
'मातृभाषेविषयी प्रामाणिक भूमिका' आणि 'मराठी शब्दांकडे दुर्लक्ष करणे चुकीचेच' ही पत्रं दि. २१ ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये वाचली. अनेकदा मराठीच्या प्रमाणिकरणाचा किंवा शुद्धतेचा अतिरेकी आग्रह धरला जातो. मायमराठी जगली पाहिजे, वाढली पाहिजे ही प्रत्येक मराठी भाषिकांची प्रामाणिक इच्छा असेल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा म्हणूनही प्रयत्न चालू आहेत. परंतु मराठीचे संवर्धन करण्यासाठी आपण ती भाषाच शुद्ध उच्चार, प्रमाणीकरण, व्याकरण अशा कुंपणानी बंद करणार असू तर तिची अवस्था साचलेल्या डबक्याप्रमाणे होऊन जाईल. भाषा ही नेहमी प्रवाही असते व ती तशीच असली पाहिजे. ज्ञानेश्वरकालीन मराठी, शिवकालीन मराठी आणि सध्या वापरात असलेली मराठी यामध्ये खूप फरक आहे....