संजय सोनवणी
१४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन
२५१ वर्ष होत आहेत. मराठी सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी
फुटली’ एवढा संहार या युद्धात झाला. या युद्धाबदल आणि त्यातील
युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार चर्चा होत आली आहे आणि होत राहील.
१४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन २५१ वर्षे होत आहेत. मराठी सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी फुटली’ एवढा संहार या युद्धात झाला. या युद्धाबद्दल आणि त्यातील युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार चर्चा होत आली आहे आणि होत राहील. विजयाचे श्रेय घ्यायला सारेच येतात, पण पराजय हा नेहमीच पित्रुत्वहीन असतो असे म्हणतात ते खरेच आहे. उलट एकमेकांवर दोषारोप करण्याची अहमहमिका लागते. त्यातून सत्य हाती लागतेच, असे नाही. कोणाचा तरी बळी चढवून सारे खापर त्याच्या माथी मारून मोकळे होणे
ही सामान्यांची रीत झाली, पण इतिहास संशोधनात त्याला थारा नसतो.
अब्दाली पाचव्यांदा चालून आला. खरे तर मराठय़ांनी पातशाही रक्षणाचा अहदनामा २३ एप्रिल १७५२ रोजीच केला होता. त्यानंतरही १७५६ मध्ये अब्दाली चौथ्यांदा चालून आला होता. मराठे दिल्लीच्या रक्षणासाठी तिकडे फिरकलेही नाहीत. एका अर्थाने तो करारभंग होता. पाचव्यांदा अब्दाली चालून आल्यानंतर मात्र स्वत: भाऊसाहेब पेशवा आणि विश्वासरावांनी उत्तरेकडे मोहीम काढावी, यामागे नेमके काय कारण होते?
बुराडी घाटावर युद्धात दत्ताजी िशदेंचा झालेला अपघाती
मृत्यू हा एका अर्थाने मराठेशाहीवर मोठा आघात होता. उत्तरेत जरी
िशदे-होळकरांमुळेच मराठी सत्ता फोफावली असली, तरी कोणत्याही सरदाराला डोईजड
होऊ देऊ नये म्हणून त्यांना आपापसात भांडत ठेवण्याचे तंत्र पेशव्यांनी
याही बाबतीत वापरले होते. त्यातल्या त्यात पेशव्यांची माया िशद्यांवर अधिक
होती. दत्ताजींच्या बुराडी घाटावरील मृत्यूमुळे आपण काहीतरी करतो आहोत हे
दाखवणे पेशव्यांना गरजेचे होते, पण या मोहिमेचे नेतृत्व द्यायचेच होते तर
रघुनाथरावांकडे, कारण त्यांना उत्तरेचे राजकारण व भौगोलिक स्थिती माहीत तर
होतीच, पण िशदे-होळकरांमधील ताणतणावही माहीत होते.
पण भाऊंची नियुक्ती झाली. भाऊ दिल्ली गाठेल तोवर
अब्दाली पूर्वीप्रमाणेच परभारे निघून जाईल असा नानासाहेबांचा आणि खुद्द
भाऊंचाही होरा असावा. अन्यथा भाऊंची एकुणातील चाल एवढी संथ झाली नसती. सोबत
हजारो यात्रेकरूंचे जत्थे घेत वेगाने कूच करण्यापेक्षा तीर्थयात्रांवरच
अधिक भर दिला नसता. पावसाळ्यापूर्वीच त्याला सहज यमुना गाठता आली असती आणि
अब्दालीला भिडण्याचे अत्यंत वेगळे मार्ग आणि अनुकूल अशी युद्धभूमीही ठरवता
आली असती.
होळकरांनी भाऊंना एक तर चंबळेपारच स्वत: थांबून खडे
सन्य पुढे पाठवावे हा सल्ला दिला होता. तो अत्यंत योग्य असाच होता. एक तर
बाजारबुणगे आणि यात्रेकरूंमुळे वाटचाल धीमी राहणार आणि शत्रूला सावध होत
त्यानुरूप युद्धनीती ठरवायला वेळ मिळणार हे गनिमी काव्यात व वेगवान हालचाली
करण्यात पटाईत असलेल्या मल्हारराव होळकरांखेरीज कोणाला कळणार होते?
िशद्यांची बाजू अनुभवी दत्ताजींच्या मृत्यूमुळे कमकुवत झाली होती. अशा
वेळीस भाऊंनी खरे तर मल्हाररावांचा सल्ला मानायला हवा होता. खडे सन्य
त्यांच्या कुमकेस द्यायला हवे होते आणि युद्धाच्या निकालाची वाट पाहायला
हवी होती किंवा खडय़ा सन्यासह स्वत:ही पुढे जायला हवे होते.
पण भाऊंचा बहुधा युद्धच टळेल यावर अधिक विश्वास असल्याने त्यांनी मल्हाररावांचा अनुभवी सल्ला ऐकला नाही. यत्रेकरू आणि बुणग्यांचे दोन लाखांचे लेंढार सोबत घेतच पुढे जायचे ठरवले. खरे तर पानिपतच्या शोकांतिकेच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल होते.
मल्हाररावांनी नजिबाला हाती पडूनही जीवदान दिले ही चूक
पानिपत युद्धात भोवली असे सर्वसामान्यपणे शेजवलकरांसहित इतिहासकार म्हणत
असतात. नजिब हा कट्टर अश्रफ इस्लामच्या मागे शाह वलीउल्लाहसारख्या कडव्या
जिहादी मुस्लिम विचारवंताच्या कह्यात होता असेही मानले जाते. त्याच्यामुळेच
अब्दालीने पाचवी स्वारी केली असाही प्रवाद आहे. मल्लिका जमानी या महंमदशहा
पातशहाच्या बेगमेने अब्दालीला स्वत: निमंत्रण धाडले होते हा इतिहास मात्र
सोयिस्कररीत्या विसरला जातो.
