सह्याद्री बाणा वर प्रसिद्ध केलेल्या समतावादी संस्कृतीचा महानायक : बळीराजा या लेखावर Jidnyasu यांनी खालील प्रतिक्रिया दिली होती. आजपर्यंत अनेकांनी शिव्या देत, असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिल्या. काहींनी चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अशापैकी एक अतिशय सभ्य आणि छान प्रतिक्रिया आणि त्यावर माझे स्पष्टीकरण....
Jidnyasu यांची प्रतिक्रिया-
Jidnyasu यांची प्रतिक्रिया-
प्रत्येक संस्कृतीचा हाच दावा असतो की त्यांच्या राजाचे किंवा संस्कृतीचे
राज्य हे सर्वोत्तम होते, सर्वोत्तम आहे. जगभरात सगळ्या ठिकाणी हाच अनुभव
येतो. प्रस्थापित व्यवस्था कोणतीही असली तरी तिला अन्यायकारक मानणारे काही
गट प्रत्येक समाजात असतात. कारण कोणतीही व्यवस्था ही त्या समाजातील
प्रत्येक घटकाला पुरेपूर न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे कालांतराने असे गट
एकत्र येऊन ती व्यवस्था उलथवून टाकण्याचा प्रयत्न करतच असतात. देश काल
परिस्थिती प्रमाणे त्या 'क्रांती' मागील कारणे बदलत राहतात. पण प्रस्थापित
विरुद्ध क्रांतिकारी हा संघर्ष मात्र सर्व ठिकाणी समान असतो.
या संघर्षात काळी आणि पांढरी बाजू असे चित्रपटातल्यासारखे ढोबळ भेद करणे कठीण असते. कारण प्रत्येक समाजात विविध घटकांचे हितसंबंध इतके विचित्र प्रकारे गुंतलेले असतात की सुक्याबरोबर ओले जळणे अपरिहार्य असते. अशा प्रकारचे जवळजवळ सर्वच संघर्ष हे प्रथमत: वैचारिक आणि काही वेळा अंतिम पर्याय म्हणून शस्त्रांच्या आधारावर लढले जातात. अशा संघर्षांमध्ये प्रत्येक गट हा उच्च आणि उदात्त मानवी मूल्यांसाठी लढत असल्याचा कानठळ्या बसवणारा उदघोष करत असतो. पण त्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर असे दिसते की या पवित्र कार्यामागच्या प्रेरणा ह्या प्रस्थापित वर्गाच्या प्रेरणेपेक्षा फार वेगळ्या नाहीत. किंबहुना स्वत: प्रस्थापित वर्गाचा भाग होणे हीच बहुतेक क्रांत्यांमागील प्रेरणा असते. शिवाय या क्रांतीमध्ये सामील झालेल्या प्रत्येक गटाची कारणे वेगवेगळी असू शकतात. त्यातून निर्माण होणारे अंतर्गत संघर्ष हे क्रांतिकारकांचे रुपांतर सत्तापिपासू गटांमध्ये करू शकतात. जगात आजपर्यंत झालेल्या जवळपास सर्वच क्रांत्यांचा इतिहास हा याच मार्गाने जातो.
कोणतीही समाजव्यवस्था किंवा राज्यव्यवस्था ही काही सामाजिक घटकांसाठी उपकारक तर काहींसाठी अपकारक ठरत असते. मानवी समाज ही एक गतिशील व्यवस्था असल्यामुळे त्या समाजात देश काल परिस्थिती प्रमाणे निर्माण होणारे विविध घटक हे स्वत:च्या सोयीनुसार व्यवस्था बदलण्यासाठी संघर्ष करत राहतात. या संघर्षासाठी जनशक्ती लागते. जनशक्तीसाठी प्रेरणा लागते आणि प्रेरणा मिळण्यासाठी चेहरे लागतात. म्हणूनच प्रत्येक संस्कृतीच्या नावाखाली वावरणाऱ्या गटाला स्वत:चे नायक शोधणे अपरिहार्य असते. तो नायक कधी वामन असतो तर कधी बळीराजा.
Jidnyasu यांच्या प्रतिक्रियेवर माझे स्पष्टीकरण...
नमस्कार जिज्ञासू....
आपण अतिशय छान आणि सभ्य प्रतिक्रिया दिली
याबद्दल प्रथमतः आपणास धन्यवाद देतो. क्रांती मागील कारणमिमांसा जी आपण केली आहे
ती योग्य आहे. समाजातील कोणतीही व्यवस्था प्रत्येक घटकाला पुरेपूर न्याय देवू
शकणार नाही, तशी
परिपूर्णतेची अपेक्षाही करणे योग्य होणार नाही. परंतु त्या व्यवस्थेने निदान
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न जर
प्रामाणिकपणे केला गेला तर राहिलेल्या त्रुटींना ती व्यवस्था जबाबदार नसेल.
