिझमचे मॉडेल ग्राह्य धरल्याने त्यांचे मातृसत्ता-स्त्रीसत्तेच्या ऐतिहासिक वास्तवतेकडे दुर्लक्ष झाले. मार्क्सवाद्यांच्या डोक्यावरील प्रिमिटिव्ह कम्युनिझमचे भूत उतरविण्यासाठी शरद् पाटलांनी स्त्रीराज्याच्या समता- लोकशाहीचा आजच्या समाजवादी लोकशाहीसाठी सापेक्षतेने स्वीकार करण्याचा आग्रह धरला आहे. भारतीय इतिहासाचा मागोवा घेताना वेदांची आर्षभाषा ही सिंधू खोऱ्यातील ऋतींच्या वैराज-स्त्रीराज्याची बोलीभाषा होती, ती युरोपातून आलेली नव्हती हे त्यांनी सिद्ध केले. शेतीचा शोध लावणारी स्त्री क्षेत्र वा क्षत्र असून पुरूष "रेतो-धां' आकाश म्हणून ब्रह्यन् आहे, हे दाखवून देताना त्यांनी, भारतीय इतिहासाची सुरूवात वैदिकी श्रृतीने नव्हे तर (कृषीमायेच्या) तांत्रिकी श्रृतीने होते याकडे लक्ष वेधले, निर्ऋति ही सिंधू संस्कृतीच्या ऋतींच्या पहिल्या ज्ञात स्त्रीसत्तेची देवी होती हेही त्यांनी सिद्ध केले. वैदिक पंडीत एम. ए. मेहंदळे यांच्याशी कॉ. पाटलांचा वर्षभर वाद झाला तो निर्ऋतीच्या व्युत्पत्तीवरच नैर्ऋत व निर्ऋतीची संतान आर्यांकडून पराभूत होऊन दास झाल्यानंतर भारतीय सौंदर्याचा आदर्श काळा (रंग) न राहता गोरा झाला!(खंड2, पा. 174) स्त्रीराज्यांचे शास्तेपद जाऊन पितृवंशक राजपदे कशी अस्तित्वात आली व पुढे वर्णसमाज, जातीसमाज व आजचा जातवर्गसमाज असा भारतीय इतिहासाचा त्यांनी पूर्वीच्या तीन खंडातच संशोधनात्मक मागोवा घेतला आहे. चौथा खंड, भारतीय नवसाम्राज्यशाहीविरोधी जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची लढाई कशी अटळ आहे हे सांगून आधुनिक समाजवाद उभारणीचा क्रांतदर्शी मार्ग दाखवेल.
जागतिक साम्यवादी चळवळीला कॉ. शरद् पाटलांचे योगदान तत्वज्ञानात्मक व मेथडॉलॉजीचेही आहे. तत्वज्ञानात त्यांनी सौत्रांतिक मार्क्सवादाची नवी भर घातली आहे तर बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद ही त्यांची मेथडॉलॉजी आहे. समाजवादी सौत्रांतिकवादाची त्यांची निर्मिती मार्क्सवादाच्या दार्शनिक अरिष्टातील सौंदर्यशास्त्राचा अपुरेपणा भरून काढेल. लॉजिकचा विकास करताना फॉर्मल-आकारिक तर्कशास्त्राच्या पुळे जाऊन मानवी मन बदलणारे डायलेक्टिकल लॉजिक त्यांनी उद्घोषित केले आहे. कॉ. पाटलांच्या मते, भारतीय जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांतीचे नेतृत्व औद्योगिक सर्वहारामधील अवर्ण व जुने अवर्ण सर्वहाराच करू शकतील. या क्रांतीच्या व्यूहरचना व डावपेचात तिच्या या अधिनायकांना भांडवलदारी लोकशाही सांगता करणारा समाजवादी संक्रमणाचाही आराखडा तयार ठेवावा लागेल. अन्यथा, क्रांती उलटून देश पुन्हा जातवर्गीय कर्दमात फसेल. या क्रांतीच्या अधिनायकाचे डोळे व चष्मा सौत्रांतिक मार्क्सवादी पक्षाच असू शकेल.
भारतातील कम्युनिस्ट पक्षांनी जात्यन्तक समतेच्या समाजक्रांतीला अव्हेरण्याचे मूलगामी कारण तत्वज्ञानात्मकच आहे, हे उमजल्यानंतर या महान दार्शनिकाचा माकपचे "थिओरेटिशिऊन' बसवपुन्नया व ई.एम.एस. नंबुदिरीपादांशी प्रदीर्घ वैचारिक संघर्ष झाला आहे. मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद (1993).
