
डॉ. भालचंद्र मुणगेकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. मात्र असे असूनही आपल्या एकूणच सार्वजनिक जीवनात
त्यांचे हे ऐतिहासिक योगदान ध्यानात घेतले जात नाही, ही या देशाची एक फार
मोठी शोकांतिका आहे. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे विविध
पैलू पाहिले की कुणीही आश्चर्याने थक्क व्हावे.
अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन
विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या
अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ
अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक;...