त्यामुळे जरी समाजातील असंतुष्ट घटकांनी बंड केले तरी व्यवस्थेला कोणताही दोष
लागणार नाही.
परंतु त्या व्यवस्थेने जर एका घटकाचा अभिमान
कुरवाळून दुसऱ्या घटकाच्या अस्मितेच्या चिंध्या करायचे ठरवले तर ती व्यवस्था
निर्दोष आहे असे कसे म्हणता येईल. समाजातील प्रत्येक घटकाला पुरेपूर न्याय देता
येणार नाही हे जरी सत्य असले तरी जाणीवपूर्वक ठराविक घटकांच्या मुलभूत हक्कांची
पायमल्ली करणे हे कोणत्याही निकोप व्यवस्थेचे लक्षण खचितच नाही.
आपल्या म्हणण्यानुसार प्रस्थापित आणि
क्रांतिकारी यामध्ये काळी आणि पांढरी बाजू असे ढोबळ भेद करणे कठीण असते. पण जर आपण
या भेदांना कारणीभूत ठरणारे जात,
धर्म, वंश, प्रांत, भाषा बाजूला ठेवून निष्पक्ष चिकित्सा केली तर आपणाला निश्चितच काळी
बाजू आणि पांढरी बाजू असा भेद करता येईल. परंतु त्यासाठी सर्व पूर्वग्रह मनातून
काढावे लागतील. अशा क्रांतिकारी संघर्षामध्ये प्रत्येक गट हा उच्च आणि उदात्त
मानवी मूल्यांसाठी लढत असल्याच्या वल्गना करतो किंवा तसे भासवण्यासाठी खास प्रयत्न
करतो. हे अगदी खरे आहे. परंतु उच्च मानवी मूल्ये, मानवता, संस्कृती
यांच्या प्रत्येकाच्या व्याख्या निरनिराळ्या असतात हेही विसरता कामा नये. हिटलरने
आपणापेक्षा वेगळ्या वंशाचे असणाऱ्या ज्यू लोकांची अमानुष कत्तल केली. हिटलरच्या
दृष्टीने ते उदात्त मानवी कार्यच होते. जिहादी आतंकवादी अनेक ठिकाणी दहशतवादी
कारवाया करतात. त्यात परधर्माची माणसे मारणे हे त्यांच्या दृष्टीने उदात्त मानवी
कार्यच आहे. परंतु तटस्थ भूमिकेतून दोघांच्याही या कार्याकडे पाहिले तर हे हे उच्च
मानवी मूल्ये जोपासणारे नाही तर सर्व प्रकारच्या मानवी मुल्यांची पायमल्ली करणारे, माणुसकीला काळीमा फासणारे कार्य आहे हे
सर्व जाणतात. म्हणजे हिटलर म्हणाला कि मि मानवी मूल्ये जोपासातोय, तरी त्यावर आपण कसा विश्वास ठेवणार ? हिटलरची
बाजू काळी आहे हे आपण मान्य करायला हरकत नाही. याचाच अर्थ काळी बाजू आणि पांढरी
बाजू असा सरळसरळ भेद आपण करू शकतो.
सांस्कृतिक संघर्षासाठी जनशक्तीची मने तयार
करताना त्यांना काहीतरी प्रेरणादायी इतिहास नजरेसमोर उभा केला पाहिजे. ज्यातून ते
प्रेरणा आणि लढण्यासाठी उर्जा घेवू शकतील असे महानायक शोधणे आवश्यकच असते. तो
क्रांतीचा एक अविभाज्य भाग असतो. परंतु असे नायक शोधताना त्यांचा इतिहास आपणाला
नजरेआड करून चालत नाही. ज्या व्यवस्थेचे निर्मुलन करण्यासाठी आपण क्रांती करायची
आहे तशीच व्यवस्था परत एकदा आपल्यामार्फत लादली जावी असे कोणत्याही क्रांतिकारकाला
(अपवाद वगळता) वाटणार नाही. प्रस्थापित व्यवस्था उखडून फेकल्यानंतर एक पर्यायी
व्यवस्था समाजाला दिली पाहिजे. ती जर देण्यात क्रांतिकारी अयशस्वी झाले तर समाजात
अराजकता माजण्याची दाट शक्यता असते. आणि अशी पर्यायी व्यवस्था देताना ती उच्च
मानवी मूल्ये जोपासणारी, समाजातील
सर्व घटकांना न्याय देण्याचा निदान प्रामाणिक प्रयत्न
करणारी आणि जात, धर्म, भाषा, प्रांत याच्या आधारे समाजात भेद निर्माण न करणारी असावी.