खरे तर तत्कालीन उत्तरेतील राजकारण समूळ बिघडलेले
होते. जेव्हा नजिब पातशहाचा वजीर होता आणि त्याला पकडले गेले त्या वेळी
औरंगजेबाच्या वारसात पराकोटीची राज्यतृष्णा आणि
घोडी-कुरघोडीचे-कटकारस्थानांचे साम्राज्य होते. वजीरपदासाठी गाझिउद्दिन ते
शुजा कोणत्याही स्तराला जाऊ शकतील असे वातावरण होते. शुजाउद्दौलाला मराठय़ांनी दुखावून सोडले होतेच. अशा
राजकीय स्थितीत नजिबाला ठार मारले असते तर मराठय़ांबद्दलचा उरलासुरला
विश्वास उत्तरेत नष्ट झाला असता. १७५६-५७ मधील ही राजकीय परिस्थिती होती.
अशा स्थितीत त्या परिस्थितीत नजिबाला अभयदान देणे आवश्यक होते आणि
मल्हाररावांनी ते दिले. नजिब खली आहे याची जाण मल्हाररावांना नव्हती असे
नाही. त्यांनी दत्ताजी िशदेंना जून १७५८ च्या पत्रात ‘नजिबास हाती धरून
भागीरथीस पूल बांधून अयोध्या, ढाका, बंगलापर्यंत मोहीम करावी.. हे न करता
नजिब खान याचे पारिपत्य कराल तर पेशवे तुम्हास धोतरे बडवावयास लावतील..’
अशा अर्थाचे म्हटले आहे. या पत्राचे अनेक मसुदे असल्याने हे पत्र खरे की
खोटे हे ठरवायला मार्ग नाही. पण ते खरे आहे असेच समजले तर या पत्रातून दोन
बाबी स्पष्ट होतात.
पेशव्यांचा मल्हाररावांवर विश्वास नव्हता तसाच
होळकरांचाही विश्वास पेशव्यांवर नव्हता. तसे पाहता त्या परिस्थितीत फक्त
नजिबच ‘खली’ होता का? रघुनाथरावांमुळे कुंभेरीचा वेढा झाला आणि होळकरांचा
मुलगा खंडेराव मारला गेला. िशद्यांनी परस्पर तह करून होळकरांना दुखावले.
जाट काय, रजपुत काय, शुजा काय.. मराठय़ांनी आततायी राजकारण करून दुखावले नाही असा एकही समाजघटक मराठ्यांसाठी उरला नाही.
यासाठी जबाबदार होते ते पेशव्यांचे परस्परविरोधी आदेश. संजय क्षीरसागर यांनी आपल्या पानिपत युद्धाबद्दलच्या विश्लेषक पुस्तकात या प्रवृत्तीवर सखोल प्रकाश टाकलेला आहेच. अशा अस्थिर स्थितीत कोणीतरी स्थानिक, बलाढय़ पण एतद्देशीय मुस्लिमांना परका अशा मुस्लिम सत्ताधाऱ्याला उपकृत करून हयात ठेवणे राजकीय निकड होती, असेच म्हणणे क्रमप्राप्त ठरते. नजिबाला जिवंत ठेवून मग जी अटकेपार स्वारी झाली हे सर्वस्वी मल्हाररावांचे व िशद्यांचे कर्तृत्व होते, राघोबादादा त्या यशाचे एक केवळ सहभागी होते.. पण राघोभरारी.. अटकेपार झेंडा इत्यादी विशेषणे बहाल करून मराठी इतिहासकार / कादंबरीकार हे विसरतात की अटकेपार झेंडा लावून राघोबादादा एक कोटीचे कर्ज का करून आले? जो प्रांत आधीच अब्दालीने लुटून हरवून फस्त केला होता तोच प्रांत पुन्हा ताब्यात घेत जाण्यात पका मिळण्याची मुळात शक्यताच नव्हती. राघोबादादांवर कर्ज झाले ते अटळच होते. उलट नानासाहेब पेशव्यांनी ते समजावून न घेता त्यांच्यावर अन्यायच केला एवढेच म्हणता येते.
थोडक्यात १७५७-५८ मधील नजिबाला जिवंत सोडण्याचा निर्णय
आणि १७६० मधील दिल्लीतील वेगाने बदलत असलेली चढ-उतारांची स्थिती,
गाझिउद्दीन या वजिराने खुद्द पातशहाचाच केलेला खून, जाटाची संभ्रमित भूमिका
यातून पुन्हा अब्दालीला बोलवण्याची चाल, शुजाची कुंपणावरच्या सरडय़ासारखी
भूमिका.. िशद्यांनी शुजावरच आक्रमण करून खंडणी वसूल करण्याचा पेशव्यांच्या
आज्ञेने घेतलेला निर्णय..
येथे एक महत्त्वाचे लक्षात घ्यायची बाब म्हणजे, अब्दाली पाचव्यांदा चालून
आला तेव्हा भाऊंची अब्दालीवर स्वारी करण्यासाठी नियुक्ती होण्यापूर्वीच
म्हणजे १३ मार्च १७६० रोजी अब्दाली व मराठय़ांत तह घडून आला होता. आणि हा तह
केला होता मल्हारराव होळकर व िशद्यांनी हाफिज रहमत खानच्या मध्यस्तीने. या
तहानुसार नजिबचा प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवून त्याच्या मार्फतच
अब्दालीला परत पाठवावे. सूरजमल जाटानेही या तहासाठी सहकार्य केले होते.
