सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, ते
शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीच्या चर्चेमुळे. रामदास आठवले यांनी शिवसेनेबरोबर
जाण्याचा निर्णय घेतला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली.
आजपर्यंत दलितांचे तारणहार म्हणवून घेत हे पक्ष महाराष्ट्रातील बहुतांश दलित मतदार
स्वतःकडे वळवून घेण्यात यशस्वी झाले होते. परंतु रामदास आठवलेंच्या शिवसेनेशी युती
करण्यामुळे आपला पारंपारिक आणि हक्काचा मतदार असलेला दलित वर्ग आपल्यापासून दूर
जाईल या भीतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सैरभैर झाले आहेत. प्रसारमाध्यमातून या
युतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु हि चर्चा करत असताना काही महत्वाच्या
मुद्द्यांना जाणीवपूर्वक बगल दिली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही मुद्द्यांची
चर्चा करुया.
भाग १ : केवळ आठवले गट म्हणजे संपूर्ण भीमशक्ती ?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना-भाजप युतीला रामदास आठवले
यांनी साथ दिली आहे. शिवसेनेचे धनुष्य आपल्या खांद्यावर घेवून आठवले
कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर शरसंधान करीत आहेत. आजवर अनेक पक्षांनी आंबेडकरी पक्षांना
आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा
यापैकी कोणीही त्याला अपवाद नाहीत. सर्वाना दलितांची मते हवी असल्याकारणाने दलित
पक्षांना चुचकारून त्यांची एकगठ्ठा मते मिळवता येतील म्हणून अनेकांनी व्यूहरचना
केल्या. परंतु हे सर्व करत असताना केवळ रामदास आठवलेच जास्त चर्चेत राहिले.
भीमशक्ती म्हणजे केवळ रामदास आठवले गट अशा प्रकारचा समज सर्वानी का करून घेतलाय ते
काही समजत नाही. आठवले गटाव्यतिरिक्त इतरही आंबेडकरी पक्ष आहेत. त्यांना का टाळले
जात आहे त्याचीही करणे शोधली पाहिजेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, अस्पृश्य जनतेच्या कल्याणाकरिता
सामाजिक चळवळ उभारली. वर्षानुवर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या या वर्गाला ‘शिका,
संघटीत व्हा अन संघर्ष करा’ हा मूलमंत्र देवून सामाजिक, राजकीय पटलावर सन्मानाने
उभे केले. राजकीय सत्तेशिवाय संपूर्ण स्वातंत्र्य शक्य नाही हे बाबासाहेबांना
चांगलेच ठावूक होते. राजकीय संघटना, पक्ष स्थापन करण्यामागे बाबासाहेबांचा
दृष्टीकोन विशाल होता परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांची राजकीय चळवळ समर्थपणे पुढे
नेण्यात त्यांचे अनुयायी अपयशी ठरले. करणे कोणतीही असोत, मात्र बाबासाहेब आंबेडकर
या युगपुरुषाने जे स्वप्न पहिले होते ते त्यांच्या अनुयायांना सत्यात उतरवता आले
नाही हे वास्तव आहे. आपसातील मतभेद, वैयक्तिक हेवेदावे अशा कारणांमुळे आंबेडकरी
चळवळीला फुटीचे ग्रहण लागले. बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्षाचे तुकडे
झाले. या तुकड्यांबरोबरच आंबेडकरी जनताही अनेक तुकड्यांमध्ये विभागली गेली.
सर्वांचे वैचारिक अधिष्ठान एक असूनही या पक्षांना एकत्र येणे जमले नाही.
एखादा-दुसरा अपवाद वगळता दलित पक्ष आणि त्यांचे नेते मनाने कधीच एक झाले नाहीत.
आजही रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट-तट अस्तित्वात आहेत. यातील काही गटांचे
अस्तित्व केवळ नावापुरतेच आहे परंतु काही गट मात्र आपला प्रभाव टिकवून आहेत.
रिपब्लिकन पक्षाचा आठवले गटही याच प्रवर्गात येतो. पेंथरच्या चळवळीतून रामदास
आठवले यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व पुढे आले. रामदास आठवले गटाचे कार्यकर्ते
संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रभर आठवलेंना मानणारा मोठा वर्ग आहे.
त्यामुळेच आठवलेंची राजकीय भूमिका सर्वच पक्षांसाठी महत्वाची असते. आठवले गटाच्या
या प्रभावामुळेच सर्व पक्ष, नेते आठवलेंना चुचकारायचा प्रयत्न करतात. परंतु सर्वच
दलित जनता आठवलेंच्या पाठीशी आहे असे म्हणता येणार नाही. रिपब्लिकन पक्षाच्या इतर
गटांचीही भूमिका अतिशय महत्वाची आहे. तरीही केवळ आठवलेंचा गट म्हणजे भीमशक्ती अशा
प्रकारची मांडणी चुकीची आहे. आणि ही चूक महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष तर करतच
आहेत, मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसारमाध्यमातूनही अशाच प्रकारची
मांडणी चालू आहे. भीमशक्तीची नेमकी व्याख्या काय याचा विचार यानिमित्ताने करावा
लागणार आहे, कारण मनुवादी मेडिया नेहमीच चुकीचा इतिहास समाजावर लादण्याचा आटोकाट
प्रयत्न करत आहे. तसा भीमशक्तीचा चुकीचा इतिहास सांगितला, लिहिला जावू नये यासाठी
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सावध राहण्याची गरज आहे.
(पुढील भागात - रामदास आठवले यांनी कुणासोबत युती करायची याचे त्यांना
पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु जो पक्ष बाबासाहेबांचा वारसा सांगतो त्यांनी
शिवसेनेसारख्या पक्षाशी युती करण्यामुळे यावर जास्त चर्चा होत आहे. कारण शिवसेनेचा
आजपर्यंतचा डॉ. बाबासाहेब आणि दलित समाजाप्रती असणारा दृष्टीकोन त्याला कारणीभूत
ठरला आहे. बाबासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाशी युती करण्याची शिवसेनेची
योग्यता आहे का याचा लेखाजोखा पुढील भागात....)
7 टिप्पणी(ण्या):
जय भीम प्रकाश साहेब अत्यंत सुंदर झालाय लेख परंतू पुढील भाग येउद्यात .. मी आवर्जून वाट पाहत आहे ....
वैभव छाया ..
आभारी आहे वैभव. आजच दुसरा भाग टाकतोय.
लेख अत्यंत सुंदर आहे. पुढील भागाची वाट पाहत आहे. जयभीम.
डॉ. संजीव गायकवाड
sunder lekh ahai jay bhim
@Sanjiv
धन्यवाद संजीव जी....
ramadas aathavale shivsene chya barobar gele tar tyat gair kay ahe.
रामदास आटवले कुटेही जावो, काही फरक पडत नाही. बाल ठाकरे उद्धव व राज हे कधीच दलित समाजाला जवळ करणार नाहीत आणि राजकारणासाठी मात्र त्यांचा वापर करतील आणि नंतर फेकून देतील. आठवले ना हे काळात नाही काय
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