![]() |
जातींची उतरंड कधी नष्ट होणार ? |
‘जात नाही ती जात’ असे जरी आपल्या जातीव्यवस्थेबद्दल किंवा जातींबद्दल बोललं जात असलं तरी ते पूर्ण सत्य नाही. ते अर्धसत्य आहे. कारण खरं सत्य आहे ते ‘मनातून जात नाही ती जात’. बऱ्याच वेळा या जाती नकोशा वाटतात. आरक्षणासारखा मुद्दा समोर आला तर मात्र या जातीव्यवस्थेचा (कि जातींचा) फारच तिटकारा यायला लागतो. या जाती नसत्या तर बरे झाले असते असे वाटू लागते. एकसंध समाज निर्माण व्हयला हवा अशी स्वप्ने काही जणांना पडू लागतात. परंतु खरोखर आपण मनातून जाती हद्दपार करू शकतो का ? या प्रश्नाचा प्रामुख्याने विचार करायला हवा. आणि माझातरी असा अनुभव आहे कि वरवर पाहता सर्व जाती-धर्माचे लोक दैनंदिन व्यवहारामध्ये जातीपातीना महत्व देत नाहीत असा भास निर्माण करत असले तरी मनातून मात्र जाती अधिक बळकट केल्या जातात. जातीव्यवस्था बळकट व्हायला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत त्याचा उहापोह करून या व्यवस्थेला सुरुंग लावण्याऐवजी जातीनाच दोष दिला जातो. आपणच कळत नकळत जाती कशा बळकट करत असतो त्याचा नुकताच विदारक परंतु अपेक्षित अनुभव आला.
मित्रांबरोबर अशाच गप्पा चालू होत्या. मधूनच आरक्षणाचा विषय निघाला. त्यावर टिपण्णी करताना एक मित्र म्हणाला, ‘त्यांचे (मागास जातींचे) बरे आहे. सगळीकडे त्याना सवलती मिळतात. फी माफ होते. आम्हाला मात्र संपूर्ण फी भरायला लागते. हे आरक्षण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्यांचे लाड होणार आणि आमची मात्र कुचंबना होणार.’ अशी प्रतिक्रिया अनपेक्षित नव्हती. काही अपवाद वगळता बहुतांशी लोक अशाच पद्धतीने विचार करतात. जातीव्यवस्था, आरक्षण याबद्दल पुरेपूर ज्ञान आणि जाणीव असणाऱ्या व्यक्ती अशा प्रतिक्रिया देणार नाहीत. परंतु आरक्षणाबद्दल ऐकीव माहितीच्या आधारे करून घेतलेल्या गैरसमजुतीमुळे अशा प्रकारची मानसिकता तयार होत असते.
जास्त काही न बोलता त्या मित्राला एकच प्रश्न केला, ‘तू खालच्या (?) जातीच्या मुलींबरोबर लग्न करशील’ ? अनपेक्षित प्रश्नाने तो क्षणभर गोंधळला. परंतु लगेच त्याने उत्तर दिले, ‘नाही’. मी म्हणालो, ‘का’ ? तर म्हणाला, ‘घरचे माझा जीव घेतील’. (घरच्यांच्या माथ्यावर सगळे खापर फोडून तो रिकामा झाला.) मग मी त्याला म्हणालो, ‘जर खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या मुलीबरोबर तू लग्न करायला तयार नाहीस, तुझ्या घराचे तिला स्वीकारायला तयार होणार नाहीत. याचा अर्थ आपण मनातून जाती जपतोय. ज्या जातींबद्दल आपणाला किळस वाटते त्यांचे जीवन एकदा जवळून बघ. त्याना काय हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्याचा अभ्यास कर. जातीच्या आधारावर मिळणारे आरक्षण बंद करायला हरकत नाही, परंतु मागासलेल्या जातींना आपण समान सामाजिक दर्जा देणार आहोत का ? आणि आरक्षण बंद केले तरी मनातील जाती जाणार आहेत का ? जर आपण त्याना बरोबरीच्या नात्याने वागवू शकत नसलो तर त्याना जातीच्या आधारावर ज्या सवलती मिळतात त्या का बंद करायच्या?
वास्तविक पाहता कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधून त्यावर उपाय केले तरच काहीतरी सकारात्मक परिणाम दिसून येईल. परंतु आपली मानसिकता मात्र स्वच्छ पाहिजे. ज्यांना मनातून जाती जपायच्या आहेत त्यांना जातीव्यवस्था आणि आरक्षण या गोष्टींवर बोलायचा नैतिक अधिकार नाही.
फुले-शाहू-आंबेडकरी विचाराने प्रभावित झालेल्या बहुजन समाजाने मात्र या जातींना हद्दपार केले पाहिजे. एकमेकाबरोबर बोलले, एकत्र बसले, जेवले म्हणजे जातीव्यवस्था संपली असा तर्क काढणाऱ्याच्या बुद्धीची कीव करावी वाटते. कारण जातीपातीच्या समूळ उच्चाटनासाठी ‘रोटी-बेटी व्यवहार’ हा एकच प्रभावी मार्ग आहे. विविध जाती समूहामध्ये, धर्मामध्ये विवाह संबंध घडून यायला लागल्याशिवाय जातींची तीव्रता कमी होणार नाही.
हजारो जाती आणि पोतजातीमध्ये विभागलेल्या समाजाला एकच सांगणे आहे, ‘जाती तोडा, समाज जोडा’. आणि जर मनातून जाती हद्दपार नाही केल्या तर आपण एका नव्या मनुवादाला जन्म देवू.
2 टिप्पणी(ण्या):
kiti maratha tumche aiknaar pol saaheb. mi dalit aahe tar karil ka koni baman, maratha maazya mulishi lagna?
चांगले विचार! खरेच जाती नष्ट करण्यासाठी भिन्न जातीत रोटी -बेटी व्यवहार हाच उपाय आहे परंतु असे रोटी-बेटी व्यवहार होणे कठीण आहे.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