या कृतीमध्ये तो विस्ताराने आला आहे. येथे विस्तारभयास्तव तो समग्र देता येणार नसल्याने त्याची फक्त नोंद करून ठेवतो. पण भारतीय मार्क्सवाद्यांचे ब्राह्यणी नेणिवेचे हे तर्कशास्त्र भुईसपाट करण्यासाठी कॉ. शरद् पाटलांनी आपली उभी हयात खर्च केली आहे आणि हे ऐतिहासिक उत्तरदायित्व मलाच निभयवायचे आहे. ही बोधी ज्यांना ज्या क्षणी प्राप्त झाली तो क्षण त्यांना "भारतीय अब्राह्यणी प्रबोधनाचे महावाक्य' बनवून गेला!
चित्रकार-शिल्पकार, जीवनदानी साम्यवादी नेते, कठोर शिस्तीचे संघटक, राजकीय पक्षाचे संस्थापक, प्राच्यविद्यापंडीत आणि जागतिक साम्यवादी चळवळीला महत्त्वपूर्ण योगदान देणारे महान दार्शनिक असा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बहुआयामी प्रवास आहे. पण, त्यांची चिरेबंद लेखनशैली व धारदार वक्तृत्व या सर्वावरील कळसाध्याय आहे. रामायण-महाभारतावरील त्यांच्या व्याख्यानात त्यांच्या अभिनत वक्तृवशैलीचे सर्व पैलू अविष्कृत झाले आहेत.
सर्वच समतावादी दार्शनिकांना ब्राह्यणी छावणीकडून जे "प्रेम' मिळते ते शरद् पाटलांनाही भरभरून मिळाले. त्यात नवब्राह्यणी मार्क्सवादीही मागे नव्हते. पण, इतिहासातील आपल्या सर्व पूवर्र्सुरींचा दाखला हाताशी असल्याने त्यांनी कुणालाही स्वत:वर मात करू दिली नाही. घोर उपेक्षेचा ज्वर त्यांनी निर्धारपूर्वक अंगावरच काढला. जंबुद्धिपाच्या मातीला, सिंधू खोऱ्याला प्रारंभी समतेचा अंगचाच गंध होता व विषमतावादी छावणीच्या प्रतिचढाईनंतरही ही माती "करूणा आणि मेत्ता' ही मूल्ये प्रसवतच राहिली. वैदिकांनी तिच्या सर्व समतावादी अधिनायकांना बदनाम करून बहुजनांच्या नेणिवेत दफन केले. नेणिवेच्या या वैराण दफनभूमीवर आज दोन हजार वर्षानंतर हा महत्तम दार्शनिक एकटाच गेला. या वैराणभूमीतील नेणिवेचे सर्व प्रस्तर त्याने प्रचंड प्रयासाने अविस्तपणे उकलून काढले. त्यातून चार खंडात विभागलेली साहित्यकृती जन्मली. हे क्रांतीचे शस्त्रागार-महाभांडार घडविणाऱ्या व्यक्तीची दुनिया व आपली व्यवहाराच्या कर्दमात रूतलेली दुनिया यात विलक्षण अंतर पडते. हे अंतर ज्यांना समजले नाही, त्यांना कॉ. शरद् पाटलांचा "स्व-भाव' ही कसा समजावा?
चार खंडाव्यतिरिक्त अब्राह्यणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र (1988) यासारख्या त्यांच्या अन्यकृतींचा व त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लढ्यांचा जागेभावी या लेखात समावेश करता आलेला नाही. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांस्कृतिक चळवळी, परिषदा व स्वतंत्र आदिवासी (जनस्थान) राज्यासाठी केलेला संघर्ष, तसेच 1970 पासून त्यांनी आदिवासींच्या वनजमिनी त्यांच्या मालकीहक्काच्या व्हाव्यात म्हणून केलेल्या संघर्षामुळे तसा कायदा केंद्र सरकारला करावा लागला. त्या अभूतपूर्व लढ्याचाही येथे तपशील देता आलेला नाही. सुरूवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे या प्रचंड ऊर्जेच्या महाकाय व्यक्तिमत्वाचा सर्वकष वेध घेणे, छोटेखानी लेखात शक्य नाही.
कॉ. शरद् पाटलांच्या साहित्याचे तरूण अभ्यासक संजीवकुमार कांबळे बरेचदा मोबाईलवरून त्यांच्या साहित्याविषयी उत्साहाने बोलत असतात. शरद् पाटलांनी उभ्या केलेल्या मीमांसेबद्दल त्यांना मूलग्राही विश्वास आहे. एकदा ते असेच उत्स्फूर्तपणे बोलून गेले की... बुद्धानंतर त्या श्रेणीचा बुद्ध झाला नाही हे खरे, पण कॉम्रेड शरद् पाटीलच आपले बुद्ध आहेत असे मानले तर.. हा आपला शेवटचा बुद्ध आहे!
2 टिप्पणी(ण्या):
कॉ़ भिख्खु शरद पाटलांवर एवढा सुंदर लेख वाचायला मिळाला याबद्दल शतश: आभार
खुप मस्त सर
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