क्रांतीच्या प्रणेते म्हणून जे नायक आपण शोधतो
निवडतो त्यामागेही फार मोठी कारणमिमांसा आहे. बहुजन समाजाने बळी का निवडला, वामन का नाही ? याचे कारण कोणत्याही वांशिक, जातीय भेदात नाही तर; बळी हा उच्च मानवी मुल्यांचा खंदा
पुरस्कर्ता आहे म्हणून आहे. बळी मानवी मूल्ये जपणारा होता कि त्याच्या
समर्थकांकडून त्याचा अवाजवी गौरव केला जातो हे ओळखणेही फार अवघड नाही. बळीराजा आणि
वामन यांच्या संदर्भात जी गोष्ट सांगितली जाते किमान त्यावरून तरी वामन हा बळीवर
अन्याय करणारा होता हेच दिसून येईल. काल्पनिक गोष्टीना आपण थारा द्यायचा नाही असे
ठरवले तरी पुराणातील सर्वच गोष्टी नाकारता येणार नाही. मात्र त्यावरील
जातीद्वेषाची पुटे दूर करून खरा इतिहास शोधला पाहिजे.
महात्मा फूले बहुजन समाजाला आपले नायक वाटतात.
तर बऱ्याच ब्राम्हणांना ते खलनायक वाटतात. सनातनसारख्या संघटना, त्यांची
वृत्तपत्रे आणि अनेक ब्राम्हण त्यांची खुलेआम
निंदानालस्ती करत असतात. तात्पर्य फूले बहुजनांचे नायक आहेत तर ब्राम्हणांच्या
दृष्टीने खलनायक आहेत. ज्या फुल्यांनी ब्राम्हण विधवांसाठी आणि त्यांच्या नवजात
बालकांचा जीव वाचवा म्हणून त्या काळी बालहत्या प्रतिबंध ग्रह स्थापन केले, ते फूले बहुजनच काय ब्राम्हनांचेही
नायक नाहीत काय ? म्हणजे
इथे नायक म्हणून निवडताना महात्मा फूले ही एक व्यक्ती विचारात घेतलेली नाही, फूले यांची जात-धर्म विचारात घेतलेला नाही.
महात्मा फुलेंनी जे उच्च मानवी मुल्यांची जोपासना केली आहे, मानवता धर्माचा नेहमी आग्रह केला आहे , या गोष्टी विचारात घेतल्या आहेत. आणि
आयुष्यभर ज्या ब्राम्हणी प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष केला ती प्रवृत्ती जोपासणाऱ्या
ब्राह्मणांसाठी बालहत्या प्रतिबंध ग्रह स्थापन केले. म्हणजे फूले यांना बहुजन
समाजाने जो आपल्या क्रांतीचा महानायक म्हणून निवडले आहे ते अतिशय योग्य आहे.
बळी आणि महात्मा फूले ही प्रातिनिधिक उदाहरणे
आहेत. नायक बळी किंवा वामन असला तरी त्याची निष्पक्ष चिकित्सा झाली पाहिजे. तशी
चिकित्सा केल्यानंतर बळी कसोटीला उतरलाय हे वास्तव आहे. बळी हा मानवी मुल्यांचा
भोक्ता तर वामन हा अन्याय्य, विषमतावादी
प्रवृत्तीचा समर्थक आहे यात शंका नाही.
7 टिप्पणी(ण्या):
aitshay sundar prakash bhau
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
बळी आणि महात्मा फूले ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. नायक बळी किंवा वामन असला तरी त्याची निष्पक्ष चिकित्सा झाली पाहिजे. तशी चिकित्सा केल्यानंतर बळी कसोटीला उतरलाय हे वास्तव आहे. बळी हा मानवी मुल्यांचा भोक्ता तर वामन हा अन्याय्य, विषमतावादी प्रवृत्तीचा समर्थक आहे यात शंका नाही.
...purnataa nyaypurn nishkarsh ahe ha!
माझ्या प्रतिक्रियेवर आपण खास दखल घेऊन स्वतंत्र लेख लिहिला याबद्दल मन:पूर्वक आभार. या प्रतिक्रियेमागील माझा उद्देश हा कोणत्याही विशिष्ट गटाचे समर्थन करणे किंवा विरोध करणे असा नव्हता हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. आपण मांडलेले मुद्दे निश्चितच विचारणीय आहेत. परंतु काही बाबींचे स्पष्टीकरण करणे आवश्यक वाटले. त्यासाठीच ही प्रतिक्रिया देत आहे.