नजिबाला जिवंत ठेवण्याचा असा लाभ झाला होता.. पानिपत युद्ध होण्याचे काहीएक
कारण उरलेले नव्हते.. पण तेवढय़ात भाऊ उत्तरेकडे रवाना झाला आहे, हे कळताच
नजिब घाबरला आणि छावणी उठवून परत जायला निघालेल्या अब्दालीला त्याने
थांबवले. त्यामुळे करार फिसकटला. तरीही होळकरांनी तहासाठीचे प्रयत्न सुरूच
ठेवले. १२ जून रोजी होळकर लिहितात, ‘गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमत खान
भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी (बहुतेक गंगोबा तात्या ) बोलत आहे. नजिब
खानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही.
श्रीमंतही संनिध आले.’ (मराठी रियासत - खंड ४) याबाबत पानिपतचे
इतिहासकार-कादंबरीकार का मूग गिळून गप्प असतात, हे समजत नाही. थोडक्यात
भाऊंच्या आगमनाने झालेला तह फिसकटला.
भाऊंनी शेवटपर्यंत शुजा आपल्या बाजूने येईल यासाठी
प्रयत्नांची शर्थ केली. खरी मदार त्याच्यावरच ठेवली. तो कसा मराठय़ांच्या
पक्षात येणार? खरे तर तत्कालीन स्थितीत शुजाच डोके ताळ्यावर असणारा
राजकारणी माणूस होता असे म्हणावे लागते. तो तसा कोणाच्याच बाजूने राहिला
नाही.. पण अब्दालीला नतिक बळ देण्यात आणि मराठय़ांचे नाक ठेचण्यात तो यशस्वी
झाला, हे आपण उत्तर-पानिपत प्रकरणातही पाहू शकतो. असो.
मुळात पानिपत ही युद्धभूमी ठरली ती काही भाऊंची इच्छा
नव्हती. अत्यंत अपघाताने आणि कुरुक्षेत्राच्या तीर्थयात्रेची आस लागलेल्या
यात्रेकरूंच्या आणि स्वत:च्याही इच्छेखातर भाऊंच्या सन्याला सोनपतजवळ आले
असता समजले की अब्दालीने यमुना ओलांडले आहे. तेव्हा जे ही सारी सेना पळत
सुटली ती ठेपली पानिपतला. ही मराठी सन्यासाठी अत्यंत प्रतिकूल युद्धभूमी होती. त्याचा फटका सर्वार्थाने कसा बसला हे सर्वाना विदित आहेच.
गनिमी कावा अयोग्य होता?
पानिपतच्या सपाट प्रदेशात गनिमी कावा अयोग्य होता म्हणून होळकरांनी नजिबाशी
गनिमी काव्याने लढण्याचा दिलेला सल्ला अनुपयुक्त होता, असे मत शेजवलकरांनी
व्यक्त केले आहे. क्षीरसागर म्हणतात त्यानुसार गनिमी कावा म्हणजे नेमके
काय हेच आपल्या इतिहासकारांना माहीत नाही. िशदे-होळकर उत्तरेत ज्याही लढाया
लढले त्या बव्हंशी गनिमी काव्याच्याच होत्या. शत्रूवर अचानक अनेक दिशांनी
हल्ले चढवणे, संभ्रमित करणे आणि शत्रूची पुरेशी हानी करून निसटून जाणे हा
गनिमी काव्याचा मूलमंत्र. खरे तर अब्दालीही गनिमी काव्यात वस्ताद होताच.
होळकरांचे ऐकले असते तर अब्दालीला हूल देऊन पानिपतची छावणी सोडता आली
असती.. पराभवही करता आला असता. अर्थात त्यामुळे युद्धाचा अंतिम निर्णय
मराठय़ांच्याच बाजूने लागला असता असे नसले तरी जेवढी हानी झाली तेवढी तरी
नक्कीच झाली नसती.
भाऊसाहेबांची मुख्य मदार होती ती इब्राहीम खान
गारद्याच्या पलटणींवर. त्यामुळे अनुभवी िशदे-होळकरांचा सल्ला मानण्याच्या
मन:स्थितीत भाऊ नव्हतेच. बरे गोलाची रचना करत कादंबरीकार ठसवतात तसे
उरलेसुरले अन्न पोटात ढकलून १४ जानेवारी १७६१ रोजी ‘जिंकू किंवा मरू’ या
आवेशाने मराठा सन्य अब्दालीवर तुटून पडायला निघाले’ म्हणणे हे खरे नाही. ते
व्यर्थ उदात्तीकरण आहे. कारण आदल्याच रात्री झालेली मसलत.. ‘गिलच्यांचे बळ
वाढत चालले, आपले लष्कर पडत चालले. बहुत घोडी मेली. मतब्बर खासा पाय-उतारा
झाला. तेंव्हा एक वेळ हा मुक्काम सोडून बाहेर मोकळे रानी जावे, दिल्लीचा
राबता सोडून दुसरीकडे जावु; पण झाडी मोठी मातब्बर. मार्ग नाही यास्तव
दिल्लीच्याच रस्त्याने जावयास मार्ग उत्तम; परंतु गिलचा जावु देनार नाही.
यास्तव बंदोबस्ताने निघावे.’
ही मसलत म्हणजे भाऊंचा अद्यापही लढायचा विचार नव्हता
तर सुरक्षित पलायन करायचे होते. पाश्चात्त्य गोलाची रचना हीच मुळात
सुरक्षित पलायनासाठी असते. हे पलायन यशस्वी झालेही असते, परंतु नेमक्या
त्याच दिवशी धुक्याने दगा दिला. नेहमी पडणारे व सकाळी १०-११ पर्यंत असणारे
धुके त्या दिवशी पडलेच नाही, त्यामुळे मराठय़ांचा पलायनाचा प्रयत्न
अब्दालीच्या खूप लवकर लक्षात आला.. व युद्धालाच तोंड फुटले. पुढचा इतिहास
माहीत आहेच.
होळकर आधीच पळून गेले?
मल्हारराव होळकरांवरचा मुख्य आक्षेप म्हणजे विश्वासराव
पडल्याचे कळताच होळकर तेथून निसटले आणि सुरक्षितपणे दिल्लीला जाऊन
पोहोचले. होळकरांची थली सांगते की भाऊंच्याच आदेशाने त्यांनी रणांगण सोडले.
महादजी िशदेही याच सुमारास निसटले. पवारांनीही तोच मार्ग पत्करला. त्याला
कोणी पलायन म्हणत नाही. परंतु होळकरांबाबत इतिहास नेहमीच कृपण राहिलेला
आहे.
वास्तव असे आहे की भाऊंचा मुळात युद्धाचा बेत नव्हता.
सुरक्षितपणे निसटणे हेच त्यांचे ध्येय होते. गोलाची रचना त्यासाठीच केलेली
होती. िशदे होळकरांची त्या गोलात डाव्या बाजूला नियुक्तीच मुळात अब्दालीने
त्याही बाजूने हल्ला केला तर समर्थपणे परतवता यावा यासाठी. मुळात गोलाला
आघाडी-पिछाडी अशी भानगडच नसते.. ज्या दिशेने गोल पुढे जातो ती आघाडी.
अनपेक्षितपणे युद्ध झाल्याने व हानी व्हायला लागल्यावर किमान महत्त्वाचे
सरदार व त्यांचे सन्य वाचले पाहिजे, त्यासाठी त्यांनी तरी संधी मिळताक्षणी
निसटावे, असे भाऊला वाटणे हा त्यांच्या धोरणाचाच भाग होता. अन्यथा
होळकरांसोबत निसटून जाण्यात भाऊंचे बालमित्र आणि सरदार नाना पुरंदरेही कसे
असले असते? आणि आता ही या सरदारांची निसटून जायची वेळ ही माध्यान्ह नसून
सायंकाळची साडेचार ते पाच ही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन
रणधुमाळीच्या वेळी हे सारेच सरदार निसटले हा दावाच निकाली निघतो. युद्धाचा
परिणाम अनुकूल दिसत नाही हे लक्षात येताच भाऊंनी असा आदेश बजावला असणे
स्वाभाविक आहे. त्यानुसार िशदे, होळकर, पवार व अन्य अनेक सरदार तेथून
निसटून गेले. ते निसटले म्हणून पानिपतानंतर मराठे पुन्हा उत्तरेत आपली
सत्ता कायम ठेवू शकले हे येथे विसरता येत नाही.
एवढेच नव्हे तर स्वत: भाऊही पानिपतावर पडला याचा एकही
विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही. जनकोजी िशदेंबाबतही असेच म्हणता येते.
काशीराजाची बखर याबाबत जो वृत्तांत देते तोच मुळात अविश्वसनीय आहे.
भारताचार्य चिं. वि. वैद्य यांचाही असाच अभिप्राय असून भाऊ त्या युद्धात
पडले नाहीत, असाच निष्कर्ष त्यांनी ‘दुर्दैवी रंगु’मध्ये तळटिपेत नोंदवला
आहे. ‘भाऊ भगा’ असाच समज पानिपतच्या रहिवाशांचा आहे.
थोडक्यात पानिपतच्या अपयशाबाबत आज कोणावरही खापर फोडून
मुक्त होता येणार नाही. त्याकडे एक दुर्दैवी आणि अदूरदर्शीपणाचा अटळ
परिणाम म्हणूनच पाहावे लागते. संजय क्षीरसागरांसारखे ताज्या दमाचे संशोधक
त्याचे तटस्थ मूल्यांकन नव्याने करत आहेत ही एक स्वागतार्ह घटना आहे.
होळकर-िशद्यांनी मार्च १७६० मध्ये केलेला तह फिसकटला नसता तर पानिपतची
शोकांतिकाही मुळात घडलीच नसती.
14 टिप्पणी(ण्या):
"उत्तरेत जरी िशदे-होळकरांमुळेच मराठी सत्ता फोफावली असली, तरी कोणत्याही सरदाराला डोईजड होऊ देऊ नये म्हणून त्यांना आपापसात भांडत ठेवण्याचे तंत्र पेशव्यांनी याही बाबतीत वापरले होते"
प्रत्येक गोष्टीचे खापर ब्राह्मणांवर फोडण्याचा प्रयत्न निन्दनीया आहे. मी तुमचे बरेच लेख वाचले आणि तुमच्या म्हणण्यानुसार ब्राह्मण जमातीत एक सुध्धा चांगला मनुष्य नाही आणि सर्व ब्राह्मणांना मारून टाकले पाहिजे (हे शिवधर्म ह्या वेब सीते वर वाचले). हे सगळे वाचून धक्का बसला. वाईट प्रथांवर जरूर प्रहार करा पण टिळक, आगरकर, कर्वे, पेशवे, द्यानेश्वर महाराज हे सर्व देशद्रोही आहेत हे वाचून वैईत वाटले. आज महाराष्ट्रात ब्राह्मण ना सरकारी नोकरीत आहेत ना राजकारणात मग ते जबाबदार कसे? मला स्वत:ला ब्राह्मण म्हणून लहानपणापासून खूप भोगावे लागले. आई वडिलांना आमचे रहाते घर पण विकावे लागले आणि शहराकडे जावे लागले. मराठ्यान्माधल्या उच्च जातींनी देखील खूप अत्याचार केले. आमच्या गावाचे पाटील आणि सावकार आणि वाणी लोकांची बरीच दुकाने मराठ्यांचीच (96K) होती मग ब्राह्मण सगळ्याला जबाबदार कसे? खेडकर यांच्या मताप्रमाणे सर्व ब्राह्मणांना मारून टाकून त्यांच्या बायका पाळावा (वाचा: त्यांचे नवीन पुस्तक). हे तुम्हाला पटते काय?
