गुरुवार, सप्टेंबर २६, २०१३

भालदेव, श्राद्धपक्ष व बळीराजाः शेतकर्‍यांचा प्रेरणादायी उत्सव!

भाद्रपदाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्व आहे. शूद्धपक्षात भालदेव व वद्यपक्षात पित्तरपाटा म्हणजे श्राद्धपक्ष साजरा केला जातो. भालदेव म्हणजे बलीदेव आणि बळीदेव म्हणजे बळीराजा होय. आजही ग्रामीण भागात दिवाळी- दसर्‍याच्या सणांमध्ये आमच्या आया-बहिणी आपल्या नातेवाईक पुरूषांना ओवाळतांना मोठ्या प्रेमाने म्हणातात, ईडापीडा जाओ, आणि बळीचं राज्य येवो!. भाद्रपदाच्या कृष्णपक्षात श्राद्धपक्ष म्हणून कडक सुतक पाळले जाते.  प्रा. श्रावण देवरे यांनी या सणांची माहीती देणारी पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यातील काही भाग आपल्या वाचकांसाठी देत आहोत.

बळीचं राज्य नवखंडांचं! अफगाणीस्थानच्या बलुचीस्थानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत म्हणजे पूर्ण अशिया खंडच समझा! म्हणून तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले भारत खंडाला बलीस्थान म्हणतात. पृथ्वीतलावरचा हा पहिला सम्राट, पहिला चक्रवर्ती, पहिला राजर्षी आणि पहीला छत्रपतीसुद्धा! कारण पाच हजार वर्षांपुर्वी पृथ्वीतलावर कोणत्याही भागात सुशासित राज्य स्थापन करण्याइतपत प्रगती केलेला माणूस अस्तित्वता नव्हता. भारतात मात्र सहा हजार वर्षांपूर्वीच सिंधू संस्कृती जन्माला आली होती. 

आताच्या आशिया खंडाच्या आकाराएवढे बळीचं राज्य! मात्र तरीही या राज्यात कायदा व सुव्यवस्था अगदी उत्तम होती. आज जगातल्या सगळ्या देशांमध्ये शासन-प्रशासनाची जशी रचना आपणास दिसते अगदी तशीच किंवा त्यापेक्षाही सरस व कार्यक्षम शासन-प्रशासनव्यवस्था बळीने आपल्या राज्यात निर्माण केलेली होती. नऊ खंड होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा या नावाने ओळखले जात होते. म्हणजे ज्याप्रमाणे भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसारखे राज्य आहेत, त्याप्रमाणे हे खंड होते. राज्याचा प्रमूख मुख्यमंत्री तसा खंडाचा प्रमुख खंडोबा! आजचे आपले माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या बलिस्थानातील महाराष्ट्राचे खंडोबा होय! राज्यात जसे जिल्हे असतात तसे बलीस्थानातील प्रत्येक खंडात अनेक जिल्हे असायचे व जिल्ह्याच्या प्रमुखाला जोतिबा म्हणायचे! म्हणजे आजचे धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री. प्रकाश महाजन हे बलीस्थानातील महाराष्ट्र खंडाच्या धुळे जिल्ह्याचे जोतीबा होत. आज प्रशासकीय सोयीसाठी तीन चार जिल्हे मिळून एक महसूल विभाग तयार केला जातो. उदाहरणार्थ, आपला नाशिक महसूल विभाग घ्या. पाच जिल्ह्यांचा मिळून नाशिक महसूल विभाग तयार केलेला आहे. तसे बळीच्या बलीस्थानात महसूल विभाग होते. त्यांना महासुभा म्हणत व त्याच्या प्रमुखाला महासुभेदार म्हणत. या शब्दाचा अपभ्रंश होऊन म्हसोबा झाला. आपल्या नाशिक महसूल विभागाचे प्रमुख श्री. रविंद्र जाधव हे आपल्या बलीस्थानातील नाशिक महसूल विभागाचे म्हसोबा आहेत. या प्रमाणे बलीस्थानात मल्हारी, भैरव असे काही दरबारी मंत्री व प्रशासकीय अधिकारी होते. हे सर्व मंत्री व अधिकारी इतके प्रामाणिक व कर्तव्यदक्ष होते की लोक त्यांना देव मानू लागले. आजही आपला बहुजन समाज जोतीबा, खंडोबा, मल्हार या दैवतांची पुजा करतात. पाच हजार वर्षांपूर्वी इतकी प्रगत समाजव्यवस्था जगात कोठेच अस्तित्वात नव्हती. बळीस्थान इतके प्रगत होते. याचा आपल्याला अभिमान असला पाहीजे.

अशा या महान बळीराज्याची आपण स्मृती जागवतो. भाद्रपदाच्या शुद्ध पक्षात शेणाचा बळी राजा म्हणजे भालदेवची स्थापना करतो. ही स्थापना आपापल्या कौटुंबिक परंपरेप्रमाणे 5 दिवसांची, सात दिवसांची असते. कृष्ण पक्षात मात्र पंधरा दिवस सुतक पाळले जाते. सर्व व्यवहार ठप्प होतात. बाजार वगैरे बंद ठेवतो. घरातील वस्तू बाहेर देत नाहीत किंवा विकली जात नाहीत. एवढे कडक सुतक भारतातला बहुजन समाज का पाळतो? या पंधरा दिवसांचा त्याच्याशी काय संबंध? वीर नाचविणे म्हणजे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपल्याला शोधायची आहेत. खरे म्हणजे ही उत्तरे शोधण्याची सुरूवात तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनीच केलेली आहे. त्यांच्या ‘गुलामगिरी’ ग्रंथात हा सर्व इतिहास त्यांनी सविस्तर मांडलेला आहे. आपण त्याचा येथे सारांशाने विचार करून भालदेव व पित्तरपाटाची माहीती करून घेणार आहोत.

बळीचं राज्य सुख समृध्दीने भरलेले होते व प्रजा गुण्यागोविंदाने नांदत होती. अशा या सुवर्णमय बलीस्थानावर परकीय रानटी टोळ्यांची वाकडी नजर पडली. हे परकीय रानटी म्हणजे आर्य लोक होत. या आर्य आक्रमकांच्याविरोधात शंखासूर, हिरण्याक्ष व नरकासूरापासून ते बळीपूत्र बाणासूरापर्यंत असा संपूर्ण बळीवंशच लढत होता. छोट्या-मोठ्या चकमकी व रणांगणावरील युध्दे होत होती. अनेक पिढ्यांमध्ये चाललेल्या या युध्दाचा इतिहास आर्यांनी दशावतरांच्या नावाने लिहून ठेवला आहे. परंतू खरा इतिहास विकृत करून भाकड कथांसारखा लिहीलेला आहे. त्याला धार्मिक मुलामा देऊन कुसंस्कारीत केले गेले आहे. यालाच पुराणकथा म्हणतात. गेल्या अडीच-तीन हजार वर्षांपासून हि पुराणे अनेक धार्मिक विधीच्या वेळेस वाचली जातात व त्यांची पारायणेही केली जातात. त्यामुळे हा खोटा इतिहास खरा म्हणून आपल्या मेंदूत बिंबवला गेला. या भाकड कथांमधून आर्य-ब्राम्हणांना असे सिद्ध करायचे असते की, ‘‘तुमचे बहुजन समाजाचे पूर्वज आमच्याशी लढलेच नाहीत, ते मुर्खच होते. आमच्या हुशार वामनाने तीन पावले जमीन मागीतली आणि तुमच्या भोळ्या-मुर्ख बळीराजाने सर्व राज्यच देऊन टाकले आणी आम्ही त्याला पाताळात गाडून टाकले.’’ असा विचार बहुजनांच्या मेंदूत बिंबवला जात आहे, त्याचे रूपांतर धार्मिक विधीत व कर्मकांडात होते व नंतर हा चुकीचा विचार पर्मनंट तत्वज्ञान म्हणून संस्कार स्वरूपात मानगुटीवर बसतो व सहजपणे शेकडो वर्षे समाजात प्रभाव गाजवत राहतो. याला पराभूत मानसिकता म्हणतात. बहुजन समाजाचे शिक्षण बंद पाडल्यामुळे ते आपल्या पूर्वजांचा इतिहास मुळ स्वरूपात लिहून ठेवू शकले नाहीत. याला सांस्कृतिक युध्द म्हणतात. या सांस्कृतिक युद्धात आपण नेहमीच पराभूत होत आलो आहोत. परंतू तरीही आमच्या काही अडाणी असलेल्या हुशार व दूरदृष्टीच्या पूर्वजांनी रूढी- परंपरेच्या व सण-उत्सवाच्या माध्यमातून आपला गौरवशाली इतिहास जतन करून ठेवला आहे. भालदेव स्थापनेचा उत्सव हा त्यापैकी एक होय. या सणामुळेच आपल्या बळीराजाचा खरा इतिहास जीवंत राहीला. 

ज्यांना आपण दशावतार म्हणतो ते मत्स्यावतार, कच्छावतार, वराह अवतार ते वामनअवतार वगैरे आहेत. ते ब्रम्हाचे अवतार आहेत असे पुराणांमध्ये सांगीतले जाते. परंतू हे अवतार म्हणजे त्या त्या काळात झालेल्या युध्दांचे आर्य-सेनापती होते. या सर्व युध्दांमध्ये कधी आपला विजय होत असे तर कधी पराजय होत असे. शंकासूर, नरकासूर, हिरण्याक्ष, बळी, बाणासूर हे सर्व राजे आपले बलीस्थानाचे शूर राजे होते. ते आर्यांच्या आक्रमणांविरोधात प्राणाची बाजी लावून लढलेत. अनेक पिढ्या चाललेल्या या युद्धांमध्ये सर्वात मोठे युद्ध म्हणजे बळी-वामनाचे युद्ध होय. हे जगातले पहिले महायुद्ध होय. यालाच खरे म्हणजे महाभारतीय युद्ध म्हटले पाहीजे. म्हणून भारतावर (बलीस्थानवर) प्रेम करणारा प्रत्येक माणूस या युध्दाची आठवण म्हणून व या युध्दात शहीद (हुतात्मे) झालेल्या आपल्या पुर्वजांचे स्मरण म्हणून पित्तरपाटाचा सण साजरा करतो. भारतभर वेगवेगळ्या नावाने हा उत्सव साजरा होतो. केरळमध्ये ओणम, तामिळनाडूमधे पोंगल, उत्तरप्रदेश-मध्यप्रदेशमध्ये पित्तर आदी नावाने बळीराजाचाच उत्सव देशभर साजरा होत असतो. प्राचीन काळातील भारतातला हा पहिला महापुरूष होय की ज्याचा स्मृती उत्सव भारतात सर्वत्र मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो.

कृषीसंस्कृतीच्या दुसर्‍या टप्प्यावरच्या क्रांतीचा नायक पुरूष होता व औत ओढणारा बैल हा सहनायक होता. म्हणून बैल पोळा या सणाला कृषी संस्कृतीत अनन्य महत्व प्राप्त झालं. बलीस्थानात हजारो वर्षांपासून तो साजरा केला जातो. असेच एके साली हा बैल पोळा बळीच्या राज्यातील जनतेने उत्साहाने साजरा केला. पाऊसाचा जोर कमी झाल्यावर वामनाचे हल्ले पुन्हा सुरू झाले होते. नेहमीप्रमाणे बळी राजाने पुन्हा सैन्याची जमवाजमव करून एका निकराच्या युद्धाची पूर्व तयारी सुरू केली. बैल पोळा संपताच भाद्रपद शूद्धप्रतिपदेपासून बळीच्या प्रजेने घरोघरी शेणाचा भालदेव स्थापन करून युद्धाची ललकारी ठोकली. आधुनिक काळात युद्धाचे रणशिंग फुंकण्याआधी देशात मिरवणूका वगैरे काढून वातावरण निर्मिती केली जाते. सरकारला व सैन्याला देशाच्या जनतेचा पूर्ण नैतिक पाठींबा आहे, असे त्यातून गृहीत धरले जाते. वामनाच्याविरोधातील महायुद्धात आपल्या लाडक्या बळीराजाला व त्याच्या सैन्याला पाठींबा देण्यासाठी बलीस्थानातील जनतेने शेणाचा भालदेव (बळीदेव) बसवला व उत्सव साजरा केला. आर्यवामनाचा कायमचा निकाल लावला पाहिजे, असा निर्धार करून भाद्रपदच्या शूद्धपक्षात तयारी पूर्ण केली. तिकडे वामनही तयारच होता. भाद्रपदच्या वद्यप्रतिपदेपासून युद्धाला तोंड फुटले. सर्व व्यवहार ठप्प झालेत. बाजार, खरेदी-विक्री, देवाण-घेवाण बंद झालीत. या युद्धात आपले काही शूर सरदार हुतात्मे झालेत. ते आपले पिता म्हणजे पितर होते. तेव्हापासून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाद्रपदच्या कृष्णपक्षात पित्तरपाटा साजरा होऊ लागला. त्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्राद्धपक्ष साजरा होऊ लागला. या पित्तरपाट्यात कडक सुतक पाळले जाऊ लागले. हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा होतो. ओणम, पोंगल, पित्तर वगैरे त्याची नावे आहेत.

भारतातील बहुजन समाज बळीचं राज्य यावं, म्हणून प्रयत्न करतो, मात्र दुसर्‍या बाजूने आर्यलोकही वेगवेगळी कारस्थाने करून आधुनिक बळीराज्यांना पाताळात गाडत राहतात. सत्तेवर असलेले आर्य लोक हुशार, धुर्त व मुत्सद्दी असल्याने त्यांनी बहुजनातील काही लोकांना आपलेसे केले आहे. त्यांना नावापुरते राजेपद देऊन खरी सत्ता आपल्याकडेच ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येक युगात बळीला पाताळात घालण्याचे काम ते बिनधास्तपणे करतात. कालेलकर आयोग, मंडल आयोग व आता नचिअप्पन कमिटीचा अहवाल हे दडपून टाकणे म्हणजे बळीराजाला पुन्हा पुन्हा पाताळात गाडत राहणे, असा त्याचा अर्थ होतो.

आता तर त्यांनी खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाउजा) हे नवे धोरण देशात आणले आहे. या धोरणामुळे शेतकरी इतका नागवला गेला की तो आत्महत्त्याच करायला लागला. आता पर्यंत गेल्या 15 वर्षात 20 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केलेली आहे. शेतकरी म्हणजे बळीराजाच! पाच हजार वर्षांपूर्वीचा आपला बळीराजा आर्यांच्या अन्यायाविरोधात लढता लढता मेला, मात्र आजचा बळीराजा लढण्याआधीच आत्महत्त्या करून पराभव स्वीकारतो. याचे खरे कारण हे आहे की, आपण बळीराजाची लढायची प्रेरणा विसरलो आहोत. त्याचा इतिहास आपण विसरू लागलो आहोत. भालदेव पित्तरपाटासारखे त्याचे सण साजरे करतो, मात्र त्याच्यामागचा गौरवशाली युद्धाचा इतिहासच आपल्याला माहीत नाही. आर्य-ब्राह्मणांनी बळीला पाताळात गाडण्याचा खोटा इतिहास पुराणांमध्ये लिहून ठेवला आहे, त्यालाच आपण खरा इतिहास मानू लागलो. पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या बळीराज्याने वामनाच्या सांगण्यावरून पाताळात गाडून घेतले म्हणजे त्याने आत्महत्त्याच केली, असे समजून आजचा शेतकरी-बळीराजाही आत्महत्त्या करून स्वतःची सुटका करून घेतो आहे. एकतर तो गुपचूप अन्याय सहन करत राहतो, आणी अन्याय सहन करण्याची सीमा संपली की आत्महत्त्या करतो. असे पराभूत व लाचार जीवन आपल्या वाट्याला आले आहे. मागीतल्याने मिळत नाही व लढल्याशिवाय सन्मान पावत नाही. ही लढण्याची प्रेरणा आपल्याला बळीराजाच देईल, म्हणून आपण आपले सर्व सण-उत्सव पारखून ते मुळ स्वरूपात साजरे केले पाहीजेत. सण चुकीच्या पद्धतीने साजरे केलेत तर, मरण्याची प्रेरणा मिळते व हेच सण खरा इतिहास जाणून साजरे केलेत तर, त्यातून जगण्याची प्रेरणा मिळते.           


लेखक —प्रा. श्रावण देवरे,
मोबा-9422788546.

शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१३

गणेशोत्सव- जल्लोष, उन्माद आणि बरंच काही

गणपती हा शब्दच गणपतीचे मूळ स्वरूप दाखवून देतो. गणांचा अधिपती तो गणपती असा सरळ, साधा अर्थ आहे. शिव-पार्वतीचा पुत्र असणारा हा गणपती वैदिकांसाठी सुरुवातीला विघ्नकर्ता होता. त्याने विघ्न आणू नये म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीची आराधना करून होते. नंतरच्या काळात त्याचे मुळचे अवैदिक स्वरूप नष्ट होऊन त्याचे ब्राम्हणीकरण झाले. अवैदिक गणपतीचे वैदिक ब्रम्हणस्पतिबरोबर एकरूपत्व दाखवून गणेशाचे पूर्ण स्वरूप बदलवून टाकले. त्यासाठी जाणीवपूर्वक धार्मिक ग्रंथातून पूरक कथांची निर्मिती केली गेली.

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes