सोमवार, जून २०, २०११

शिवशक्ती-भीमशक्ती भाग २- शिवसेना आंबेडकरी विचार पचवू शकेल ?

रामदास आठवलेंनी शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेवून सर्वच परिवर्तनवादी घटकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याला शिवसेनेचा आजपर्यंतचा इतिहास कारणीभूत ठरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, मागास समाजाच्या उन्नतीसाठी चळवळ उभी केली. देशाच्या सामाजिक पटलावर आपले क्रांतिकारी विचार मांडले. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्याना नेहमीच सामाजिक टीकेचे लक्ष बनावे लागले आहे. अन्यायकारक व्यवस्था उलथवून टाकून समतावादी समज निर्माण करण्यासाठी जे-जे महापुरुष धडपडले त्यांची प्रथमदर्शनी समाजाने उपेक्षाच केली. परंतु जेव्हा त्या महापुरुषांच्या कार्याचे खरे मोल समाजाने जाणले तेव्हा मात्र त्या महापुरुषांचा गौरव व्हायला सुरुवात झाली. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर या सर्वाना याच चक्रातून जावे लागले. डॉ. बाबासाहेबांची तर समाजाने प्रचंड उपेक्षा केली. आजही बाबासाहेना नाकारणारी किंवा त्यांच्या विचारांची हेटाळणी करणारी माणसे कमी नाहीत. अनेकांना बाबासाहेबांची नेहमीच अलर्जी होती आणि आहे. शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरेही याला अपवाद नाहीत. खरेतर बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब समविचारी. परंतु जिथे शिवसेना प्रबोधनकारांचे विचार पचवू शकली नाही तिथे त्यांनी बाबासाहेबांचे विचार स्वीकारावेत असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. शिवसेनेच्या स्थापनेनंतर ज्या पद्धतीने शिवसेनेने हिंदुत्वाचे निशाण उचलले ते पाहता यापुढील काळात शिवसेना वेगळा विचार स्वीकारेल असे वाटत नाही. शिवसेना आणि बाबासाहेबांचा विचार या दोन गोष्टी परस्परविरोधी आहेत. शिवसेना ज्या कथित हिंदुत्वाचा पुरस्कार करते ते हिंदुत्व सामान्य लोकांचे नसून मुठभर उच्चवर्णीयांचे आहे. बाबासाहेबांनी शोषित घटकांसाठी संघर्ष करताना हेच कथित हिंदुत्व वेळोवेळी नाकारले. बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा पैकी एकतरी प्रतिज्ञा शिवसेनेला मान्य आहे का ?

बाळासाहेब ठाकरे यांनी आजपर्यंत मंडल आयोग, आरक्षण, रिडल्स इन हिदुइझम अशा गोष्टीना वारंवार विरोध केला. रमाबाई आंबेडकर नगर दंगल प्रकरणी शिवसेनेने काय भूमिका घेतली ते सर्वाना माहित आहे. रिडल्स प्रकरण प्रतिष्ठेचे करून मागास दलित समाज आणि इतर बहुजन समाज यांच्यात वितुष्ट निर्माण होण्यात सेनेचा फार मोठा हात आहे. उठसुठ सत्ताधारी पक्षांना धारेवर धरणाऱ्या शिवेसेनेला खैरलांजी प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे शक्य असताना त्यांनी शांत राहण्याची भूमिका घेतली. त्यांना जर मागास, शोषित घटकांबद्दल थोडी जरी आस्था असती तरी शिवसेनेने खैरलांजी प्रकरण उचलून धरले असते. बाबासाहेबांना निजामाचे हस्तक संबोधून बाळासाहेबांनी त्यांचा किती मोठा अपमान केला. बाबासाहेबांचे विचार पटत नसतील इथवर ठीक आहे. परंतु द्वेषाने एका महान युगपुरुषावर चिखलफेक करताना शिवसेना आणि बाळासाहेब यांनी थोडाही विचार केला नाही. डॉ. बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे यासाठी आंबेडकरी समाजाने संघर्ष चालू केला त्यावेळी “घरात नाही पीठ अन कशाला हवे विद्यापीठ” अशी भूमिका घेतली. बाळासाहेबांची ही भूमिका कोणते दलित हित जपणारी होती याचे उत्तर आठवले साहेबांनी द्यावे. जर त्यांना माहित नसेल तर त्यांनी किमान बाळासाहेबांना तरी विचारावे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला आमचा विरोध कधीच नव्हता, उलट पाठिंबाच होता इतके धडधडीत खोटे बोलण्यापर्यंत शिवसेनेची मजल गेली आहे. नामांतराच्या आंदोलनात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. शेकडो संसार उध्वस्त झाले. ज्या माताभगीनिंच्या संसाराची राखरांगोळी झाली त्यांच्या अश्रुंचे शिवसेनेच्या लेखी काय मोल आहेत ? राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व अशी भूमिका घेणारी शिवसेना कधीही दलित समाजाची तारणहार बनू शकली नाही हेच वास्तव आहे. 