भूतकाळात सर्वच उच्च जात्तींनी बहुजनांवर अत्याचार केले. मात्र आता फक्त ३% राहिलेल्या ब्राह्मणांवर ह्याचे खापर फोडून मराठे नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. "शिवधर्म" ह्या माध्यमातून ब्राह्मणांना मारून टाकण्याचे आदेश दिले जात आहेत. हीच उर्जा जर ऐक्यावर आणि शिक्षणावर वापरली तर कोणाचीही हिम्मत होणार नाही भारत भूमी कडे बघण्याचे. दुर्दैवाने soft टार्गेट "ब्राह्मण समाजावर सर्व उत्तरदायेत्वा ढकलून "आम्ही नाही त्यातले" हे सांगण्यात कोणता पुरुषार्थ? खेडेकर ह्यांच्या नवीन पुस्तकात वाचण्यात आले कि ब्राह्मण षंढ असतात आणि त्यांच्या बायाका मराठ्यांशी संबंध ठेवतात. असे विचार असलेला मनुष्य महान आणि आदर्श कसाकाय असू शकतो? माझ्या वाचण्यात हे देखील आले कि मराठ्यांनी इतर जातींवर जे अत्याचार केले ते ब्राह्मन्नानी सांगितले म्हणून. याला काही पुरावे आहेत का? २१ व्या शतकात असे गलिच्छ राजकारण करून कोणीच पुढे जावू शकत नाही. त्यामुळे सर्वांना बरोबर घेवून शिक्षणाच्या माध्यमातून समाजकारण साधण्यातच सर्वांचे हित आहे हे मराठ्यांना कधी कळणार? शिवधर्म च्या site वरचे विचार ऐकून खरोखर धक्का बसला.
मित्र वरील लेखा हा इतिहासाच्या खर्या व दडवून ठेवलेल्या महान युग पुरुष सुभेदार मल्हार राव होळकर याचा पराक्रम पुराव्या सहित मांडन्यiत आला आहे तरी यात कोणतीही शंका उपस्तित करू नका .
भूतकाळात सर्वच उच्च जात्तींनी बहुजनांवर अत्याचार केले हे सत्य आहे .सचिन तेंदुलकर ,लता मंगेशकर कधी ब्राम्हण होत नहीं..मग इकडे कधी ब्राम्हण वाद हा प्रश्नच येत नहीं ...
शिवधर्म च्या site वरचे विचार खरोखर असे असतील तर हे खुप चुकीचे व बेजवाबदार माणसाचे काम आहे
@Anonymous -
आपण व्यक्त केलेली प्रतिक्रिया मूळ लेखाला धरून नाही. मुद्दाम विषयांतर करून आपण मूळ विषयाला बगल देण्याचे काम केले आहे. आपण माझ्यावर केलेले आरोपही निरर्थक आहेत.
---------------------------------
मी तुमचे बरेच लेख वाचले आणि तुमच्या म्हणण्यानुसार ब्राह्मण जमातीत एक सुध्धा चांगला मनुष्य नाही आणि सर्व ब्राह्मणांना मारून टाकले पाहिजे (हे शिवधर्म ह्या वेब सीते वर वाचले). हे सगळे वाचून धक्का बसला.
>>>>हे शिवधर्माच्या साईट वर वाचले असे म्हणता आणि मग मला कशाला जाब विचारता. सह्याद्री बाणा वर आपण म्हणता तशा प्रकारचे विचार कुठेही मांडण्यात आलेले नाहीत.
--------------------------------
मराठ्यान्माधल्या उच्च जातींनी देखील खूप अत्याचार केले. आमच्या गावाचे पाटील आणि सावकार आणि वाणी लोकांची बरीच दुकाने मराठ्यांचीच (96K) होती मग ब्राह्मण सगळ्याला जबाबदार कसे?
>>> वाईट प्रथांवर टीका करताना जात पाहणे चुकीचे आहे. अन्याय मग तो कुणीही करू दे, ब्राम्हणांनी, मराठ्यांनी अथवा इतर कुणी त्याचे समर्थन होऊ शकत नाही आणि मीही कधी केलेले नाही. उलट अन्यायी प्रवृत्तीविरुद्ध सह्याद्री बाणा संघर्ष करत आहे. त्याला जातीची, धर्माची बंधने घालू नका.
---------------------------------
खेडकर यांच्या मताप्रमाणे सर्व ब्राह्मणांना मारून टाकून त्यांच्या बायका पाळावा (वाचा: त्यांचे नवीन पुस्तक). हे तुम्हाला पटते काय?
>>>कुणालाही मारणे हे बहुजन संस्कृतीत बसत नाही. बहुजन समाज हा फार सोशिक आणि सहनशील आहे. विशेषतः स्त्रियांचा सन्मान करण्याच्या बाबतीत बहुजन समाज नेहमीच अग्रेसर राहिला आहे. छ. शिवराय स्त्रीला देव्हाऱ्यातील देवातेप्रमाणे पुजावे असे म्हणत असत. महात्मा फुलेंनी ज्यांच्याविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याच बायका-मुलींसाठी बालहत्या प्रतिबंध ग्रह स्थापन केले. डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडून स्त्रीयांप्रती आपली तळमळ दाखवून दिली. अशा फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेला प्रमाण मानणाऱ्या सह्याद्री बाणावर कोणत्याही समाज अथवा स्त्रिया यांचा अवमान होणार नाही. खेदेकारांचे पुस्तक मी वाचलेले नाही. त्यांच्याविषयी जी तक्रार आहे ती त्यांना कळवू शकता.
----------------------------------
शिवधर्मा च्या साईट वर आपण काही वाचून त्याची प्रतिक्रिया सह्याद्री बाणावर नोंदवली याचं मला आश्चर्य वाटतं.
