रामदास आठवले यांनी शिवसेनेचे धनुष्य खांद्यावर
घेतल्यापासून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला. शिवसेना कशी जातीयवादी आहे आणि
त्यांना बाबासाहेबांच्या विचारांची कशी अलर्जी आहे याचा लेखाजोखा सारेजण मांडत
आहेत. ज्यांच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून आठवले सेनेसोबत गेले त्या
कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेही आठवले आणि सेना या दोघांना टीकेचे लक्ष बनवले आहे.
आठवलेंचे सेनेसोबत जाणे हा बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे, आठवले
बाबासाहेबांचा विचार विसरले अशा प्रकारची मांडणी सत्ताधाऱ्यांनी सुरु केली. मुळात
सत्ताधाऱ्यांना आठवलेंच्या या भूमिकेवर बोलण्याचा अधिकार आहे का तेही तपासून
पाहायला हवे.
आठवले सेनेसोबत जाणार हे स्पष्ट होताच
कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपले डावपेच खेळण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीने सामाजिक
हक्क परिषद भरवून आम्हीच दलित मागास जनतेचे कैवारी...