कोणत्याही सामाजिक संघर्षाचा उहापोह करताना काही मूलभूत बाबी प्रामुख्याने विचारात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे मानवी मूल्ये, त्या मूल्यांवर अधिष्ठित असलेल्या विचारधारा आणि त्यांच्या आधारे जोपासले जाणारे समाजातील निरनिराळ्या गटांचे हितसंबंध. वस्तुत: मानवी मूल्ये ही एक अमूर्त संकल्पना आहे. त्यांचे समर्थन कोणत्याही तर्काच्या आधारे करता येत नाही. ती स्वयंभू आहेत. या अमूर्त मूल्यांना व्यावहारिक पातळीवर आणण्यासाठी जे प्रयत्न होत असतात त्यातूनच मूल्याधिष्ठित विचारधारा निर्माण होतात. परंतु निव्वळ विचारधारा पुरेशा नसतात. त्या विचारधारांच्या माध्यमातून आपले हितसंबंध जपले जाऊ शकतील अशी खात्री सामाजिक संघर्षात गुंतलेल्या गटांना व्हावी लागते. उदा. हिटलरने ज्यू लोकांच्या कत्तली केल्या ह्या घटनेचा खूप गवगवा केला जातो. पण हिटलरला दोष देणाऱ्या युरोपीय देशांनी शेकडो वर्षे त्याच ज्यू लोकांचा कसा धार्मिक छळ केला हे सांगणे खुबीने टाळले जाते. इन्क्वीझिशनच्या नावाखाली किती निष्पाप लोकांचा बळी घेतला ह्याचा उल्लेख होत नाही. जर हिटलरने साम्राज्यवादी धोरण न राबवता केवळ ज्यू लोकांच्या कत्तलींचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला असता तर युरोपीय देशांनी त्याच्या विरोधात आघाडी उघडली असती का हे सांगणे अवघड आहे. मग मानवी मूल्यांचा कैवार घेणाऱ्या अमेरिकेने रेड इंडियन्सच्या निर्घृण कत्तली आणि काळ्यांच्या गुलामीचा इतिहास सोयीस्करपणे विसरणे हे स्वाभाविकच म्हणावे लागेल.
या जुन्या काळातील गोष्टी आहेत. पण ज्यावेळी अमेरिका जपान विरुद्ध युद्धात उतरली त्यावेळी जपानी-अमेरिकन नागरिकांचे रूझवेल्ट सारख्या उदारमतवादी नेत्याने काय केले ते (http://en.wikipedia.org/wiki/Japanese_American_internment)या दुव्यावर अवश्य वाचून पाहावे. एकाच तोंडाने हिटलरला हुकुमशहा म्हणणे आणि त्याच तोंडाने भारतावर लादलेल्या गुलामीचे समर्थन करणे हे करणारे चर्चिलसारखे नेते याच व्यवस्थेतून निर्माण होतात.
केवळ काही विशिष्ट मूल्यांवर आधारित नाही एवढ्याच कारणासाठी कोणी प्रस्थापित व्यवस्था उलथण्याचा विचार करत नाही. जेव्हा अशी व्यवस्था समाजातील काही घटकांच्या हितसंबंधाना बाधा आणू लागते तेव्हाच तिला उलथून टाकण्याची त्या घटकांची मानसिकता तयार होते. कोणतीही व्यवस्था तोपर्यंतच प्रस्थापित असू शकते जोपर्यंत ती समाजातील बहुसंख्य घटकांच्या हितसंबंधाना छेद देऊन जात नाही (निदान जोपर्यंत त्यांना तसे वाटत नाही). तेव्हा बळी किंवा वामन हे कोणत्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात हा मुद्दा गौण असून त्यांच्या नावावर संघर्ष करणारे गट ज्या व्यवस्थेचा पुरस्कार करत आहेत त्या व्यवस्थेत आपले हितसंबंध सुरक्षित राहतील अशी खात्री ते समाजातील बहुसंख्य घटकांना देऊ शकतात का हा कळीचा मुद्दा आहे. तेव्हा मानवी मूल्यांचा आणि विचारधारांचा पुरस्कार करणारे गट गरज पडल्यास त्यासाठी स्वत:च्या हितसंबंधांवर पाणी सोडायला तयार आहेत का हा प्रश्न महत्वाचा आहे.
Dear prakash, whatever u wrote is fact and i am totally agree with u. Nowdays there is need to fight against bramhanvad.
बळी आणि महात्मा फूले ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. नायक बळी किंवा वामन असला तरी त्याची निष्पक्ष चिकित्सा झाली पाहिजे. तशी चिकित्सा केल्यानंतर बळी कसोटीला उतरलाय हे वास्तव आहे. बळी हा मानवी मुल्यांचा भोक्ता तर वामन हा अन्याय्य, विषमतावादी प्रवृत्तीचा समर्थक आहे यात शंका नाही.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