धन्यवाद रोहित......
खरा इतिहास बहुजन समाजासमोर मांडणे, बहुजन समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे हाच सह्याद्री बाणाचा उद्देश आहे. मल्हारराव होळकर यांच्याबाबतीत नेहमी अन्यायकारक भूमिका मांडण्यात आली आहे. सुदैवाने आता नवीन संशोधन होत असून अनेक गोष्टी समोर येत आहेत.
तुम्ही कितीही आपटली तरी धनगर जातीतून मुख्यमंत्रीही होणार नाही आणि शंकराचार्य देखील होणार नाही. ब्लॉगवर लेख लिहून क्रांती होत नसते. अण्णांचे उदाहरण ताजे आहे. इथे लोकांनी कितीही वाहवा केली तरी सत्तेची गणिते जुळवताना प्रत्येकजण जातीपुरतेच पाहणार.
सोनवणी इतिहासाकडे जातीयवादी दृष्टीने बघतात
सोनवणींचा ‘पानिपत संग्रामाचे नवे अन्वयार्थ’ हा लेख म्हणजे त्यांच्या इतिहासाकडे बघण्याच्या जातीयवादी दृष्टिकोनाचा उत्तम नमुना आहे. याआधीही दादोजी कोंडदेव यांच्यावरचा त्यांचा एक लेख वाचला तर त्याची प्रचिती येते. लोकप्रभाच्या मागच्या अंकातला ‘पानिपत संग्रामाचे नवे अन्वयार्थ’ हा लेख पुन्हा हीच गोष्ट अधोरेखित करतो. लेखाच्या शेवटी तेच म्हणतात की, पानिपतच्या अपयशाबद्दल आज कोणावरही खापर फोडून मुक्त होता येणार नाही, पण त्यांचा संपूर्ण लेख मात्र सदाशिवरावभाऊ आणि पेशवे यांनाच पराभवासाठी जबाबदार ठरवतो आणि होळकरांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. होळकरांच्या स्वार्थी राजकारणाचे केविलवाणे समर्थन करण्याचा त्यांचा प्रयत्न तोकडा पडतो आणि उद्देश पण लक्षात येतो. यातही िशदे-होळकर संघर्षांत पेशव्यांनी घेतलेली िशदेंची बाजू सोनवणींना खुपते आणि तेच पेशव्यांवर सरदारांना झुंजवत ठेवल्याचा आरोपही करतात. म्हणजे वैयक्तिक स्वार्थासाठी आपसात भांडणाऱ्या सरदारांचा काहीच दोष नाही का? त्याचा दोष पेशव्यांवर कसा येतो? आणि पेशवे हे घृणास्पद राजकारण करीत असताना छत्रपती काय करीत होते?
अटकेपार केलेल्या पराक्रमाचे श्रेय िशदे-होळकरांचे होते, ते राघोबाला देणे चूक, असं त्यांचं म्हणणं. राघोबांच्या कौतुकाबद्दल त्यांना खुपतं, पण सन्याचा नेता म्हणून राघोबाला श्रेय नाही द्यायचं का? मग हाच न्याय लावून पानिपतच्या पराभवाची जबाबदारी, जी सोनावणींनी सदाशिवराव भाऊंच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे, ती तरी भाऊंच्या माथी कशी येते? त्याबद्दल इतर सरदार का जबाबदार नाहीत? म्हणजे पेशव्यांनी केलेल्या पराक्रमाला जराही श्रेय द्यायचे नाही आणि त्यांचे राजकीय डावपेच काहीही करून चुकीचेच ठरवायचे हा सोनवणींचा अट्टहास पण लक्षात येतो. या ठिकाणी सोनवणी ‘भाऊ भगा’ हा उल्लेखही करतात, पण लेखात त्यांनी म्हटल्याप्रमाणे सदाशिवराव भाऊंनी होळकरांना रण सोडण्याचा दिलेला सल्ला होळकरांच्या हिताचा होता की नाही यावर मात्र ते भाष्य करीत नाहीत. म्हणजे, ‘भाऊ भगा’, पण इतर सरदारांनी मात्र रण सोडले, असं का? ते पळाले नाहीत. त्यांनी रण सोडले, फक्त ‘भाऊ मात्र भगा’. शेवटी एकच प्रश्न येतो की सदाशिवरावभाऊ पेशव्यांच्या जागी जर मल्हारराव होळकर असते तर सोनवणींनी हीच टीका केली असती का?
संकेत श. देशपांडे
sanis7deshpande@gmail.com
२७ जानेवारी च्या लोकप्रभाच्या अंकात संकेत देशपांडे यांची संजय सोनवणी यांना जातीयवादी ठरवणारी दुर्दैवी प्रतिक्रिया वाचली. देशपांडे यांची पूर्ण प्रतिक्रिया वाचून स्पष्टपणे जाणवले की होळकरांचा निष्पक्ष इतिहास समोर येतोय याचाच पोटशूळ त्यांना उठलेला आहे. म्हणून ते होळकरांना स्वार्थी म्हणतात आणि पेशव्यांची मात्र तरफदारी करतात. पानिपत युद्ध आणि एकूणच पेशवेकालीन मराठा इतिहासाची मांडणी करताना बहुतांशी इतिहासकारांनी पेशव्यांना हिरो करून इतरांना आणि विशेषतः होळकरांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. अटकेपार झेंडे लावले हे सांगताना राघोबादादाचे नाव घ्यायचे आणि होळकर भ्याडपणे पळून गेले असे सांगायचे असे का ?
आजवर होळकरांवर स्वार्थीपणाचा, पळपुटेपणाचा शिक्का मारला गेला. देशपांडे यांनी अशाच एकांगी मांडणीचा आधार घेवून होळकरांना स्वार्थी ठरविले आहे. शिंदे-होळकर यांच्यातील संघर्ष हाही त्यांच्या स्वार्थीपणाचा परिणाम आहे असे देशपांडे म्हणतात. खरे पाहता शिंदे होळकर हे मराठा सरदार होते. त्यांना सरदारकी मराठा छत्रपतींकडून दिली जायची. छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे हे असल्याने सर्व व्यवस्था पेशावेच पाहत होते. नंतर तरी छत्रपती नामधारी राहिले आणि खरी सत्ता पेशव्यांनी बळकावली. मग शिंदे-होळकर यांच्यातील संघर्ष संपविण्यासाठी पेशव्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. परंतु प्रत्यक्षात मात्र पेशवे या दोन बलाढ्य सरदारांना आपापसात झुंजत ठेवून ते डोईजड होणार नाहीत याचीच दक्षता घेत होते, हे ऐतिहासिक सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळे पेशव्यांच्या या स्वार्थी वृत्तीवर टीका झाली म्हणून आगपाखड करायचे काहीही कारण नाही.
दुसरे असे की सैन्याचा सेनापती म्हणून सदाशिवभाऊ ला विजयाचे श्रेय द्यायचे असेल तर पराभवाची जबाबदारीही त्याचीच येते ना ? मात्र होते असे की विजयाचे श्रेय पेशव्यांना आणि पराभवाचे खापर मात्र होळकर-शिंद्यांवर असे का घडते ? होळकरांचा निष्पक्ष इतिहास समोर आणण्यात सोनवणी महत्वाची भूमिका बजावत आहेत ही स्तुत्य बाब आहे. त्यामुळे त्यांना जातीयवादी ठरवून त्यांच्या इतिहास संशोधनाला खीळ घालण्याचे काम देशपांडे यांनी करू नये.
देशपांडेंचा चष्मा कोणता?
बहुजनीयांतील महानायकांची नव्याने चिकित्सा करण्याच्या प्रयत्नांना जातीयवादी ठरवून मोकळे व्हायचे हा प्रकार मोठा आहे. बरं ते पुरावे देऊनही करीत नाहीत. संकेत देशपांडे यांनी मूळ लेख कोणत्या चष्म्यातून वाचला हे समजत नाही. अन्यथा त्यांनी माझ्यावर जातीय दृष्टिकोनाचा आरोप केला नसता.
पानिपत युद्धाबाबत ‘..आणि पेशवे हे घृणास्पद राजकारण करीत असताना छत्रपती काय करीत होते?’ असा प्रश्न देशपांडेंनी विचारला आहे. त्यांच्या माहितीसाठी सांगतो की, १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी खुद्द छत्रपतींचा जामदारखाना लुटला होता. तो पुरंदऱ्यांनी सांगूनही त्यांनी परत केला नाही. थोडक्यात, छत्रपतींना पूर्णतया दुय्यम बनवण्यात आले होते. अशा स्थितीत छत्रपती कोठून हस्तक्षेप करणार? पेशव्यांनी िशदेंना मराठय़ांचाच पूर्वापार मित्र असलेल्या शुजाच्या प्रांतावरच हल्ला करून खंडणी वसूल करण्याचा दिलेला आदेश कोणत्या दर्जाचे राजकारण दर्शवतो? याबाबत चिकित्सा करण्यास जातीय दृष्टिकोन म्हणतात काय?
मल्हाररावांचं योगदान
(साप्ताहिक लोकप्रभा मधील प्रतिक्रिया)
सदाशिवभाऊ यांना समोर पराभव स्पष्ट दिसू लागल्यावर आपले सर्वात विश्वासू सरदार मल्हारराव यांना पार्वतीबाई यांना सुखरूप एक लाख सनिकांच्या वेढय़ातून बाहेर काढण्यास सांगितले. कारण त्यांना माहीत होते की फक्त मल्हाररावांची तलवारच हा सनिकांचा वेढा कापू शकते. आणि ते मल्हाररावांनी करून दाखवले..
सर्व पेशव्यांच्या आणि मराठा सरदारांच्या स्त्रियांना सुखरूप स्वगृही आणले.. आणि अब्दालीच्या राक्षसी सन्यापासून त्यांचे शील वाचवले..
यातून पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर २२,५०० लोकांना बंदी बनवण्यात आले, ज्यामध्ये फक्त स्त्रिया आणि लहान मुले होती.. त्यांचे काय झाले हे सांगायची गरज नाही. चार महिने अनन्वित अत्याचार केल्यानंतर जे बंदी जिवंत राहिले त्यांना अफगाणिस्तानमध्ये गुलाम म्हणून विकण्यात आले.
ज्या मल्हाररावांनी सर्व पेशव्यांच्या आणि मराठा सरदारांच्या स्त्रियांना सुखरूप स्वगृही आणले.. आणि अब्दालीच्या राक्षसी सन्यापासून त्यांचे शील वाचवले.. एवढे सगळे होऊन त्यांच्यावर पळपुटेपणाचे आरोप केले जातात.. हा निर्लज्जपणा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन होताना उगाचच सगळ्या गोष्टी चुकीच्या दृष्टीने पाहू नयेत. संजय सोनवणी एक अभ्यासू लेखक आहेत.
सोनवणींचे संशोधन वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे!
सोनवणी इतिहासाकडे जातीयवादी दृष्टीने बघतात, ही संकेत देशपांडे यांची प्रतिक्रिया वाचली. लेखात देशपांडे म्हणतात तसे काहीच आढळून आले नाही. सोनवणी यांनी फक्त पुरावे वाचकांसमोर मांडले आहेत. यावरून ते जातिवाचक आकस ठेवून लिहितात हे कसे? सोनवणी यांनी त्यांची मते मांडताना सर्व मान्यताप्राप्त इतिहासकारांचे दाखले दिले आहेत. उदा. ‘रियासतकार’ गो. स. सरदेसाई यांचा (मराठी रियासत- खंड ४), ‘भारताचार्य’ म्हणून ज्यांना आदराने गौरविले जाते त्या चिं. वि. वैद्य यांच्या ‘दुर्दैवी रंगू’ या पुस्तकाच्या तळटीपेत (ही तळटीप मी स्वत: सोनवणी यांच्या लेखामुळे पुस्तक मिळवून पाहिली आहे.) भाऊ युद्धात पडले नसल्याचे मत व्यक्त केलेले आहे. ही उदाहरणे पाहिली की सोनवणी पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाऊन पानिपत युद्धाच्या शोकांतिकेचे प्रामाणिक मूल्यमापन करीत आहेत हे तर्कबुद्धीला पटते.
मुख्य म्हणजे पानिपतच्या मोहिमेचे नेतृत्व सदाशिवराव भाऊंच्याच हातात सर्वस्वी होते, त्यामुळे मोहिमेचा नेता म्हणून त्यांच्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी ही सर्वस्वी त्यांच्यावर येणारच येणार हे सत्य नाकारून चालणार नाही.
पेशवा हे एक पद आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पेशवा हे पद भूषविणारे कोणत्या ज्ञातीचे होते हा सोनवणी यांच्या लेखाचा विषय होता असे अजिबात वाटत नाही. केवळ पेशवा या पदामुळे लाभलेल्या अमर्याद सत्तेमुळे (जी टिकवण्यासाठी खेळावयास लागणाऱ्या) राजकारणाची (जे कोणत्याही काळातल्या सत्ताधाऱ्यांमध्ये अगदी कॉमन आहे) जबाबदारी ही नतिकतेने पेशव्यांचीच ठरते. मग ते आपल्या ज्ञातीचे असतील तर त्या अनुषंगाने मनात रोष बाळगू नये ही कळकळीची विनंती.
राहिले राघोबादादांच्या अटकेपार झेंडे फडकवण्याच्या मोहिमेच्या यशाचे श्रेय. मोहिमेचे नेतृत्व राघोबादादांनी केले, त्यामुळे त्यांना हे श्रेय दिले जाते हे तर आहेच. आणि एक कोटी रुपयांच्या कर्जामुळे पेशव्यांनी त्यांच्यावर अन्याय केला, असेही सोनवणी यांनी लिहिले आहे; पण प्रतिसादकर्त्यांला टीका करताना ही गोष्ट का दिसली नाही?
पेशवे हे दुसऱ्या कोणत्याही ज्ञातीचे असते तरी सोनवणी यांच्यासारख्या संशोधकवृत्तीच्या व्यक्तीचे लेखन बदलले नसते, कारण त्यांनी लेख लिहिताना इतिहासाचे पुराव्यांनिशी संशोधन केले आहे हे त्यांच्या लेखनातून जाणवते आहे.
जावईशोध!
संकेत देशपांडे यांची संजय सोनवणी यांच्या लेखावरील प्रतिक्रिया वाचली. ज्ञातिनिकटता नसतानाही यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर यांच्यावर पोटतिडिकेने लिहिणारे, छत्रपती शिवाजी महाराजांवर अविरत लिहिणारे, महारांचा पुरातन काळापासूनचा इतिहास लिहिणारे, ब्राह्मणविरोधी जाहीर आवाहने देणाऱ्यांविरुद्ध लिहिणारे व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात सहभाग घेणारे संजय सोनवणी हे जातीयवादी दृष्टिकोनातून लिहितात, असा जावईशोध देशपांडे यांनी लावला आहे.
खरे तर होळकर रणांगणतून पसार झाले हि बाब सोनवणी यांना पटत नाही.होळकररच्या नजीब ला धर्मपुत्र मानणे व त्याला वरचेवर वाचवणे ( रघुनाथ पेशवे याची स्वारी ) याचे कारण शिंदेचे असणारा होल्काराचा वाद ,व त्याच्या कडून मिळणारी खंडणी, आता होळकर मानतात कि भाऊ च्या आदेश वरून त्यांनी पलायन केले.या गोष्टी ला काहीच आधार नाही व याचा उलगडा कारणासाठी बिचारा भाऊ काही परत येणार नाही. गनिमी पद्धतीने लढाई करावी तर हेच होळकर व शिंदे वरचेवर अब्दाली कडून सपाटून मार खात होते.व याची जाणीव भाऊला होती.गोलाई ची लढाई हाच योग्य मार्ग होता कारण भाऊ च्या बोकांडी असणारे यत्रेकरू आणि बुणग्यांचे दोन लाखांचे लेंढार आणि या मध्ये भाऊ दुपार पर्यत यशवी झालेला दिसून येतो. आणि जसा विश्वासराव पडला तसे होळकरांनी पलायन केले व तेथच घात झाला. जर सर्व मराठा सरदार एकजूत होऊन लढले असते तर नकीच या लढाई चा निकाल वेगळा असता.अब्दाली हा नकीच भाऊ पेक्षा अनुभवी योद्धा होता.भाऊ ने ज्या चुका केल्या त्याच्या लाभ त्याने घेतला.आता हा वाद उगीचच काहीजन उकरून काडत आहेत कि होळकर दुपार्परंत होते कि सायंकाळ पर्यंत.होळकरांनी आपला सेनची कमीत कमी हानी घडावी याचीच काळजी होती नाही तर दत्त्जाजी ला मदतीसाठी होळकर तडफेने गेले नसते का?या लढ्यात शिंदे,पेशवे ,पवार यांची आपली करती माणसे गमावली त्या मानाने होळकराची हानी खूप कमी झाली हेच त्याचे यश मानावे लागेल
प्रकाश पोळ आपले हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