काही लोक म्हणतील जे झाले ते झाले. आज नव्या उमेदीने सेना आणि आठवले एक येत असतील तर ही सामाजिक परिवर्तनाची नांदीच नाही का ? जेव्हा सामाजिक परिवर्तनासाठी निस्वार्थी भावनेने प्रयत्न केले जातात तेव्हाच परिवर्तन शक्य आहे. कोणत्यातरी स्वार्थासाठी एकत्र येवून खेळल्या जाणाऱ्या राजकीय डावपेचांना सामाजिक परिवर्तन म्हणण्याइतपत आपली सामाजिक संवेदना बधीर झाली आहे का याचा विचार प्रत्येकाने करावा. ज्या गोष्टी घडून गेल्या त्या एकवेळ विसरता येतील. परंतु घडून गेलेल्या चुकीच्या गोष्टींचा साधा पश्चाताप होणार नसेल तर झाले गेले विसरून जा असे म्हणणे योग्य नाही. शिवसेनेने आजपर्यंत बाबासाहेबांना स्वीकारले नाही. निदान यापुढे तरी सेना बाबासाहेबांचा विचार मान्य करणार असेल तर निश्चितच चांगली गोष्ट आहे. परंतु बाळासाहेबांनी किंवा शिवसेनेने अधिकृतपणे कधीही बाबासाहेबांच्या विचारांचे समर्थन केले नाही. आठवले यांनी सेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतरही सेनेने बाबासाहेब आणि दलित समाजाबद्दलचा आपला दृष्टीकोन जाहीर केला नाही. दलितांवर अन्याय करणारे बहुतांशी कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचेच लोक आहेत असेच शिवसेना नेहमी म्हणत आली आहे. दलित समाजावर अन्याय-अत्याचार होतात हे त्यांना मान्य आहे. परंतु अशा अन्यायाविरुद्ध समर्थपणे आपली ताकद पणाला लावावी असे शिवसेनेला कधीच का वाटत नाही. आजपर्यंत दलित समाजाच्या कोणत्या प्रश्नासाठी शिवसेनेने संघर्ष केला आहे ? शिवसेनेने पूर्वीची संकुचित भूमिका बदलून बाबासाहेबांच्या विचारांना पोषक अशी व्यापक भूमिका घेतली असती तरी आठवलेंचा निर्णय योग्य मानता आला असता. परंतु सेना आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे ते बाबासाहेबांचा विचार स्वीकारतील याची काडीमात्र शक्यता नाही. भीमशक्ती बद्दल शिवसेनेला वाटणारे प्रेम हे पुतनामावशीचे प्रेम आहे हे येणारा काळ दाखवून देईल. 
(पुढील भागात- आजवर दलितांचे तारणहार म्हणवून घेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने दलित, मागास समाजाची भरपूर फसवणूक केली. आंबेडकरी विचार फक्त मतांसाठी वापरला. उठसुठ फुले-शाहू-आंबेडकरांचा जयघोष करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे खरे स्वरूप पुढील भागात.)

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes