डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
प्रा. हरी नरके
आधुनिक भारताच्या सर्वांगिण उभारणीमध्ये ज्या नेत्यांचे महत्वपुर्ण
योगदान आहे त्यात डा‘.बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहेत.स्त्री-पुरुष
समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप,सर्वांना शिक्षण,धर्मचिकित्सा ही
मुलभुत विषयपत्रिका घेवून त्यांनी लढे उभारले. संवैधानिक हक्क, समाज
प्रबोधन, संघटन, संघर्ष याद्वारे बाबासाहेबांनी
राजसत्ता,अर्थसत्ता,धर्मसत्ता, प्रशासन, न्यायव्यवस्था, ज्ञानसत्ता,
सांस्कृतिक सत्ता, माध्यमसत्ता या सगळ्यात स्त्रिया आणि अनुसुचित
जाती,जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्गिय, अल्पसंख्याक यांना
प्रतिनिधित्त्व मिळाले पाहिजे यासाठी ते झुंजले. स्वत: आयुष्यभर
लेखन,वाचन,चिंतन आणि ज्ञाननिर्मितीच्या कामात बाबासाहेब समर्पित राहिले.
त्यांनी सर्व वंचित,दुबळे, पिडीत यांना अस्तित्त्व,उर्जा, अस्मिता आणि
प्रकाश दिला.